मुंबई : देशातील वेगाने वाढणाऱ्या पॅकेज्ड मसाला कंपन्यांपैकी एक असलेल्या पुष्प ब्रँड (इंडिया) लिमिटेडने भांडवली बाजारात प्रवेश करण्यासाठी भांडवली बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला आहे. ‘स्वाद का सुपरस्टार’ या टॅगलाईनमुळे ओळख निर्माण केलेल्या या कंपनीचा प्रस्तावित आयपीओ पूर्णपणे ‘ऑफर फॉर सेल’ (ओएफएस) स्वरूपातील असणार आहे.

या आयपीओअंतर्गत विद्यमान भागधारकांकडून ७४.४५ लाख इक्विटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे. यामध्ये प्रवर्तक भागधारक सुरेंद्रकुमार सुराणा आणि महेंद्रकुमार सुराणा यांच्यासह A91 Emerging Fund I LLP आणि Sixth Sense India Opportunities III यांचा समावेश आहे.

इंदूरमधून सुरू झालेला प्रवास

१९७४ मध्ये मध्य प्रदेशातील इंदूर येथे दिवंगत किशनलाल सुराणा यांनी ‘एम/एस मुनीमजी अँड सन्स’ या नावाने व्यवसायाची सुरुवात केली होती. कालांतराने कंपनीने पारंपरिक मसाला व्यवसायातून पॅकेज्ड मसाले आणि खाद्यपदार्थ क्षेत्रात मोठी झेप घेतली. ‘पुष्प’ आणि ‘मुनीमजी’ या ब्रँडअंतर्गत कंपनीने शुद्ध मसाले, मिश्र मसाले, हिंग आणि इतर मूल्यवर्धित उत्पादनांची मजबूत श्रेणी उभी केली आहे. मध्य प्रदेशात कंपनीचा मसाला बाजारातील हिस्सा सुमारे २०.७ टक्के असून, पॅकेज्ड हिंग विभागात कंपनी सुमारे ५८ टक्के बाजारहिस्स्यासह आघाडीवर आहे.

‘पुष्प कडक चाय’ही बाजारात येणार

कंपनी आता मसाल्यांसोबतच नवीन मूल्यवर्धित उत्पादनांवर भर देत आहे. गरम मसाला, पावभाजी मसाला, बिर्याणी मसाला, सांबार मसाला यांसारख्या मिश्र मसाल्यांबरोबरच सोया उत्पादने, चहा आणि इतर खाद्यपदार्थांच्या विभागातही विस्तार करण्यात येत आहे. आर्थिक वर्ष २०२७ च्या दुसऱ्या तिमाहीत ‘पुष्प कडक चाय’ हे नवीन उत्पादन बाजारात आणण्याची कंपनीची योजना आहे. ३१ मार्च २०२६ अखेर कंपनीकडे एकूण ३१२ एसकेयू (SKU) उत्पादनांची श्रेणी होती. यात १२९ शुद्ध मसाले, १७३ मिश्र मसाले आणि १० इतर उत्पादनांचा समावेश आहे.

वाढती नफा क्षमता

कंपनीच्या मिश्र मसाला विभागाने नफ्यात मोठी भर घातली आहे. या विभागातील मार्जिन आर्थिक वर्ष २०२४ मधील ३१.४० टक्क्यांवरून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ४३.७५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. प्रीमियम आणि मूल्यवर्धित उत्पादनांचा वाढता वाटा यामागील प्रमुख कारण मानले जात आहे.
कंपनीचे ऑपरेशनल उत्पन्न आर्थिक वर्ष २०२४ मधील ३९८ कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ४८१ कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. तर निव्वळ नफा ३३.३ कोटी रुपयांवरून ५८.९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. EBITDA मध्येही मजबूत वाढ नोंदवण्यात आली आहे.

देशभर विस्तार

सध्या कंपनीची उपस्थिती २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये असून, १,०१६ वितरक आणि ३.६८ लाखांहून अधिक किरकोळ विक्री केंद्रांद्वारे उत्पादने विकली जातात. जनरल ट्रेड, मॉडर्न ट्रेड, ई-कॉमर्स आणि क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही कंपनीने मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे.

नवीन उत्पादन क्षमता उभारणार

इंदूर येथे कंपनीची अत्याधुनिक उत्पादन सुविधा असून वार्षिक ६० हजार मेट्रिक टन उत्पादन क्षमता आहे. आगामी काळात कंपनी ग्रीनफिल्ड विस्तार प्रकल्पही राबवणार आहे. पहिल्या टप्प्यात २०२८ पर्यंत एकात्मिक स्टोरेज सुविधा उभारली जाईल, तर २०२९ पर्यंत नवीन ग्राइंडिंग आणि मिलिंग लाइन सुरू करण्याची योजना आहे.

स्पर्धा कोणाशी?

पॅकेज्ड मसाला बाजारात कंपनीची स्पर्धा एव्हरेस्ट, एमडीएच, आची मसाला, शक्ती मसाला, रामदेव, बादशाह मसाला यांसारख्या मोठ्या ब्रँड्सशी आहे. अलीकडेच MTR आणि Eastern ब्रँडची मालकी असलेल्या Orkla India च्या सूचिबद्धतेमुळे या क्षेत्राकडे गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले गेले आहे.

या आयपीओसाठी आयसीआयसीआय सिक्युरिटीज, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस आणि सिस्टेमॅटिक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स म्हणून काम पाहणार आहेत.