Rakesh Jhunjhunwala Stock Market Investment Tips : दिग्गज गुंतवणूकदार दिवंगत राकेश झुनझुनवाला यांना भारतीय शेअर बाजारात ‘बिग बुल’ या नावाने ओळखलं जायचं. त्यांची गणना देशातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांमध्ये केली जाते. झुनझुनवाला यांनी कोणतीही गुंतवणुकीची मोठी पार्श्वभूमी नसताना साध्या ट्रेडिंगपासून सुरुवात केली होती. पुढे अभ्यास आणि दूरदृष्टीच्या बळावर सुमारे ३२,००० कोटी रुपयांचा महाकाय पोर्टफोलियो उभा राहिला. शेअर बाजारातील लाखो छोटे गुंतवणूकदार आजही त्यांना प्रेरणास्थान मानतात. आजच्या अस्थिर बाजाराच्या वातावरणात त्यांचे मोलाचे मंत्र नव्या गुंतवणूकदारांसाठी मार्गदर्शक ठरू शकतात.

पुस्तकी ज्ञानापलीकडचा अनुभव

राकेश झुनझुनवाला यांच्या मते, शेअर बाजाराचे खरे ज्ञान केवळ पुस्तके वाचून कधीच येत नाही, तर प्रत्यक्षात बाजारात उतरून आलेल्या अनुभवातूनच ते शिकता येते. गुंतवणूकदारांनी नेहमी कंपन्यांचा मूळ व्यवसाय, त्यांची नफा कमवण्याची क्षमता आणि भविष्यातील व्यावसायिक विस्ताराच्या संधींचा सखोल अभ्यास केला पाहिजे. ‘टायटन’सारख्या दिग्गज कंपनीत त्यांनी दीर्घकाळ आपले शेअर्स कायम ठेवून आपली हीच दूरदृष्टी सिद्ध केली होती. जर एखाद्या कंपनीचा व्यवसाय मजबूत पायावर उभा असेल आणि भविष्यातही वाढीची मोठी शक्यता असेल, तर केवळ थोडेफार पैसे हातात पडले म्हणून घाईघाईने शेअर्स विकून मोकळे होणे योग्य नाही.

म्युच्युअल फंड: ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांच्यासाठी सोपा पर्याय

प्रत्येक गुंतवणूकदाराकडे रोज बसून बाजाराचा सखोल अभ्यास करण्याचा किंवा कंपन्यांचे ताळेबंद तपासण्यासाठी वेळ असेलच असे नाही. अशा वेळी म्युच्युअल फंड हा एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो, असे झुनझुनवाला मानत असे. व्यावसायिक फंड मॅनेजरच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या पर्यायामुळे छोट्या गुंतवणूकदारांनाही बाजाराच्या वाढीचा फायदा घेता येतो.

अतिमहत्त्वाकांक्षी परताव्याची हाव टाळा अन् एसआयपीचा मार्ग धरा

शेअर बाजारात उतरताना जर कुणी रातोरात श्रीमंत होण्याचे स्वप्न बघत असेल, तर तो मोठा धोका ठरू शकतो. झुनझुनवाला कधीही बाजाराला जुगाराच्या दृष्टीने बघण्याच्या बाजूने नव्हते. त्याऐवजी, दीर्घकालीन नियोजनावर आणि नियमित गुंतवणुकीवर त्यांचा भर होता. एसआयपी सारख्या शिस्तबद्ध पद्धतीचा अवलंब करून गुंतवणूकदार टप्प्याटप्प्याने आपली संपत्ती वाढवू शकतात. मात्र, बाजारातून मिळणाऱ्या परताव्याची कोणतीही खात्री नसते, हे वास्तव कधीही विसरता कामा नये.

चुकांपासून धडा घ्या, पण आर्थिक मर्यादा सांभाळून

कोणत्याही मोठ्या गुंतवणूकदाराकडून किंवा सामान्य माणसाकडून गुंतवणुकीचे चुकीचे निर्णय होऊ शकतात. पण, चुकांवर रडत बसण्याऐवजी त्यातून योग्य तो धडा घेतला पाहिजे. मात्र, या प्रक्रियेत होणारे नुकसान आपल्या आर्थिक मर्यादेच्या आतच राहिले पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. अति सुरक्षित राहण्याच्या नादात चांगल्या संधी गमावू नये. पण, विनाकारण डोळे झाकून मोठा जुगार खेळणेही चुकीचेच आहे.

कोणाच्याही सल्ल्यावर अंधपणे विश्वास ठेवू नये

बाजारात रोज कुणी ना कुणी एखादा ‘हॉट स्टॉक’ सुचवून तुफान नफ्याचा दावा करत असतात. झुनझुनवाला अशा कोणत्याही टीप्स किंवा फुकटच्या सल्ल्यांवर कधीही विसंबून राहत नसत. त्यांच्या मते, प्रत्येक गुंतवणूकदाराने स्वतः अभ्यास आणि कंपनीच्या आर्थिक परिस्थिती तपासूनच अंतिम निर्णय घ्यायला हवा. वेळोवेळी आपल्या पोर्टफोलियोचा आढावा घेणे हे यशस्वी गुंतवणुकीचे मुख्य लक्षण आहे.

कर्ज काढून जुगार खेळू नका

आपल्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या काळात भांडवल वाढवण्यासाठी झुनझुनवाला यांनी उधार घेऊन ट्रेडिंग केल्याचे सांगितले जाते. परंतु, हा मार्ग अतिशय धोकादायक असतो, याची त्यांना पूर्ण जाणीव होती. बाजारात अचानक मोठी मंदी आली किंवा तीव्र घसरण झाली, तर अशावेळी कर्जाचा बोजा माणसाला पुर्णपणे उद्ध्वस्त करू शकतो. त्यामुळे स्वतःची जोखिम घेण्याची क्षमता पूर्णपणे पडताळल्याशिवाय कधीही कर्ज काढून शेअर बाजारात उतरू नका.

बाजाराचा अहंकार बाळगू नका, परिस्थितीनुसार बदला पवित्रा

मी घेतलेला प्रत्येक निर्णय नेहमीच अचूक ठरेल, हा अहंकार बाजारात कधीही टिकू देत नाही. जगातील अनेक दिग्गज गुंतवणूकदारांचे निर्णय चुकलेले आहेत. बाजारातील परिस्थिती, जागतिक घडामोडी आणि राजकीय समीकरणे सतत बदलत असतात. त्यामुळे स्वतःच्या मताला चिटकून राहण्याऐवजी, परिस्थितीनुसार निर्णय बदलण्याची लवचिकता अंगी बाळगणे आवश्यक आहे.

शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. लोकसत्ता ऑनलाईनमध्ये शेअर बाजाराशी संबंधित वृत्त केवळ माहितीच्या उद्देशाने प्रकाशित केले जाते. याला गुंतवणुकीचा सल्ला समजू नये. कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी, वाचकांनी पात्र आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.