Rakesh Jhunjhunwala Titan Share investment analysis by Ramdeo Agrawal: दलाल स्ट्रीटचे बिग बुल म्हणून ओळखले जाणारे दिवंगत भारतीय अब्जाधीश राकेश झुनझुनवाला यांच्याकडे फायद्याचे व्यवहार ओळखण्याची उपजत क्षमता होती. या क्षमतेमुळे त्यांना टायटनमधील गाजलेली गुंतवणूक करणे शक्य झाले, असे शेअर बाजारतज्ज्ञ रामदेव अग्रवाल यांनी म्हटले आहे.

‘मोतीलाल ओसवाल’चे अध्यक्ष रामदेव अग्रवाल यांनी २०२२ मध्ये ग्रो या ब्रोकिंग प्लॅफॉर्मच्या मार्केट की बात या पॉडकास्टमध्ये राकेश झुनझुनवाला यांच्यासोबतच्या आपल्या पहिल्या भेटीची आठवण सांगितली होती. हे पॉडकास्ट पुढे द अल्फा बेट्स या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले.

झुनझुनवाला यांच्या स्वभावाबद्दल बोलताना अग्रवाल यांनी सांगितले होते की, “त्या काळातही राकेश खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असत. त्यांच्या आयुष्यातील कोणतीही गोष्ट लपलेली नव्हती. ते असे व्यक्ती होते ज्यांना आपल्या आसपासच्या सर्वांनीच पैसे कमवावेत असे वाटायचे.”

रामदेव अग्रवाल यांनी झुनझुनवाला यांनी टायटनमध्ये केलेल्या गुंतवणुकीचे उदाहरण देऊन हे स्पष्ट केले. २००१-२००२ च्या काळात कच्च्या मालाच्या विशेषतः सोन्याच्या वाढत्या किमती, वाढलेली स्पर्धा आणि कमी मागणी यांसारख्या अनेक प्रतिकूल बाह्य घटकांमुळे टायटन कंपनीच्या नफाक्षमतेवर परिणाम झाला होता. तसेच कंपनीचे व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटना यांच्यातील वादामुळे होसूर येथील कंपनीचा मुख्य कारखाना बंद करावा लागला होता.

कंपनीच्या अडचणींची आणि वाईट कामगिरीची ही मोठी यादी जेव्हा सर्वांसमोर आली, तेव्हा टायटनच्या शेअरची किंमत घसरून २९ रुपयांच्या नीचांकी पातळीवर आली होती. याच काळात राकेश झुनझुनवाला यांनी टायटनचे शेअर्स ३० ते ३५ रुपये प्रति शेअर या कमी दराने खरेदी करण्यास सुरुवात केली. ३१ मार्च २०२६ पर्यंत, झुनझुनवाला यांच्या कुटुंबाकडे कंपनीचा सुमारे ५% हिस्सा होता, ज्याचे मूल्य आता जवळपास २०,२५० कोटी रुपये इतके आहे. अग्रवाल म्हणाले की, सुरुवातीच्या काळात अनेकांनी टायटनचे शेअर्स खरेदी केले होते, परंतु २० वर्षे कोणीही ते टिकवून ठेवले नव्हते.

कोण होते राकेश झुनझुनवाला?

राकेश झुनझुनवाला यांचे २०२२ मध्ये वयाच्या ६२ व्या वर्षी मूत्रपिंडाशी संबंधित आजारामुळे निधन झाले. ५ जुलै १९६० रोजी जन्मलेले झुनझुनवाला गुंतवणुकीसाठी उत्कृष्ट कंपन्या शोधण्याच्या त्यांच्या कौशल्यासाठी ओळखले जात असत. मारवाडी कुटुंबात वाढलेल्या झुनझुनवाला यांना लहान असतानाच शेअर बाजाराची आवड निर्माण झाली होती. आज त्यांच्या कुटुंबांची भारतीय शेअर बाजारात हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक आहे.