Reliance Industries Q2 Results : मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत दमदार २५,५४८ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला आहे. वार्षिक तुलनेत ४०.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने १८,१६५ कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता.

कंपनीने शुक्रवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, तिमाहीत प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस) १८.८८ रुपये झाले. मागील वर्षी याच कालावधीत ते १३.४२ रुपये होते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील २०,९४६ कोटी रुपयांच्या तुलनेतही कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचा परिचालन महसूल २८ टक्क्यांनी वाढून विक्रमी ३.३८ लाख कोटी रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या विविध व्यवसायांमधील वाढलेल्या योगदानामुळे महसुलात ही वाढ नोंदवण्यात आली. कंपनीच्या नफ्यातील वाढीला तेल शुद्धीकरण व्यवसायातून मिळालेल्या वाढीव नफ्याचा मोठा आधार मिळाला. खनिज तेलावर प्रक्रिया करून पेट्रोलियम उत्पादने तयार करण्याच्या व्यवसायातील सुधारलेल्या शुद्धीकरण मार्जिनमुळे तेल ते रसायने (ऑइल-टू-केमिकल्स) विभागाच्या कमाईत वाढ झाली. याशिवाय, डिजिटल सेवा व्यवसायात प्रति ग्राहक सरासरी उत्पन्न वाढल्याने कंपनीच्या एकूण नफ्याला आणखी बळ मिळाले.

मात्र, किरकोळ विक्री व्यवसायाची कामगिरी तुलनेने संथ राहिल्याने कंपनीच्या एकूण वाढीच्या वेगावर काही प्रमाणात परिणाम झाला. तेल शुद्धीकरण आणि डिजिटल व्यवसायातील वाढीने किरकोळ व्यवसायातील या मर्यादित कामगिरीची भरपाई केली.

जिओ प्लॅटफॉर्म्सचा नफा ८ हजार कोटींपुढे

शेअर बाजारात नुकतेच दमदार पदार्पण करणाऱ्या जिओ प्लॅटफॉर्म्सने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ८,३८९ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने ७,३७९ कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. तिमाहीत परिचालनातून मिळणारा एकत्रित महसूल ११.४ टक्क्यांनी वाढून ४०,४७५ कोटी रुपये झाला. मागील वर्षी याच कालावधीत तो ३६,३३८ कोटी रुपये होता. जून तिमाहीच्या तुलनेतही कंपनीच्या नफ्यात आणि महसुलात वाढ झाली आहे. पहिल्या तिमाहीतील ७,७६५ कोटी रुपयांच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा आठ टक्क्यांनी वाढला. तर परिचालन महसूल ३.३ टक्क्यांनी वाढून ३९,१७३ कोटी रुपयांवरून ४०,४७५ कोटी रुपयांवर पोहोचला. शेअर बाजारात सूचिबद्ध झाल्यानंतर जिओ प्लॅटफॉर्म्सने जाहीर केलेला हा पहिलाच तिमाही निकाल आहे.