Reliance Industries (RIL), led by billionaire Mukesh Ambani market capitalization slipped below the ₹18 lakh crore: मोठ्या प्रमाणावर झालेल्या विक्रीमुळे सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या किमतीत ४ टक्क्यांहून अधिक घसरण झाली, ज्याचा परिणाम शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांवरही दिसून आला. बीएसईवर रिलायन्सचे शेअर्स ४.१३ टक्क्यांपर्यंत घसरून प्रति शेअर १,२९२.३० रुपयांवर पोहोचले.
आज रिलायन्स इंडस्ट्रीज प्रमुख निर्देशांक निफ्टी ५० मध्ये सर्वाधिक नुकसान सोसणारी कंपनी ठरली आहे. निफ्टी ५० निर्देशांकात रिलायन्स इंडसट्रीज सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. रिलायन्समध्ये झालेल्या या घसरणीमुळे निफ्टीमध्येही मोठी घसरण झाली. परिणामी, दुपारी १२:४० वाजेपर्यंत निफ्टी ५० मध्ये ०.१६ टक्क्यांपर्यंतची घसरण नोंदवली गेली.
अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज निफ्टी ५० निर्देशांकात ८.८७ टक्क्यांसह इतके दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आहे. यामध्ये १०.९४ टक्क्यांसह एचडीएफसी बँक (HDFC Bank) पहिल्या क्रमांकावर आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या किमतीत झालेल्या मोठ्या घसरणीमुळे, कंपनीच्या बाजार भांडवलातही मोठी घट झाली. शेअर बाजारातील आकडेवारीनुसार, कंपनीचे बाजार भांडवल १८ लाख कोटी रुपयांच्या खाली घसरले असून, ते अंदाजे १८.२८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
३ एप्रिल रोजी रिलायन्सचे बाजार भांडवल १८.२८ लाख कोटी रुपये होते. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आता रिलायन्सचे बाजार भांडवल १७.४८ लाख कोटी रुपयांवर घसरले आहे. म्हणजेच आज बाजार उघडल्यापासून दुपारी १२:४० वाजेपर्यंत रिलायन्सचे ०.८० लाख कोटी रुपये नुकसान झाले आहे.
रिलायन्सच्या शेअर्सची किंमत का घसरत आहे?
मध्यपूर्वेतील अमेरिका-इराण युद्धाच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रिलायन्सच्या शेअर्सच्या किमतीत घसरण झाली आहे. या युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात सतत व्यत्यय येत असून, संभाव्य तेलटंचाईबद्दल चिंता वाढली आहे.
गेल्या दोन आठवड्यांत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरच्या किमतीत ८% पेक्षा जास्त घसरण झाली आहे. डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) वर निर्यात शुल्क लावण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे ही अलीकडील विक्रीची लाट आली आहे, ज्यामुळे कंपनीच्या रिफायनिंग मार्जिनवर संभाव्य दबावाची चिंता वाढली आहे.
२६ मार्चपासून सरकारने इंधन करांमध्ये सुधारणा केली असून, डिझेलवर प्रति लिटर २१.५० रुपये आणि एटीएफवर प्रति लिटर २९.५० रुपयांचे निर्यात शुल्क पुन्हा लागू केले आहे, तर पेट्रोल निर्यातीला यातून सूट दिली आहे. या निर्णयासोबतच पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर १० रुपयांची कपातही करण्यात आली.
