Reliance Industries Share Price Today Target Buy Sell Hold: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्त्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे बाजार भांडवल सोमवारी १७ लाख कोटी रुपयांच्या वर पोहोचले आहे. कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीतील विक्रमी कमाई आणि ब्रोकरेज कंपन्यांच्या सकारात्मक अहवालांमुळे, कंपनीच्या शेअर्समध्ये एका दिवसात ८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली.

एप्रिल २०२० नंतर म्हणजेच सहा वर्षांहून अधिक काळातील ही कंपनीच्या शेअर्समधील एका दिवसातील सर्वात मोठी वाढ ठरली. आजच्या सत्रात निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवणारा शेअर रिलायन्सचा ठरला आणि मुख्य निर्देशांकाच्या तेजीमध्येही याचाच सर्वात मोठा वाटा राहिला.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स ८.१ टक्क्यांच्या वाढीसह १२५९ रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले आहेत. यामुळे मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील या समूहाचे बाजार भांडवल सुमारे १७.०५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. एनएसई आणि बीएसई या दोन्ही शेअर बाजारांत या शेअरमध्ये सर्वाधिक व्यवहार झाले आहेत.

शेरअ बाजारातील तेजीचे नेतृत्त्व

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समधील या जोरदार तेजीमुळे शेअर बाजारात सर्वत्र तेजी दिसून आली. दुपारी ०१:०१ वाजता सेन्सेक्स ९६६ अंशांच्या वाढीसह ७५४२५ अंशांवर, तर निफ्टी २७४ अंशांच्या वाढीसह २३३२७ अंशांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी ५० निर्देशांक २१०.३५ अंशांच्या वाढीसह २३२५२.८० अंशांवर व्यवहार करत होता.

विक्रमी कमाईमुळे तेजीला बळ

रिलायन्स इंडस्ट्रीजने जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी आतापर्यंतची सर्वोत्तम त्रैमासिक आर्थिक कामगिरी नोंदवली आहे. कंपनीच्या ‘ऑइल-टू-केमिकल्स’ व्यवसायातील दमदार वाढ, तसेच डिजिटल सेवा आणि किरकोळ विक्री व्यवसायातील प्रगतीमुळे कंपनीने महसूल, EBITDA आणि निव्वळ नफ्यात विक्रमी कामगिरी केली आहे.

रिलायन्स बाय, सेल की होल्ड करायचा?

रिटेल कमाईवर दबाव कायम असला तरी, मजबूत रिफायनिंग कमाई आणि स्थिर टेलिकॉम वाढीचा दाखला देत, गोल्डमन सॅक्स आणि नोमुरा या ब्रोकरेज संस्थानी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या विक्रमी तिमाही कामगिरीनंतर आपले ‘बाय’ रेटिंग कायम ठेवले आहे. गोल्डमन सॅक्सने प्रति शेअर १८४० रुपये टार्गेट प्राईस निश्चित केली आहे, जी शुक्रवारच्या ११६४.९० रुपयांच्या बंद भावापेक्षा ५८ टक्के अधिक आहे. ब्रोकरेज कंपनीने म्हटले आहे की, मजबूत ऑइल टू केमिकल व्यसायाच्या कामगिरीमुळे रिलायन्सचा दुसऱ्या तिमाहीचा EBITDA अंदाजापेक्षा ९ टक्क्यांनी जास्त होता.

नोमुरानेही आपले ‘बाय’ रेटिंग कायम ठेवले असून, प्रति शेअर १५६० रुपये टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. ब्रोकरेज कंपनीने या विक्रमी कमाईचे श्रेय उच्चांकी रिफायनिंग क्रॅक्सला दिले आहे आणि नमूद केले आहे की एकत्रित EBITDA मागील तिमाहीच्या तुलनेत १९ टक्क्यांनी वाढला असून, तो अंदाजापेक्षा ९ टक्क्यांनी जास्त आहे.

(शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. लोसकत्ता ऑनलाईनमध्ये शेअर बाजाराशी संबंधित वृत्त केवळ माहितीच्या उद्देशाने प्रकाशित केले जाते. याला गुंतवणुकीचा समजू नये. कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी, वाचकांनी पात्र आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.)