SEBI Warning to Reliance regarding Insider Trading Case: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या दोन कर्मचाऱ्यांनी आणि एका कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाने, कंपनीच्या ‘किंमतीवर परिणाम करू शकणाऱ्या अप्रकाशित माहिती’ची (UPSI) कल्पना असताना कंपनीच्या शेअर्समध्ये व्यवहार केल्याचे निदर्शनास आल्यानंतर, सेबीने रिलायन्सला इशारा दिला आहे.
हा इशारा रिलायन्सच्या कंपनी सेक्रेटरी आणि कंप्लायन्स ऑफिसरला देण्यात आला आहे. २४ जून रोजीचे हे पत्र कंपनीला नॅशनल स्टॉक एक्स्चेंजकडून ६ जुलै रोजी प्राप्त झाले. रिलायन्सने त्याच दिवशी स्टॉक एक्स्चेंजला या प्रकरणाची माहिती दिली आणि हा इशारा केवळ सावधगिरीचा उपाय असल्याचे स्पष्ट केले. तसेच, या पत्रामुळे कंपनीवर कोणतेही आर्थिक किंवा कामकाजाविषयक निर्बंध लाोदले जात नाहीत, असेही कंपनीने नमूद केले आहे.
सेबीने १ जून २०२४ ते ३० ऑगस्ट २०२४ या कालावधीत रिलायन्सच्या शेअर्समधील व्यवहारांची चौकशी केली. सेबी प्रोहिबिशन ऑफ इनसाइडर ट्रेडिंग रेग्युलेशन्स, २०१५ मधील तरतुदींचे पालन केले गेले आहे की नाही, याची सेबीने तपासणी केली. या चौकशीदरम्यान सेबीच्या असे निदर्शनास आले की, तीन संबंधित व्यक्तींनी किंवा त्यांच्या निकटवर्तीयांनी, किंमतीवर परिणाम करणारी परंतु अद्याप सार्वजनिक न केलेली माहिती जवळ असताना रिलायन्सच्या शेअर्समध्ये व्यवहार केले होते.
सेबीने आपल्या पत्रासोबत जोडलेल्या परिशिष्टात हर्ष जैन, कामिनी जैन आणि हिराई उमंग दोषी यांची नावे नमूद केली आहेत. व्यवहारांच्या तपशिलानुसार, हर्ष जैन यांनी ५ जुलै २०२४ रोजी ६,३८५ रुपयांना रिलायन्सचे दोन शेअर्स खरेदी केले. संबंधित व्यक्तीच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामिनी जैन यांनी १० जुलै रोजी १,०९,६९५.२५ रुपयांना ३५ शेअर्स विकले आणि ११ जुलै रोजी ७८,८७१.२५ रुपयांना २५ शेअर्स खरेदी केले. हिराई उमंग दोषी यांनी १८ जुलै रोजी ४७,६२५ रुपयांना १५ शेअर्स विकले.
‘इनसाइडर ट्रेडिंग’ नियमांचे उल्लंघन
सेबीने म्हटले आहे की, या व्यवहारांमुळे ‘इनसाइडर ट्रेडिंग’ नियमांमधील नियम ४(१) आणि सेबी कायद्यातील कलम १२ए(डी) व १२ए(ई) यांचे उल्लंघन झाले आहे. त्यांनी असेही नमूद केले की, सेबीकडून सूचना मिळाल्यानंतरच रिलायन्सने या व्यवहारांची दखल घेतली.
सेबीने या उल्लंघनाची “गंभीर दखल” घेतली असून, तरतुदींचे पालन न केल्याबद्दल कंपनीच्या ‘कम्प्लायन्स ऑफिसर’ला ताकीद दिली आहे. तसेच, भविष्यात सावधगिरी बाळगण्याचा आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
सेबीच्या पत्रात नमूद केलेल्या मुद्द्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असे रिलायन्सने म्हटले आहे.
