मुंबई : रिलायन्स जिओच्या संभाव्य आयपीओ घोषणेचा फायदा केवळ रिलायन्सलाच नव्हे, तर भारती एअरटेलच्या शेअरलाही होऊ शकतो, असा अंदाज जागतिक ब्रोकरेज संस्था जेफरीजने व्यक्त केला आहे. जिओचे बाजारमूल्य समोर आल्यानंतर संपूर्ण दूरसंचार क्षेत्राचे पुनर्मूल्यांकन होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. रिलायन्स जिओच्या आगामी मेगा आयपीओच्या चर्चा केवळ रिलायन्स इंडस्ट्रीजपुरत्याच मर्यादित राहिलेल्या नाहीत, तर याचे थेट सकारात्मक परिणाम प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या शेअरवरही होणार असल्याचा अंदाज बाजार विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
विश्लेषकांच्या मते, जिओ प्लॅटफॉर्म्सचे मूल्य सुमारे ११.९ लाख कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. हे मूल्यांकन भारती एअरटेलच्या एकूण मार्केट कॅपच्या जवळपास असल्याने दूरसंचार क्षेत्रातील गुंतवणूकदारांचे लक्ष वाढले आहे.
जेफरीजच्या मते, जिओच्या सूचिबद्धतेनंतर (लिस्टिंग) कंपन्यांवर नफा वाढवण्याचा दबाव वाढू शकतो. त्यामुळे भविष्यात मोबाईल टॅरिफ वाढण्याची शक्यता निर्माण होईल. अशा परिस्थितीत एअरटेलला महसूल आणि नफा वाढीचा लाभ मिळू शकतो. तसेच, एअरटेलच्या शेअरमध्ये पुढील काळात नव्याने तेजी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जिओचा आयपीओ एअरटेलसाठी धोका ठरणार नाही, उलट संपूर्ण क्षेत्रासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करू शकतो, असेही विश्लेषकांनी स्पष्ट केले आहे. टेलिकॉम क्षेत्रातील गुंतवणुकीचा ओघ वाढल्यास त्याचा फायदा एअरटेललाही मिळू शकतो.
भारती एअरटेलला कसा होणार फायदा?
- मूल्यांकनाचा नवा निकष : रिलायन्स जिओचा आयपीओ देशातील टेलिकॉम क्षेत्रासाठी एक नवीन बेंचमार्क सेट करेल. जिओचे मार्केट व्हॅल्यूएशन जितके जास्त ठरेल, तितकाच फायदा थेट भारती एअरटेलला मिळेल, कारण एअरटेलचा महसूल आणि प्रति ग्राहक सरासरी उत्पन्न सध्या अत्यंत मजबूत स्थितीत आहे.
- ‘होल्डिंग कंपनी डिस्काउंट’चा अडथळा नाही: भारती एअरटेल ही थेट बाजारात सूचिबद्ध कंपनी आहे, तर जिओ सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा एक भाग आहे. थेट टेलिकॉम प्ले म्हणून एअरटेलकडे पाहणाऱ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांना जिओच्या लिस्टिंगनंतर दोन्ही कंपन्यांच्या मूल्याची अचूक तुलना करणे सोपे जाईल, ज्यामुळे एअरटेलचे शेअर्स अधिक आकर्षक ठरू शकतात.
- टॅरिफ वाढ आणि एआरपीयूमधील सुधारणा: जिओने अलीकडेच आपले बेस टॅरिफ प्लॅन्स बंद करून दरांमध्ये वाढ केली आहे. जिओच्या या पावलामुळे एअरटेललाही आपले दर वाढवण्याची आणि प्रति ग्राहक सरासरी उत्पन्न वाढवण्याची मोठी संधी मिळाली आहे. यामुळे दोन्ही कंपन्यांच्या नफ्यात मोठी वाढ अपेक्षित आहे.
विश्लेषकांचे काय आहे मत?
सिटी रिसर्चच्या मते, “बाजार नियामक सेबीने मोठ्या आयपीओसाठी सार्वजनिक भागविक्रीची मर्यादा ५% वरून २.५% करण्याची जी तयारी दर्शवली आहे, ती जिओच्या संभाव्य पदार्पणासाठी अत्यंत पूरक ठरेल. जिओचे प्लॅटफॉर्म व्हॅल्यूएशन सुमारे १२० अब्ज डॉलर्स (अंदाजे १० लाख कोटी रुपये) असू शकते. जिओच्या या अवाढव्य मूल्याचा थेट फायदा टेलिकॉम क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी भारती एअरटेलचे मार्केट व्हॅल्यू वाढवण्यात होईल.
दरम्यान, रिलायन्सच्या एजीएममध्ये जिओ आयपीओसंदर्भात कोणते संकेत मिळतात, याकडे आता गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. या घोषणांमुळे दूरसंचार क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी हालचाल दिसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
