Jio IPO valuation crisis Iran war: गेल्या काही महिन्यांपासून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी ‘जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड’चा आयपीओ बाजारात येण्याची चर्चा आहे. पण अनेक आव्हानांचा सामना करणाऱ्या जिओच्या आयपीओ समोरील आव्हाने इराणमधील युद्धामुळे अधिकच बिकट झाली आहेत.

या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींच्या मते, अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या नेतृत्त्वाखालील रिलायन्स समूहाने जिओ आयपीओ च्या तयारीचा वेग कमी केला आहे. इराण-अमेरिकेतील भू-राजकीय तणाव आणि बाजारातील अस्थिरता लक्षात घेऊन, रिलायन्स समूह सध्या आयपीओ च्या रचनेचा फेरविचार करत आहे.

या जाणकारांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, कंपनीची अद्यापही आयपीओ साठीची प्राथमिक कागदपत्रे (Draft paperwork) दाखल करण्याची योजना कायम आहे आणि कंपनी कोणत्याही क्षणी कागदपत्रे दाखल करू शकते, पण यासाठी कंपनीने कोणतीही तारीख अद्याप निश्चित केली नाही. याबाबत ब्लूमबर्गने वृत्त दिले आहे.

मध्यपूर्वेतील इराण-अमेरिका संघर्षामुळे जिओ आयपीओच्या योजनेवर अनेक प्रकारे परिणाम झाला आहे. कारण या संघर्षामुळे भारतीय शेअर बाजारातील मंदी अधिकच तीव्र झाली. विदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणा भारतीय शेअर्सची विक्री करत आहेत आणि जिओच्या काही प्रमुख भागधारकांच्या निर्णय प्रक्रियेचा वेग मंदावला आहे. शेअर बाजारातील घसरण अधिकच खोलवर गेल्यामुळे कंपनीच्या मूल्यांकनाबाबत निर्माण झालेली चिंता हाच या संपूर्ण समस्येचा मुख्य गाभा असल्याचे संबंधित व्यक्तींनी सांगितले.

या कठीण परिस्थितीमुळे सध्याच्या गुंतवणूकदारांना अपेक्षित परतावा मिळवून देणे आणि त्याच वेळी शेअरबाबत उत्साह निर्माण करणे या दुहेरी जबाबदाऱ्यांमध्ये समतोल राखणे अधिकच कठीण झाले आहे. बाजारातील या मंदीमुळे, जिओचे मूल्यांकन प्रतिस्पर्धी कंपनी भारती एअरटेल लिमिटेडपेक्षा कमी ठरण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.

जवळपास दोन दशकांनंतर रिलायन्सच्या एखाद्या प्रमुख उपकंपनीचा हा पहिलाच आयपीओ (IPO) ठरणार असून, जिओचा हा आयपीओ भारताच्या सध्या संघर्षमय स्थितीत असलेल्या भांडवली बाजारासाठी एक ऐतिहासिक घटना ठरेल.

या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींच्या मते, या आयपीओ मधून तब्बल ४ अब्ज डॉलर्सचा निधी उभारला जाण्याची शक्यता आहे. यामुळे हा देशाच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरेल. जो ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने उभारलेल्या ३.३ अब्ज डॉलर्सच्या निधीपेक्षाही अधिक असेल.