Jio IPO Listing Update: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज जाहीर केले की, जिओ प्लॅटफॉर्म्सच्या (Jio Platforms) संचालक मंडळाने त्यांच्या बहुप्रतिक्षित आयपीओसाठी (IPO) ‘ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’ला (DRHP) मंजुरी दिली आहे. भारताच्या या सर्वात मोठ्या डिजिटल सेवा कंपनीच्या शेअर बाजारातील नोंदणीच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांना संबोधित करताना अंबानी म्हणाले, “जिओचा प्रस्तावित आयपीओ जगाला हे दाखवून देईल की, भारत जागतिक दर्जाची व्याप्ती, क्षमता आणि मूल्य असलेल्या तंत्रज्ञान कंपन्या उभारू शकतो.”
रिलायन्ससाठी हा एक “भावूक क्षण” असल्याचे म्हणत मुकेश अंबानी यांनी, आकाश, ईशा आणि अनंत अंबानी हे जिओच्या आयपीओ प्रक्रियेचे नेतृत्व करत आहेत, असे जाहीर केले.
जिओची सुरुवात होऊन १० वर्षे पूर्ण होत असताना ही घोषणा करण्यात आली आहे. अंबानी म्हणाले की, ‘व्हॉइस’ (कॉलिंग) सेवा मोफत आणि हाय-स्पीड डेटा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देऊन डिजिटल विषमता दूर करण्याच्या उद्देशाने जिओचा प्रवास सुरू झाला होता. “गेल्या १० वर्षांत जिओने कामकाजाच्या अशा स्तरावर मजल मारली आहे, जो खरोखरच असामान्य आहे”, असे ते म्हणाले.
दरम्यान, जिओच्या युजर्सची संख्या संध्या ५२.४ कोटींच्या पुढे गेली आहे, तर ५जी ग्राहकांची संख्या २६.८ कोटींपर्यंत पोहोचली आहे. यामुळे चीनबाहेरील एकाच देशातील सर्वात मोठा ५जी ऑपरेटर म्हणून जिओने स्थान मिळवले आहे. जिओ-एअरफायबर देशातील १ कोटी ३० लाख घरांमध्ये वापरले जात आहे, तर आर्थिक वर्ष २०२६ मध्ये जिओच्या नेटवर्कवरील एकूण डेटा ट्रॅफिक २४१ एक्साबाइट्सपर्यंत पोहोचले आहे.
जिओचा नफा ३०,००० कोटी रुपयांच्या वर
जिओ प्लॅटफॉर्म्सने आर्थिक वर्ष २०२६ मध्ये १,४६,८८५ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला, जो वार्षिक आधारावर १४.६ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीचा ‘एबिटडा’ (EBITDA) ७६,२५५ कोटी रुपये इतका होता, तर करपश्चात नफा पहिल्यांदाच ३०,००० कोटी रुपयांच्या वर गेला. जिओच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांवर (इनोव्हेशन) प्रकाश टाकताना अंबानी म्हणाले की, ‘वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन’च्या आकडेवारीनुसार, पेटंट निर्मितीच्या वेगाच्या बाबतीत जिओ प्लॅटफॉर्म्स जागतिक स्तरावर ३४० व्या क्रमांकावरून थेट २० व्या क्रमांकावर पोहोचले आहे.
“आज जिओ केवळ तंत्रज्ञानाचा मेळ घालत नाही, तर ते स्वतःचे (मौलिक) तंत्रज्ञान विकसित करत आहे”, असे अंबानी म्हणाले. रिलायन्सने सांगितले की, जिओच्या विकासाचा पुढील टप्पा हा ‘ट्रू ५जी’, एआय सेवा, उद्योगांचे डिजिटलायझेशन आणि भारतात विकसित केलेली तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म्स जागतिक बाजारपेठेत नेण्यावर केंद्रित असेल.
जिओ आयपीओमुळे रिलायन्सच्या शेअर्समध्ये तेजी
सोमवारी (२२ जून २०२६) रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये जवळपास ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीच्या जिओ प्लॅटफॉर्म्स या डिजिटल विभागाने भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आयपीओसाठी आवश्यक ती प्राथमिक कागदपत्रे सादर केल्यानंतर ही तेजी दिसून आली.
कंपनीच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत, रिलान्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सॅटेलाइट ब्रॉडबँड, स्वच्छ ऊर्जा आणि ग्राहक-केंद्रित व्यवसाय या क्षेत्रांचा समावेश असलेल्या कंपनीच्या पुढील टप्प्यातील विकासाचा आराखडा सादर केला होता. या गोष्टीमुळेही शेअरमधील या तेजीला बळ मिळाले.
