Jio IPO Launch Date October 2026: भारतातील सर्वात मोठे मोबाइल नेटवर्क चालवणारी आणि मुकेश अंबानी यांच्या नेतृत्त्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल होल्डिंग कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आपला बहुप्रतिक्षित आयपीओ या महिन्यात बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.

या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीची अंतर्गत तयारी जवळपास पूर्ण झाली असून परदेशी गुंतवणूकदारांकडून “सकारात्मक” प्रतिसाद मिळत आहे. यावरून बाजारात आधीच सूचीबद्ध असलेल्या या क्षेत्रातील कंपन्यांच्या तुलनेत जिओ प्लॅटफॉर्म्सच्या शेअर्सना मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता दिसून येत आहे. याबाबत मनीकंट्रोल या संकेतस्थळाने वृत्त दिले आहे.

हा आयपीओ २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान किरकोळ गुंतवणूकदारांना नोंदणीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. यात ‘अँकर बुक’ १९ ऑक्टोबरला खुले होऊ शकते आणि बाजारातील परिस्थिती अनुकूल असल्यास, २८ ऑक्टोबरला शेअर बाजारात शेअरची नोंदणी होण्याचे उद्दिष्ट आहे.

“जिओ आपला आयपीओ आणण्याच्या बऱ्यापैकी जवळ पोहोचली आहे, मात्र शेअर बाजार पदार्पणाच्या वेळेबाबत बाजारातील परिस्थिती आणि जागतिक घडामोडींची भूमिका महत्त्वाची ठरेल”, असे नाव न सांगण्याच्या अटीवर वरीलपैकी एका व्यक्तीने सांगितले.

“सेबीकडील नियामक प्रक्रिया बऱ्याच अंशी पूर्ण झाली असून, सर्व आवश्यक मंजुरीही मिळाल्या आहेत”, असेही पुढे सांगितले.

जिओने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांसोबत बैठका घेतल्या असून, त्यांना यातून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आहे. तसेच, देशांतर्गत गुंतवणूकदारांचाही मोठा प्रतिसाद दिसून आला असून तो अपेक्षांपेक्षा अधिक असल्याचे या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले.

“शेअर बाजारातील अलीकडील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, बाजाराच्या परिस्थितीवर दररोज बारकाईने लक्ष ठेवले जात आहे”, असे दुसऱ्या व्यक्तीने सांगितले. गुंतवणूकदारांनी म्हटले की, बाजारातील चढ-उतारांचा शेअर्समधील त्यांच्या गुंतवणुकीच्या इच्छेवर कोणताही मोठा परिणाम होऊ नये.

“सध्या बाजारात काही प्रमाणात अस्थिरता असली, तरी गुंतवणूकदारांनी असे संकेत दिले आहेत की, याचा आयपीओमध्ये सहभागी होण्याच्या त्यांच्या मागणीवर किंवा इच्छेवर कोणताही मोठा परिणाम होणार नाही”, असे त्या व्यक्तीने सांगितले.

किरकोळ गुंतवणूकदारांसाठी काय?

प्रस्तावित आयपीओच्या रचनेनुसार, आयपीओचा ५० टक्के हिस्सा किरकोळ आणि उच्च-निव्वळ-मूल्य असलेल्या वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी (HNI) राखीव ठेवण्यात आला आहे, तर उर्वरित अर्धा हिस्सा संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी निश्चित करण्यात आला आहे.

किरकोळ आणि HNI यांच्यासाठी असलेल्या या भागापैकी, ३५ टक्के हिस्सा २ लाख रुपयांपर्यंतच्या शेअर्ससाठी अर्ज करणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे. उर्वरित १५ टक्के हिस्सा १० लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करू इच्छिणारे आणि २ लाख ते १० लाख रुपयांच्या दरम्यान गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार यांच्यात विभागला गेला आहे.