Reliance Industries Share Price Rise After Donald Trump Refinery Announcement: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या गुंतवणुकीच्या मदतीने टेक्सासमधील ब्राउन्सविले येथे नवीन तेल शुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्याची योजना जाहीर केल्यानंतर बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या किमतीत सुमारे दोन टक्के वाढ झाली. बीएसईवर (मुंबई शेअर बाजार) रिलायन्सच्या शेअर्सची किंमत १.७४% ने वाढून १,४३३.६५ रुपये प्रति शेअर झाली.

रिलायन्सच्या शेअर्सची किंमत वर्षिक आधारावर १०% पेक्षा जास्त घसरली आहे, तर सहा महिन्यांत कंपनीचे शेअर्स १% पेक्षा जास्त वाढले आहेत. रिलायन्सच्या शेअर्समध्ये एका वर्षात १२% वाढ झाली आहे आणि तीन वर्षांत ३१% वाढ झाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या गुंतवणुकीच्या मदतीने अमेरिकेला ५० वर्षांत पहिला नवीन तेल शुद्धीकरण प्रकल्प मिळेल.

“मला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की ‘अमेरिका फर्स्ट रिफायनिंग’ ५० वर्षांमध्ये टेक्सासमधील ब्राउन्सविले येथे पहिला नवीन तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारत आहे”, असे ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमध्ये पुढू नमूद केले की, ऊर्जा क्षेत्रात अमेरिकेचे वर्चस्व पुन्हा एकदा दिसून येईल. हा सुमारे ३०० दशलक्ष डॉलर्स किमतीचा करार आहे.

या करारामुळे अमेरिकेला कोणते फायदे होतात?

ट्रम्प यांनी त्यानंतर भारताचे आभार मानले आणि सांगितले की हा करार जगातील सर्वात मोठ्या खाजगी ऊर्जा कंपन्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत झाला आहे. त्यांनी पुढे सांगितले की या तेल शुद्धीकरण प्रकल्पाचा अमेरिकन बाजारपेठ आणि राष्ट्रीय सुरक्षेला मोठा फायदा होईल. ट्रम्प यांनी दावा केला की हा अमेरिकेतील सर्वात स्वच्छ शुद्धीकरण प्रकल्प असेल. यामुळे देशात नोकऱ्या वाढतील आणि आर्थिक विकासाला गती मिळेल.

टेक्सास रिफायनरी हा तोच प्रकल्प आहे जो एलिमेंट फ्युएल्सने विकसित केला होता. त्यांनी जून २०२४ मध्ये घोषणा केली होती की त्यांनी प्रकल्पाची तयारी पूर्ण केली आहे आणि दररोज सुमारे १६०,००० बॅरल तेल प्रक्रिया करण्यास सक्षम प्रकल्प बांधण्यासाठी आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत, असे ब्लूमबर्गने वृत्त दिले आहे.