RGRL share price manipulation sebi action india case details: भांडवली बाजाराची नियामक संस्था सेबीने (SEBI) १८ संस्थांवर एकूण २.८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला असून, त्यांच्यावर पाच वर्षांसाठी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास बंदी घातली आहे.
‘रेट ग्रीन रिव्होल्यूशन लिमिटेड’ (RGRL) या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत फेरफार केल्याशी संबंधित एका प्रकरणामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.
या १८ संस्थांपैकी १५ संस्थांना त्यांनी बेकायदेशीररित्या मिळवलेला एकूण २.९४ कोटी रुपयांचा नफा परत करण्याचे निर्देशही सेबीने दिले आहेत.
ही रक्कम ३१ डिसेंबर २०२१ पासून प्रत्यक्ष रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत १२ टक्के वार्षिक व्याजासह परत करणे बंधनकारक आहे. ही रक्कम ४५ दिवसांच्या आत सेबीच्या ‘गुंतवणूकदार संरक्षण आणि शिक्षण निधी’मध्ये जमा करणे आवश्यक आहे.
आपल्या आदेशात सेबीने नमूद केले आहे की, या संस्था एका पूर्वनियोजित कटाच्या भाग होत्या. ज्याचा उद्देश ‘RGRL’ या अत्यंत कमी प्रमाणात व्यवहार होणाऱ्या शेअरची किंमत कृत्रिमरित्या वाढवणे आणि त्याद्वारे गुंतवणूकदारांना आकर्षित करणे हा होता.
काय होता कट?
सेबीला असे आढळून आले की, या कटात एकमेकांशी संबंधित संस्थांमधील ट्रेडिंगचा समावेश होता. शेअरमध्ये कृत्रिम ट्रेडिंगचे प्रमाण निर्माण करणे आणि टेलिग्राम या मेसेजिंग ॲपद्वारे टिप्स/शेअरच्या शिफारसी प्रसारित करणे हा यामागील उद्देश होता.
आदेशात म्हटले आहे की, संजय अरुणकुमार चोक्सी यांच्या नेतृत्वाखालील चोक्सी ग्रुपने या फसवणूक प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली.
चोक्सी आता आरजीआरएलचे प्रवर्तक नसले तरी कंपनीवरील त्यांचे नियंत्रण कायम होते, कारण सर्व वैधानिक देयके थेट त्यांच्या वैयक्तिक खात्यातून दिली जात होती. असा आरोप आहे की, चोक्सी यांनी वैयक्तिक फायद्यासाठी कंपनीमधील आपल्या प्रभावाचा गैरवापर केला.
सेबीला असे आढळून आले आहे की १८ संस्थांनी बाजारातील नियमांचे उल्लंघन केले आहे. परिणामी, त्यांच्यावर ५ लाख ते ५० लाख रुपयांच्या दरम्यान दंड ठोठावण्यात आला आहे.
सेबीच्या या चौकशीमध्ये १ सप्टेंबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीचा समावेश होता. या कथित उल्लंघनांच्या संदर्भात सेबीने ८ नोव्हेंबर २०२४ रोजी या संस्थांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या.
