मुंबई : देशातील सर्वात मोठ्या फंड हाऊसेसपैकी एक असलेल्या ‘एसबीआय म्युच्युअल फंड’ची पालक कंपनी ‘एसबीआय फंड्स मॅनेजमेंट’चा बहुप्रतिक्षित आयपीओ अखेर बाजारात येत आहे. हा आयपीओ १४ जुलै २०२६ रोजी खुला होईल आणि १६ जुलै २०२६ रोजी बंद होईल. तर सुकाणू गुंतवणूकदारांसाठी १३ जुलै रोजी खुला होईल.
कंपनीने प्रति शेअर ५४५ ते ५७४ रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे. यासाठी किमान २६ समभाग आणि त्यापटीत गुंतवणूकदारांना अर्ज करावा लागेल. म्हणजेच, किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४,९२४ गुंतवावे लागतील. हा आयपीओ मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) या दोन्ही बाजारमंचावर सूचिबद्ध होईल.
हा आयपीओ नेमका काय आहे?
सर्वसाधारणपणे आयपीओ म्हणजे कंपनी नवीन शेअर्स जारी करून व्यवसाय विस्तारासाठी भांडवल उभारते. मात्र, एसबीआय फंड्स मॅनेजमेंटचा आयपीओ पूर्णपणे ‘ऑफर फॉर सेल’ या स्वरूपाचा आहे. याचा अर्थ कंपनी कोणतेही नवीन शेअर जारी करणार नाही, तर तिचे सध्याचे प्रवर्तक आपल्या हिश्श्यातील काही शेअर विकणार आहेत. त्यामुळे या आयपीओतून मिळणारा सर्व पैसा थेट शेअर विकणाऱ्या प्रवर्तकांकडे जाईल, कंपनीला व्यवसायासाठी कोणताही निधी मिळणार नाही. या कंपनीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची ६१.७६ टक्के आणि अमुंडी इंडिया होल्डिंगची ३६.२६ टक्के भागीदारी आहे. या आयपीओद्वारे एकूण २०.३७ कोटी शेअर (सुमारे १०% हिस्सा) विकले जातील. यामध्ये एसबीआय आपले १२.८३ कोटी शेअर आणि अमुंडी ७.५४ कोटी शेअर विकणार आहे. या विक्रीत दोन्ही प्रवर्तक आपला छोटा हिस्सा विकून नफा पदरात पाडून घेत आहेत, मात्र आयपीओनंतरही मुख्य मालकी हक्क त्यांच्याकडेच राहतील.
फंड हाऊस शेअर बाजारात का येत आहे?
एक फायद्यात चालणारी आणि उत्तम रोख प्रवाह असलेली कंपनी शेअर का विकत आहे, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:
१. प्रवर्तकांना अंशतः बाहेर पडण्याची संधी: शेअर बाजारात सूचिबद्ध झाल्यामुळे कंपनीचे ब्रँड मूल्य आणि ओळख वाढेल. तसेच सध्याच्या भागधारकांना त्यांच्या गुंतवणुकीचे अचूक मूल्य कळेल आणि भविष्यात शेअर्स विकणे सोपे होईल.
२. पारदर्शकता आणि सुशासन: सार्वजनिक कंपनी झाल्यानंतर दर तिमाहीला आर्थिक निकाल जाहीर करावे लागतात, ज्यामुळे कंपनीच्या कारभारात पारदर्शकता वाढते.
३. मूल्य अनावरण: एसबीआय समूहाची ‘एसबीआय लाईफ इन्शुरन्स’ आणि ‘एसबीआय कार्ड्स’ नंतर सूचिबद्ध होणारी ही तिसरी उपकंपनी आहे. समूहातील कंपन्यांचे मूल्य उघड करण्याचा हा एक भाग आहे.
तुमच्या एसबीआय म्युच्युअल फंड गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
सध्या एसबीआय म्युच्युअल फंडात गुंतवणूक असलेल्या सामान्य गुंतवणूकदारांसाठी हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. याचे थेट उत्तर म्हणजे ‘काहीही परिणाम होणार नाही’ असे आहे.
- म्युच्युअल फंडाचे युनिट्स खरेदी करणे म्हणजे तुम्ही त्या फंड योजनेतील शेअर्स किंवा बाँड्सचे मालक बनता.
- ‘अॅसेट मॅनेजमेंट कंपनी’ (AMC) ही केवळ तुमच्या पैशांचे व्यवस्थापन करण्यासाठी फी घेणारी एक मॅनेजर आहे.
- मॅनेजमेंट कंपनी खाजगी असो वा शेअर बाजारात सूचिबद्ध, यामुळे तुमच्या फंडाच्या कामगिरीवर, एनएव्हीवर (NAV) किंवा एसआयपीवर (SIP) कोणताही फरक पडत नाही. हा व्यवहार कंपनीचे मालक आणि नवीन भागधारक यांच्यात होत आहे. जर तुम्हाला या फंड हाऊसच्या व्यवसायात भागीदारी हवी असेल, तर तुम्हाला या आयपीओमध्ये किंवा नंतर बाजारातून स्वतंत्रपणे या कंपनीचे शेअर्स खरेदी करावे लागतील. एसबीआयच्या शेअरहोल्डर्ससाठी विशेष कोटा आहे का?
अनेकदा मूळ कंपनीच्या भागधारकांसाठी उपकंपनीच्या आयपीओमध्ये राखीव कोटा ठेवला जातो. एसबीआयच्या लाखो शेअरहोल्डर्सना अशीच अपेक्षा होती, मात्र या आयपीओमध्ये एसबीआयच्या विद्यमान शेअरहोल्डर्ससाठी कोणताही विशेष कोटा ठेवण्यात आलेला नाही, असे डीआरएचपीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. एसबीआयचे शेअर असणाऱ्यांना किंवा बँकेच्या ग्राहकांना कोणताही प्राधान्यक्रम किंवा सवलत मिळणार नाही; त्यांना सामान्य रिटेल किंवा एचएनआय प्रवर्गातूनच अर्ज करावा लागेल. या आयपीओमध्ये संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ५०%, बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी १५% आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ३५% हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे. बाजारात आधीच सूचिबद्ध असलेल्या इतर एएमसी
एसबीआय हे शेअर बाजारात उतरणारे पहिले फंड हाऊस नाही. भारतात आधीपासूनच ६ शुद्ध मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या सूचिबद्ध आहेत: एएमसी सूचिबद्धतेचे वर्ष
निप्पॉन लाईफ इंडिया एएमसी – २०१७
एचडीएफसी एएमसी – २०१८
यूटीआय एएमसी – २०२०
आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी – २०२१
कॅनरा रोबेको एएमसी – २०२५
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी – डिसेंबर २०२५
यातील सर्वात अलीकडे सूचिबद्ध झालेली ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी’ १९ डिसेंबर २०२५ रोजी २,१६५ रुपयांच्या इश्यू प्राईजच्या तुलनेत सुमारे २०% प्रीमियमसह २,६०० रुपयांवर सूचिबद्ध झाली होती. एसबीआयच्या सूचिबद्धतेनंतर ती मालमत्तेच्या बाबतीत या समूहातील सर्वात मोठी कंपनी ठरेल.
गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावे?
हा आयपीओ पूर्णपणे ‘ओएफएस’ असल्यामुळे कंपनीच्या हातात कोणताही पैसा जाणार नाही, ही धोक्याची घंटा नसली तरी गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे. या शेअरचे आकर्षण कंपनीला मिळणाऱ्या फीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. मात्र, ‘सेबी’च्या १ एप्रिल २०२६ पासून लागू झालेल्या नवीन नियमांनुसार, इक्विटी फंडांसाठी कमाल खर्चाचे प्रमाण २.२५% वरून २.१०% आणि डेट फंडांसाठी २.००% वरून १.८५% करण्यात आले आहे. या फी कपातीमुळे भविष्यात कंपन्यांच्या नफ्याच्या मार्जिनवर काहीसा दबाव येऊ शकतो. त्यामुळे ब्रँड नेम कितीही मोठा असला, तरी कंपनीचे व्हॅल्युएशन (मूल्यांकन) पाहूनच गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्यावा.
जर तुम्ही एसबीआयचे म्युच्युअल फंड धारक असाल, तर निर्धास्त राहा; तुमच्या गुंतवणुकीला कोणताही धक्का लागणार नाही. परंतु, जर तुम्हाला या व्यवस्थापन कंपनीचे मालक व्हायचे असेल, तर हा आयपीओ तुमच्यासाठी एक स्वतंत्र गुंतवणुकीची संधी आहे.
