SBI Research Ecowrap LTCG Tax : गेल्या २ वर्षांपासून भारतीय शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत आहे. यामध्ये महत्त्वाचं कारण म्हणजे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार बाजारातून बाहेर पडत आहेत. दुसरीकडे देशांतर्गत गुंतवणूकदारही चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील गुंतवणूकदारांना दिलासा देण्यासाठी आणि परदेशी भांडवल आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकार ‘दीर्घकालीन भांडवली नफा कर’ (LTCG Tax) पूर्णपणे रद्द करू शकते. यामुळे सरकारच्या तिजोरीवर कोणताही मोठा ताण येणार नसल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ‘इकोव्रॅप’ या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

एसबीआय रिसर्चच्या अहवालानुसार, एलटीसीजी कर रद्द केल्यास आर्थिक वर्ष २०२८ मध्ये सरकारला सुमारे ४०,००० ते ५०,००० कोटी रुपयांचा महसुली तोटा सहन करावा लागेल. हा तोटा देशाच्या एकूण जीडीपीच्या केवळ ०.१ ते ०.२ टक्के इतकाच असेल. त्यामुळे सरकार आपला वित्तीय समतोल राखत हा धक्का सहज पचवू शकते.

महसुलात घट होणार?

अहवालात दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये एलटीसीजी करातून तब्बल १.३ लाख कोटी रुपयांचा विक्रमी महसूल मिळाला होता. मात्र, त्यापूर्वीच्या वर्षात शेअर बाजाराने तब्बल ३० टक्के परतावा दिला होता, ज्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर नफा वसूल केला होता. पण, आता परिस्थिती बदलली आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये हा कर महसूल १ लाख कोटींवर येईल आणि २०२७ मध्ये तो आणखी घटून ४०,००० ते ५०,००० कोटी रुपयांवर येण्याचा अंदाज आहे. गेल्या तीन वर्षांत निफ्टीचा सरासरी परतावा केवळ ०.५ टक्के राहिला आहे, तर परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सुमारे ४.८ लाख कोटी रुपये बाजारातून काढून घेतले आहेत.

SBI रिसर्चच्या महत्त्वाच्या शिफारसी

  1. एलटीसीजी कर सवलत मर्यादा सध्याच्या १.२५ लाखांवरून २ लाख रुपये करावी.
  2. दोन ते तीन वर्षे गुंतवणुकीवर फक्त ५ टक्के कर आकारण्यात यावा.
  3. तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या गुंतवणुकीवर कर पूर्णपणे रद्द करण्याची शिफारस.
  4. एसटीटी (STT) मध्ये ५०% वाढ करून तोटा भरून काढण्याचा पर्याय.
  5. म्युच्युअल फंड रिडेम्प्शनवर ९० दिवसांत पुनर्गुंतवणूक केल्यास सूट.

कर रद्द केल्यामुळे होणारा महसुली तोटा भरून काढण्यासाठी एसबीआय रिसर्चने ‘सिक्युरिटीज ट्रान्सझॅक्शन टॅक्स’ (STT) ५० टक्क्यांनी वाढवण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे आर्थिक वर्ष २०२८ मध्ये सरकारला सुमारे ४५,००० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळू शकतो, ज्यामुळे एलटीसीजी बंद केल्याचा तोटा भरून निघेल.

याशिवाय, म्युच्युअल फंडातून पैसे काढून जर ते ९० दिवसांच्या आत पुन्हा पात्र इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवले गेले, तर त्यावर तात्काळ एलटीसीजी कर न लावता तो पुढे ढकलण्यात यावा, अशीही शिफारस करण्यात आली आहे.

भारतीय शेअर बाजारातून होणारी परदेशी भांडवलाची आवक वाढवण्यासाठी आणि जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे एसबीआय रिसर्चने या अहवालातून सांगितले आहे.