Investor Warning Finfluencers Fake Returns Alert SEBI: भांडवली बाजारात सामान्य गुंतवणूकदारांचा सहभागात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, सेबीचे अध्यक्ष तुहिन कांत पांडे यांनी ५ ऑक्टोबर रोजी गुंतवणूकदारांना सावध केले. त्यांनी फिनफ्लुएन्सर्स, निनावी टिप्स आणि परताव्याबाबतच्या अतिशयोक्तीपूर्ण दाव्यांवर विसंबून न राहण्याचा इशारा दिला.

चंदीगड येथील पंजाब विद्यापीठात सेबीच्या ‘प्रोजेक्ट जागृत’च्या शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना पांडे म्हणाले, “गुंतवणुकीतील फसवणुकीपासून सावध रहा, निनावी टिप्स, फिनफ्लुएन्सर्स किंवा मोठ्या परताव्याच्या दाव्यांवर विश्वास न ठेवता, नियमन केलेल्या उत्पादनांचा, माध्यमांचा आणि संस्थांचा वापर करा.”

त्यांनी गुंतवणूकदारांना केवळ आपल्याला समजतील अशाच उत्पादनांमध्ये पैसे गुंतवण्याचे, गुंतवणुकीला लवकर सुरुवात करण्याचे, दीर्घ काळासाठी गुंतवणूक कायम ठेवण्याचे आणि आपल्या गुंतवणुकीत विविधता आणण्याचे आवाहनही केले.

“केवळ कोणीतरी सांगितले म्हणून किंवा इतर सर्वजण गुंतवणूक करत आहेत म्हणून गुंतवणूक करू नका. तुम्हाला समजले आहे म्हणून गुंतवणूक करा”, असे पांडे म्हणाले.

पांडे यांनी सांगितले की, गेल्या दशकात भारताची भांडवली बाजारपेठ अधिक व्यापक आणि सुलभ झाली आहे. यामध्ये डीमॅट खात्यांची संख्या २३.८ कोटींपर्यंत वाढली असून, स्वतंत्र गुंतवणूकदारांची संख्या सुमारे १५ कोटींवर पोहोचली आहे. बाजार भांडवल २०१५-१६ या आर्थिक वर्षातील सुमारे ९५ लाख कोटी रुपयांवरून वाढून आता सुमारे ४७२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, तर परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची मालमत्ता सुमारे २२ लाख कोटी रुपयांवरून वाढून सुमारे ७८ लाख कोटी रुपये झाली आहे.

म्युच्युअल फंड कंपन्यांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेतही (AUM) वाढ झाली असून, ती एका दशकापूर्वीच्या सुमारे १२ लाख कोटी रुपयांवरून वाढून आता सुमारे ८७ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. पांडे म्हणाले की, बाजारपेठेतील वाढत्या सुलभतेसोबतच गुंतवणूकदारांमध्ये त्याबाबतची अधिक समज असणेही आवश्यक आहे.

सेबीसमोरील आव्हानांविषयी बोलताना, सेबीचे अध्यक्ष तुहीन कांत पांडे म्हणाले, “पहिल्यांदाच गुंतवणूक करणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदारांच्या बाबतीत आमची सर्वात मोठी चिंता म्हणजे गुंतवणुकीतील फसवणुकीत झालेली वाढ. अनेक प्रकरणांमध्ये, या प्रत्यक्षात गुंतवणुकीशी संबंधित नसलेल्या फसवणुकी असतात. पैसे सिक्युरिटीज मार्केटमध्ये येतच नाहीत, तरीही पीडितांना असा विश्वास दिला जातो की ते सिक्युरिटीज मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत. या फसवणुकी अनेकदा बनावट ॲप्स आणि बनावट व्यक्तींमार्फत केल्या जातात. पीडितांना काय घडले आहे हे लक्षात येऊन ते सायबर पोलिसांकडे जाईपर्यंत, अनेकदा खूप उशीर झालेला असतो.”