Futures and Options Loss Report explains Retail Traders F&O Loss FY26 trends and market: आर्थिक वर्ष २०२६ मध्ये भारताच्या फ्युचर्स आणि ऑप्शन्स बाजारातील वैयक्तिक ट्रेडर्सच्या संख्येत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. तरीही, जे टिकून राहिले त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे गमावले आहेत. फ्युचर्स आणि ऑप्शन्समधील ट्रेडर्सच्या नफ्यासंबंधीच्या सेबीच्या एका नवीन अभ्यासानुसार, एकूण तोटा कमी झाला असला तरी, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ८७.७ टक्के वैयक्तिक ट्रेडर्सना निव्वळ तोटा झाला आहे.

या अभ्यासातून सेबीच्या निदर्शनास आले आहे की, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ट्रेडर्सची संख्या १८ टक्क्यांनी घटून ८७.५ लाखांवर आली आहे. ही घट विशेषतः लहान ट्रेडर्समध्ये अधिक दिसून आली असून, बाजारात नव्याने येणाऱ्यांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे.

एकूण तोट्यात घट झाली पण…

वैयक्तिक ट्रेडर्सच्या एकूण निव्वळ तोट्यात सुमारे १८ टक्के घट झाली आहे. आर्थिक वर्ष २०२५ मधील १,११,७८८ कोटी रुपयांवरून तो आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ९१,६८५ कोटी रुपयांवर आला आहे.

आर्थिक वर्ष २०२२ ते २०२६ या कालावधीत एकूण तोट्यात झालेली ही पहिलीच वार्षिक घट होती. तरीही, तोट्याचा हा आकडा आधीच्या वर्षांच्या तुलनेत बऱ्याच प्रमाणात जास्तच राहिला. आर्थिक वर्ष २०२२ ते २०२६ दरम्यान, वैयक्तिक ट्रेडर्सना एकूण सुमारे ३.८५ लाख कोटी रुपयांचा निव्वळ तोटा सहन करावा लागला होता.

महत्त्वाची बाब म्हणजे, प्रति ट्रेडर सरासरी तोट्यात प्रत्यक्षात वाढ झाली आहे. तो आर्थिक वर्ष २०२५ मधील सुमारे १.१४ लाख रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२६ मध्ये १.१७ लाखा रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच त्यात २.४ टक्के वाढ झाली. थोडक्यात सांगायचे तर, ट्रेडिंग करणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली असली, तरी ज्यांना तोटा झाला त्यांच्यासाठी आर्थिक फटका मोठाच राहिला.

ऑप्शन्समध्ये सर्वाधिक जोखीम

या अभ्यासातून समोर आलेला सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे किरकोळ गुंतवणूकदारांच्या तोट्यामध्ये ऑप्शन्सचा सर्वाधिक वाटा आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये एकूण वैयक्तिक तोट्यापैकी ९२ टक्के तोटा ऑप्शन्समुळे झाला आहे. फ्युचर्स ट्रेडर्सच्या तुलनेत ऑप्शन्स ट्रेडर्समध्ये नुकसान झालेल्यांचे प्रमाणही खूप जास्त होते. सुमारे ८७.७ टक्के ऑप्शन्स ट्रेडर्सनी पैसे गमावले, तर फ्युचर्स ट्रेडर्सपैकी सुमारे ६६ टक्के जणांनी पैसे गमावले.