SEBI Pump and Dump Scam : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्याला कायम अभ्यासपूर्ण निर्णय घेण्याचा सल्ला दिला जातो. कारण, बाजारात अनेक आकर्षक वाटणाऱ्या अनेक फ्रॉड गोष्टी होऊ शकतात. अशाच एका प्रकरणात देशातील भांडवली बाजार नियामक संस्था ‘सेबी’ने बाजारातील गैरव्यवहार रोखण्यासाठी मोठी कारवाई केली आहे. गेल्या आठवड्यात तीन दिवस चाललेल्या या धडक मोहिमेत मुंबई, बंगळुरू, हैदराबाद आणि विशेषतः भुज या शहरांमध्ये छापेमारी करण्यात आली. ‘पंप-अँड-डंप’ स्कीमद्वारे शेअर्सच्या किमती कृत्रिमरीत्या फुगवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश या कारवाईत करण्यात आला आहे.
काय आहे ‘पंप-अँड-डंप’ स्कीम?
या गैरव्यवहारात काही ठराविक शेअर्सच्या किमती चुकीच्या पद्धतीने वाढवल्या जातात (पंप करणे). जेव्हा सामान्य गुंतवणूकदार वाढत्या किमती पाहून आकर्षित होतात आणि गुंतवणूक करतात, तेव्हा हे सूत्रधार उच्च किमतीवर आपले सर्व शेअर्स विकून बाहेर पडतात (डंप करणे). परिणामी, शेअरचा भाव अचानक कोसळतो आणि सामान्य गुंतवणूकदारांचे मोठे आर्थिक नुकसान होते.
सेबीच्या रडावर २ कंपन्या?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेबी एका छोट्या इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनीची आणि एका ड्रिप इरिगेशन कंपनीची सखोल चौकशी करत आहे. कंपनीची आर्थिक स्थिती बेताची असतानाही गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ‘बोनस शेअर्स’ जाहीर करण्यात आले. ह्या बोनसचा वापर शेअरची किंमत वाढवण्यासाठी केल्याचा सेबीला संशय आहे. आरएम ड्रिप अँड स्प्रिंकलर्स सिस्टम या कंपनीने रविवारी (२६ एप्रिल) स्पष्ट केले की, २२-२३ एप्रिल रोजी त्यांच्या प्रवर्तकांच्या घरी आणि कार्यालयात झडती घेण्यात आली. मात्र, यामुळे व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा कंपनीने केला आहे.
गुजरात कनेक्शन
या कारवाईत गुजरातचे भुज हे शहर महत्त्वाचे केंद्र म्हणून समोर आले आहे. शेअर बाजारातील हेराफेरीचे जाळे आता केवळ मुंबई किंवा दिल्लीसारख्या मोठ्या शहरांपुरते मर्यादित नसून छोट्या शहरांपर्यंत पसरले असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. सेबीने या कारवाईदरम्यान अनेक डिजिटल रेकॉर्ड्स, कागदपत्रे आणि संभाषणाचे पुरावे जप्त केले आहेत.
गुंतवणूकदारांसाठी धोक्याचा इशारा
सेबीची ही कारवाई गुंतवणूकदारांसाठी एक धडा आहे. कोणत्याही छोट्या कंपनीचे शेअर्स अचानक वाढू लागल्यास किंवा कंपनीची आर्थिक स्थिती नसतानाही बोनस किंवा सवलती जाहीर करत असल्यास सावध राहावे. ट्रेडिंग पॅटर्न आणि फंडांच्या ओघामध्ये अनियमितता आढळल्यास सेबी अशा प्रकरणांत कठोर पावले उचलत आहे.
