इराण युद्धामुळे गेली काही आठवडे तोट्यात असलेले भारतीय शेअर बाजाराने गेल्या तीन दिवसांत जोरदार तेजी अनुभवली होती. मात्र, इराण युद्ध तीव्र होत असल्याने आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर जैसे थे ठेवल्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांच्या भावना कमकुवत झाल्या आहेत. परिणामी, याचा जगभरातील बाजारांसह भारतीय शेअर बाजारांनाही फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.
बाजार सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच, गुंतवणूकदारांना बाजार भांडवलात ७ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचे नुकसान सोसावे लागले. ज्यामुळे मुंबई शेअर बाजाराचे एकूण बाजार भांडवल घसरून ४३२ लाख कोटी रुपयांवर आले.
आज सकाळी ९:१५ वा. सेन्सेक्स १,६१९.४० अंशांच्या घसरणीसह उघडला, तर निफ्टी ५० निर्देशांक ४९५.२५ अंशांच्या घसरणीसह उघडला आहे.
सकळी १०: ०० वाजता सेन्सेक्स १,८०७.४१ अंशांनी कोसळून ७४,८९६.७२ वर व्यवहार करत होता. तर निफ्टी ५० निर्देशांक ५४४.१५ अंशांच्या घसरणीसह २३,२३३.६५ अंशांवर व्यवहार करत होता.
दुपारी २:०४ वाजता, सेन्सेक्स २०८६.९२ अंशांनी (किंवा २.७२%) घसरून ७४,६१७.२१ वर होता, तर निफ्टी ६४९.८५ अंशांनी (किंवा २.७३%) घसरून २३,१२७.९५ वर होता.
यानंतर दुपारी ०३: ३० वा सेन्सेक्स २४९६.८९ अंशांनी (किंवा ३.२६ टक्क्यांनी) घसरून ७४,२०७.२४ अंशांवर, तर निफ्टी ७७५.६५ अंशांनी (किंवा ३.२६ टक्क्यांनी) खाली येत २३,००२.१५ अंशांवर बंद झाला.
बाजारातील घसरणीमागील प्रमुख घटक
१) कच्च्या तेलाच्या किमतींमधील वाढ:
इराण युद्धातील तणाव पुन्हा वाढल्यामुळे, ‘ब्रेंट क्रूड’च्या किमती प्रति बॅरल ११० डॉलर्सच्या वर गेल्या आहेत.
२) भू-राजकीय चिंता:
आपल्या ‘साउथ पार्स’ वायू क्षेत्रावर झालेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरार्थ, इराणने बुधवारी मध्य-पूर्वेकडील अनेक ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केले. यामुळे अमेरिका आणि इस्रायल यांच्याशी सुरू असलेल्या इराणच्या युद्धात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले.
३) ‘फेड’ची आक्रमक भूमिका:
इराण युद्धाचा परिणाम म्हणून ऊर्जा किमतींमध्ये झालेली वाढ आणि त्यातून निर्माण होणारे धोके लक्षात घेऊन, अमेरिकेच्या ‘फेडरल रिझर्व्ह’ने बुधवारी आपल्या प्रमुख व्याजदरांमध्ये कोणताही बदल न करता, एक आक्रमक भूमिका स्वीकारली.
युद्धाच्या भीतीमुळे तेलाचे दर वधारले; ‘फेड’च्या भूमिकेमुळे सावधगिरी
“युद्धाशी संबंधित अनिश्चितता अधिकच गडद झाली आहे. याचे कारण म्हणजे इस्रायलने इराणमधील जगातील सर्वात मोठ्या एलएनजी रिफायनरीवर हल्ला केला आहे. यामुळे ‘ब्रेंट क्रूड’चे दर झपाट्याने वाढत जाऊन १११ डॉलर्सच्या पातळीवर पोहोचले आहेत. भारतसारख्या तेल आणि वायू आयातदार देशांसाठी ही एक चिंतेची बाब आहे. जर ‘ब्रेंट क्रूड’चे दर दीर्घकाळापर्यंत ११० डॉलर्सच्या वरच राहिले, तर त्याचे भारताच्या स्थूल आर्थिक निर्देशकांवर नकारात्मक परिणाम होतील. आर्थिक वर्ष २०२७ मध्ये भारताची जीडीपी वाढ आणि कॉर्पोरेट नफ्यावरही याचा परिणाम दिसून येईल. पण, वेगाने बदलणाऱ्या सध्याच्या परिस्थितीत, हेच चित्र प्रत्यक्षात येईलच असे नाही. युद्ध दीर्घकाळ चालू राहणे कोणाच्याच हिताचे नाही. त्यामुळे, युद्ध अचानक संपुष्टात येऊन कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही”, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार डॉ. व्ही.के. विजयकुमार यांनी नमूद केले.
