Sensex crash today: जागतिक बाजारातील कमकुवत संकेत आणि वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय शेअर बाजाराची सुरुवात बुधवारी मोठ्या घसरणीसह झाली. तसेच कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, रुपयातील अस्थिरता आणि संस्थात्मक गुंतवणुकीचा अनिश्चित प्रवाह यामुळे बाजारातील गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम झाला.

२० मे रोजी सकाळी ९:१५ वाजता, सेन्सेक्स ६१५.८८ अंशांनी (किंवा ०.८२ टक्क्यांनी) घसरून ७४,५८४.९७ वर पोहोचला, तर निफ्टी १९५.९० अंशांनी (किंवा ०.८३ टक्क्यांनी) घसरून २३,४२२.१० वर आला.

सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून ‘ग्रीनबॅक’ची (अमेरिकन डॉलरची) वाढती मागणी आणि परकीय भांडवलाचा बहिर्प्रवाह यांमुळे, २० मे रोजी भारतीय रुपयाचे मूल्य अमेरिकन डॉलरच्या तुलनेत घसरून ९६.८९ या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचले. सलग नवव्या दिवशी नोंदवल्या गेलेल्या या विक्रमी घसरणीमुळे देशांतर्गत बाजारांवर आणखी दबाव निर्माण झाला.

जागतिक शेअर बाजार कोसळले

भारतीय शेअर बाजारासह आज जगभरातील प्रमुख शेअर बाजारांमध्येही घसरण पाहायला मिळाली. आशियामध्ये, दक्षिण कोरियाचा कोस्पी २% पेक्षा जास्त कोसळला, तर जपानचा निक्केई सुमारे १.५% ने खाली आला. हाँगकाँगचा हँग सेंग आणि चीनचा शांघाय कंपोझिट प्रत्येकी सुमारे ०.५% ने घसरले.

काल वॉल स्ट्रीट मोठ्या घसरणीसह बंद झाला होता, ज्यात तंत्रज्ञान कंपन्यांचा समावेश असलेला नॅसडॅक ०.९% आणि एस अँड पी ५०० निर्देशांक ०.७% ने खाली आला होता. पण, मंगळवारी युरोपीय बाजारपेठा संमिश्र स्थितीत बंद झाल्या, ज्यात यूकेचा एफटीएसई आणि जर्मनीचा डॅक्स किरकोळ वाढीसह तेजीत बंद झाले.

बाजारात काय काय घडले?

मंगळवारी झालेल्या मागील सत्रात, सेन्सेक्स ११४.१९ अंशांनी (किंवा ०.१५%) घसरून ७५,२००.८५ अंशांवर स्थिरावला होता. तर निफ्टी ३१.९५ अंशांनी (किंवा ०.१४%) घसरून २३,६१८ अंशांवर बंद झाला होता.ो

NSE च्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, रुपयाचे अवमूल्यन होण्याची भीती आणि बाजारात तेलाचे दर वाढल्यामुळे, परदेशी गुंतवणूकदारांनी मंगळवारच्या सत्रात एकाच दिवशी २,४५७.४९ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.

परदेशी गुंतवणूकदारांनी आपल्याकडील शेअर्सची विक्री केली असली, तरीही देशांतर्गत गुंतवणूकदार हे प्रमुख निर्देशांकांसाठी मुख्य आधार ठरले. कारण या देशांतर्गत गुंतवणूकदारांनी मंगळवारी ३,८०१.६८ कोटींच्या शेअर्सची खरेदी केली.