Stock Market Fall US Iran Strait of Hormuz Conflict: कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे आक्रमक धोरण या पार्श्वभूमीवर, जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी ५० गुरुवारी (आज) घसरणीसह उघडले.

या तीव्र घसरणीमुळे मुंबई शेअर बाजारात (BSE) सूचीबद्ध असलेल्या सर्व कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलातून ३ लाख कोटींहून अधिक रक्कम कमी झाली आणि ती ४६५ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आली.

सेन्सेक्स ६७४.७८ अंशांनी (किंवा ०.८७ टक्क्यांनी) घसरून ७६,८२१.५८ वर पोहोचला, तर निफ्टी २१३.२० अंशांनी (किंवा ०.८८ टक्क्यांनी) घसरून २३,९६४.४५ वर उघडला. यादरम्यान सुमारे ८७३ शेअर्समध्ये वाढ झाली, १३७१ शेअर्समध्ये घसरण झाली आणि १३७ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.

सकाळी १० वाजता सेन्सेक्स १,०११.५४ अंशांनी (किंवा १.३१ टक्क्यांनी) घसरून ७६,४८४.८२ वर, तर निफ्टी ३२१.४५ अंशांनी (किंवा १.३३ टक्क्यांनी) घसरून २३,८५६.२० वर व्यवहार करत होता. सुमारे १,१३० शेअर्समध्ये वाढ झाली, २,१७८ शेअर्समध्ये घसरण झाली आणि १४६ शेअर्स स्थिर राहिले.

अमेरिका-इराण संघर्ष

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या प्रस्तावाबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर, इराण सरकारने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत अमेरिका आपली नाकेबंदी उठवत नाही आणि युद्ध थांबवत नाही, तोपर्यंत ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) पुन्हा खुली केली जाणार नाही.

जागतिक अर्थव्यवस्थेचे आणखी नुकसान होण्याची चिंता

ट्रम्प यांना एक अधिक व्यापक करार हवा आहे, ज्याद्वारे इराणचा अणुकार्यक्रम संपुष्टात येईल आणि इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम तसेच प्रादेशिक हस्तकांना दिला जाणारा पाठिंबा यांसारख्या इतर मुद्द्यांचेही निराकरण होईल. दरम्यान, या सामुद्रधुनीची नाकेबंदी कायम असल्याने इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत आणि यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.

यूएस फेडच्या बैठकीचा निष्कर्ष

यूएस फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष म्हणून जेरोम पॉवेल यांची अखेरची धोरणात्मक बैठक अपेक्षेनुसारच पार पडली. अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेली अनिश्चितता अद्यापही कायम असल्याने, ‘फेडरल ओपन मार्केट कमिटी’ने (FOMC) सलग तिसऱ्या धोरणात्मक बैठकीतही प्रमुख व्याजदर ३.५% ते ३.७५% या पातळीवरच स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या निर्णयाचा भारतीय शेअर बाजारांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

शेअर बाजारात काल काय घडले?

भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवारी वाढीसह बंद झाले. निफ्टी ५० निर्देशांक १८२ अंशांनी आणि सेन्सेक्स ६०९ अंशांनी वधारून बंद झाल्याने, निर्देशांकांनी जोरदार पुनरागमन केले. याचबरोबर रिअल्टी आणि एफएमसीजी निर्देशांकांनी १.७५% पेक्षा जास्त वाढीसह उत्कृष्ट कामगिरी केली, तर निवडक सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि मीडिया कंपन्यांच्या शेअर्समध्ये दिवसभरात नफावसुली दिसून आली. तांत्रिकदृष्ट्या, दिवसभरातील आश्वासक तेजीनंतर, बाजारात उच्च स्तरावर नफावसुली झाली. पण, बाजाराचा अल्पकालीन दृष्टिकोन सकारात्मक आहे.