मुंबई : भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांचे आलेले मजबूत तिमाही आकडेवारी आणि जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे दलाल स्ट्रीटवर आज तेजीची लाट आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स ६०० हून अधिक अंशांनी वधारत ७८,३०० च्या पार गेला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ १७० हून अधिक अंशांच्या वाढीसह २४,४५० च्या पातळीवर पोहोचला.
बाजार उघडताच चौफेर खरेदी झाली आणि एकूणच गुंतवणूकदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
बाजारातील या ‘महा-तेजी’मागील ४ मुख्य कारणे:
१) बँकांची उत्साहवर्धक कामगिरी : शनिवार-रविवार दरम्यान देशातील आघाडीच्या बँकांनी पहिल्या तिमाहीचे (Q1) तात्पुरते आकडे जाहीर केले, जे अपेक्षेपेक्षा अत्यंत उत्कृष्ट राहिले. देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसीच्या एकूण कर्जांमध्ये १५.४ टक्के, तर ठेवींमध्ये १४.७ टक्क्यांची मजबूत वाढ झाली आहे. याशिवाय Axis Bank ने १८.८ टक्के आणि Kotak Mahindra Bank ने १५.१ टक्क्यांची कर्ज वाढ नोंदवली आहे. यामुळे निफ्टी बँक इंडेक्स सुमारे ०.८५ टक्क्यांनी वधारला.
२) परदेशी गुंतवणूकदारांची पुन्हा खरेदी: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विक्री करणाऱ्या परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) बाजारात पुन्हा खरेदीचा जोर धरला आहे. शुक्रवारच्या सत्रात परदेशी गुंतवणूकदारांनी तब्बल १,३५५ कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली. जागतिक स्तरावर ‘आयटी शेअर्स’मधील तेजी काहीशी मंदावल्याने परदेशी पैशांचा ओघ आता भारताकडे वळत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
३) कच्च्या तेलाचे घसरलेले भाव: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि पर्यायाने शेअर बाजारासाठी सर्वात दिलासादायक बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ७२ डॉलर्सच्या खाली आल्या आहेत. कच्च्या तेलाचे दर घसरल्याने देशांतर्गत महागाई नियंत्रणात राहण्यास मदत होते, ज्याचा थेट फायदा बाजाराला मिळाला.
४) मेटल आणि रिअल्टी शेअर्समध्ये चमक: आजच्या तेजीमध्ये केवळ बँकाच नाही, तर मेटल (धातू) आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील शेअर्सनीही मोठी कामगिरी केली. वेलस्पन कॉर्प सारख्या शेअर्समध्ये ४ टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने मेटल इंडेक्स वधारला. तसेच लोढा डेव्हलपर्स, गोदरेज प्रॉपर्टीज आणि ओबेरॉय रिअल्टीमध्ये २ ते ३ टक्क्यांची तेजी आल्याने निफ्टी रिअल्टी इंडेक्स १.५ टक्क्यांनी वधारला.
आयटी शेअर्समध्ये मात्र नफावसुली
एकीकडे बाजारात सर्वत्र तेजीचे वातावरण असताना, दुसरीकडे माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील शेअरवर मात्र काहीसा दबाव पाहायला मिळाला. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ (टीसीएस) चा शेअर १ टक्क्यांहून अधिक घसरला, ज्यामुळे निफ्टी आयटी निर्देशांक लाल चिन्हात व्यवहार करत होता.
विश्लेषकांचा अंदाज काय?
बाजार तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत निफ्टी २४,१५० ची पातळी टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरतोय, तोपर्यंत बाजारातील तेजीचा कल सकारात्मक राहील. जर निफ्टीने २४,४०० च्या वर आपली पकड मजबूत केली, तर आगामी काही दिवसांत बाजार २४,६०० ते २४,८०० च्या नव्या विक्रमी पातळीकडे कूच करू शकतो. मात्र, जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे बाजारात किरकोळ चढ-उतार पाहायला मिळू शकतात.
