Sergio Gor Comments Impact On Indian Stock Market: अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर यांनी भारत-अमेरिकेत सुरू असलेल्या व्यापार चर्चांवर केलेल्या टिप्पणीनंतर गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला असून, सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांनी सोमवारी दिवसाच्या नीचांकी पातळीवरून जोरदार उसळी घेतली.

यापूर्वी सेन्सेक्स ७१५.१७ अंकांनी, म्हणजेच ०.८५ टक्क्यांनी घसरून ८२,८६१.०७ च्या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचला होता. तर निफ्टी २५,५०० च्या खाली घसरून २५,४७३.४० वर आला होता.

मात्र, सर्जियो गोर यांनी दोन्ही देश व्यापार करार करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितल्यानंतर भारतीय शेअर बाजार वेगाने सावरला. “दोन्ही देश व्यापार करारावर सक्रियपणे चर्चा करत आहेत आणि व्यापारावरील पुढील चर्चा उद्या होईल”, असे ते म्हणाले. गोर यांनी पुढे असेही सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील एक ते दोन वर्षांत भारताला भेट देण्याची शक्यता आहे, त्यानंतर एक सकारात्मक सूरही बाजारात उमटला.

या विधानांनंतर सेन्सेक्सने दिवसाच्या नीचांकी पातळीवरून ८५० अंकांची वाढ नोंदवली. दुपारी १:३० वाजता सेन्सेक्स सुमारे ८३,६४९.७५ वर व्यवहार करत होता, तर निफ्टी सुमारे २५,७१६.२५ पर्यंत पोहोचला होता.

दरम्यान अमेरिकेसाठी भारताइतका दुसरा कोणताही देश महत्त्वाचा नाही आणि दोन्ही देश व्यापार करार निश्चित करण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करत आहेत, असे अमेरिकेचे नियुक्त राजदूत सर्जियो गोर यांनी सोमवारी सांगितले. खऱ्या मित्रांमध्ये मतभेद असू शकतात, परंतु ते नेहमीच शेवटी आपले मतभेद सोडवतात, असे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा संदर्भ गोर आपल्या भाषणात म्हणाले.

“भारत हा जगातील सर्वात मोठा देश आहे. त्यामुळे हा करार अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचवणे हे सोपे काम नाही, परंतु आम्ही ते साध्य करण्यासाठी निश्चयी आहोत”, असे ते अमेरिकन दूतावासाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित एका कार्यक्रमात म्हणाले.

“जरी व्यापार आमच्या संबंधांसाठी खूप महत्त्वाचा असला तरी, आम्ही सुरक्षा, दहशतवादाचा विरोध, ऊर्जा, तंत्रज्ञान, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या इतर अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रांमध्येही एकत्र मिळून काम करत राहू”, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत जगभर प्रवास केला आहे आणि मी खात्रीने सांगू शकतो की पंतप्रधान मोदी यांच्यासोबतची त्यांची मैत्री खरी आहे”, असे त्यांनी पुढे सांगितले.

गोर यांनी अशीही घोषणा केली की भारत पॅक्स सिलिका देशांच्या गटाचा सदस्य होईल. “मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारताला पुढील महिन्यात या देशांच्या गटामध्ये पूर्णवेळ सदस्य म्हणून सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाईल,” असे ते म्हणाले.