वृत्तसंस्था, नवी दिल्ली: आजकालच्या डिजिटल युगात कृत्रिम प्रज्ञा अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स-एआयचा वापर केवळ लेखन किंवा सर्चिंगपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो आता थेट लोकांच्या खिशाशी म्हणजेच आर्थिक गुंतवणुकीशी जोडला गेला आहे. भारतातील फिनटेक कंपन्या आणि ट्रेडिंग ॲप्स आता ‘AI’ चा वापर करून शेअर निवडणे, पोर्टफोलिओ मॅनेज करणे आणि थेट मार्केटचा अचूक अंदाज लावण्याचे दावे करत आहेत.

परंतु, प्रश्न असा पडतो की, जेव्हा थेट स्वतःचे कष्टाचे पैसे गुंतवण्याची वेळ येते, तेव्हा या AI टूल्सवर कितपत विश्वास ठेवावा? या वाढत्या ट्रेंडच्या पार्श्वभूमीवर, भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने गुंतवणूकदारांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत.

फिनटेक क्षेत्रात AI ची वाढती क्रेझ

आतापर्यंत आर्थिक सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर मर्यादित होता, मात्र आता फिनटेक ॲप्सच्या मार्केटिंगमध्ये ‘AI फीचर्स’ हाच मुख्य आधार बनला आहे. “कमी त्रासात अधिक अचूक निर्णय”, चार्ट्सचा अभ्यास न करता थेट शेअर्सच्या खरेदी-विक्रीचे सल्ले दिले जातात. डेटा प्रोसेसिंग, रिस्क मॅनेजमेंट, आणि गुंतवणूकदारांना त्यांच्या प्रोफाईलनुसार म्युच्युअल फंड किंवा शेअर सुचवण्यासाठी AI चा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे.

रिअॅलिटी चेक: AI नेहमीच बरोबर असतो?

AI टूल्स भूतकाळातील आकडेवारीवरून शिकतात आणि पॅटर्न ओळखतात. त्यामुळे काही धोके स्पष्टपणे समोर आले आहेत. अचानक होणाऱ्या घडामोडींबाबत त्याला अंदाज बांधता येत नाही. बजेटमधील बदल, निवडणुकांचे निकाल, भू-राजकीय तणाव (उदा. युद्ध परिस्थिती) किंवा अनपेक्षित जागतिक संकटांचा अंदाज लावण्यात एआय मॉडेल्स अपयशी ठरतात. जर AI ला दिलेला डेटा अपूर्ण किंवा चुकीचा असेल, तर त्याचे सल्ले देखील पूर्णपणे चुकू शकतात. “मशीन कधीच चुकत नाही” या भ्रमात राहून किरकोळ गुंतवणूकदार अनेकदा गरजेपेक्षा जास्त जोखीम घेतात आणि मोठ्या आर्थिक नुकसानाला बळी पडतात.

‘SEBI’ चे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे काय सांगतात?

गुंतवणूकदारांचे नुकसान टाळण्यासाठी सेबीने ‘Responsible Usage of AI’ (AI चा जबाबदार वापर) या अंतर्गत कडक नियमावली स्पष्ट केली आहे:
भारतीय कायद्यानुसार, कोणताही सल्ला देणारे ॲप केवळ AI च्या भरवशावर टिप्स देऊ शकत नाही. AI केवळ शेअर्स फिल्टर किंवा शॉर्टलिस्ट करू शकते, परंतु अंतिम मंजुरी ही SEBI-registered Research Analyst (RA) किंवा Investment Advisor (RIA) या व्यक्तीचीच असावी लागते. सेबीच्या परवान्याशिवाय केवळ ‘AI स्टॉक टिप्स’ देणारे प्लॅटफॉर्म्स पूर्णपणे बेकायदेशीर आहेत.

ॲप्सना त्यांच्या AI अल्गोरिदमची भूतकाळातील अचूकता आणि मर्यादा ग्राहकांसमोर उघड करणे बंधनकारक आहे. “नफ्याची हमी (Guaranteed Returns)” देणाऱ्या कोणत्याही अवाजवी दाव्यांवर सेबीने बंदी घातली आहे.

गुंतवणूकदारांसाठी सल्ला: काय काळजी घ्यावी?

गुंतवणूकदार वापरत असलेले AI आधारित ॲप सेबीकडे नोंदणीकृत आहे का, याची खात्री sebi.gov.in वर जाऊन करा. तज्ज्ञांच्या मते, १०० टक्के मशीनवर अवलंबून न राहता, AI चा वापर फक्त माहिती गोळा करण्यासाठी (Data Screening) करावा आणि अंतिम निर्णय स्वतःच्या अभ्यासाने किंवा नोंदणीकृत मानवी सल्लागाराच्या मदतीनेच घ्यावा. अल्गोरिदम ट्रेडिंग करताना तांत्रिक बिघाड झाल्यास होणारे नुकसान टाळण्यासाठी ॲपमध्ये योग्य रिस्क लिमिट्स असणे आवश्यक आहे. AI हे तुमची गुंतवणूक सोपी करण्याचे एक माध्यम असू शकते, परंतु ते तुमच्या फायद्या-तोट्याची अंतिम जबाबदारी घेऊ शकत नाही. ‘शॉर्टकट’ च्या नादात न पडता सतर्क राहूनच गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.