मुंबई : खनिज तेलाच्या किमतीतील घसरण आणि जागतिक बाजारातील तेजीच्या परिणामी गुंतवणूकदारांच्या दुणावलेल्या विश्वासाने, देशांतर्गत आघाडीवर प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी मंगळवारी सलग चौथ्या सत्रात वधारले. माहिती-तंत्रज्ञान (आयटी) समभागांमधील खरेदीमुळे निर्देशांकांना सुरुवातीच्या घसरणीला झटकून फेरउभारीचे बळ मिळाले.
मंगळवारच्या अस्थिर सत्रात सेन्सेक्सने तब्बल १,४०३.९१ अंशांचा चढ-उताराचा खेळ दाखविला. दिवसअखेर तो ५०९.७३ अंशांनी, म्हणजेच ०.६९ टक्क्यांनी वधारून ७४,६१६.५८ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात, त्याने ७४,६८६.३२ चा उच्चांक आणि ७३,२८२.४१ ची नीचांकी पातळी गाठली होती. दुसरीकडे निफ्टी १५५.४० अंशांनी, म्हणजेच ०.६८ टक्क्यांनी वधारून २३,१२३.६५ पातळीवर बंद झाला.
निवडक क्षेत्रांमधील समभागांमध्ये झालेल्या मूल्यात्मक खरेदीमुळे भांडवली बाजारात चैतन्याचे वातावरण दिसून आले आणि दिवसाअखेर जोरदार तेजीत ते परिवर्तित झाले. परिणामी अन्य प्रमुख निर्देशांक असलेल्या निफ्टीनेही सुरुवातीचे नुकसान भरून काढत पुन्हा उच्च पातळी गाठली. आयटी अर्थात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांनी या तेजीचे नेतृत्व केले.
खनिज तेलाच्या वाढलेल्या किमती आणि इराणसाठी ट्रम्प यांनी दिलेल्या अंतिम मुदतीबाबत सावधगिरी यामुळे सत्राची सुरुवात कमकुवत राहिली आणि पूर्वार्धात बाजारात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता होती. तरी, देशांतर्गत बाजारात सुधारणेचा कल कायम राहिला. बाजारातील वाढ प्रामुख्याने आयटी, ग्राहकोपयोगी वस्तू (एफएमसीजी) आणि धातू क्षेत्रापुरतीच मर्यादित राहिली, असे निरीक्षण जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचसीएल टेक, इन्फोसिस, भारती एअरटेल, सन फार्मा आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांची कामगिरी चमकदार राहिली. तर इंटरग्लोब एव्हिएशन, अदानी पोर्ट्स, महिंद्र अँड महिंद्र आणि टायटन या कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण झाली.
