मुंबई : सलग चार सत्रांतील घसरणीनंतर देशांतर्गत भांडवली शेअर बाजाराने मंगळवारी जोरदार पुनरागमन केले. माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील समभागांमध्ये झालेल्या दमदार खरेदीमुळे सेन्सेक्स ३८२.५० अंशांनी वधारून ७४,६४९.८४ अंशांवर बंद झाला. तर निफ्टी निर्देशांक १००.९५ अंशांच्या वाढीसह २३,४८३.५५ अंशांवर स्थिरावला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने ७४,८६२.१९ अंशांचा उच्चांक गाठला होता.

बाजार विश्लेषकांच्या मते, अमेरिकेतील प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांच्या मजबूत आर्थिक निकालांमुळे आणि कृत्रिम प्रज्ञा (एआय), क्लाऊड सेवा तसेच एंटरप्राइझ तंत्रज्ञानावरील खर्च वाढण्याच्या अपेक्षेमुळे आयटी समभागांमध्ये खरेदी वाढली. परिणामी बीएसई आयटी निर्देशांक तब्बल ४.४० टक्क्यांनी वधारला. पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव कायम असतानाही जागतिक गुंतवणूकदारांचा जोखीम घेण्याचा कल कायम राहिल्याचे चित्र दिसले. तसेच मोठ्या भांडवली मूल्याच्या समभागांमध्ये सातत्याने होत असलेल्या गुंतवणुकीमुळे बाजाराला आधार मिळाला.

आयटी क्षेत्रातील समभागांमधील तेजीमुळे सुरुवातीच्या घसरणीतून बाजाराने सावरत पुनरागमन केले. व्यापक बाजारपेठेच्या तुलनेत निफ्टी-५० निर्देशांकाचे मूल्यांकन दीर्घकालीन सरासरीच्या जवळ असल्याने मोठ्या भांडवली मूल्याच्या समभागांमध्ये सातत्याने खरेदी दिसून आली. दुसरीकडे युद्धविरामाला विलंब होत असला तरी जागतिक गुंतवणूकदारांचा कल स्थिर राहिला असून जोखीम घेण्याची क्षमता कायम असल्याचे त्यातून दिसून येते.

आता गुंतवणूकदारांचे लक्ष मान्सूनची प्रगती, महागाईचा कल, रिझर्व्ह बँकेचे पतधोरण आणि बाजारातील तरलता या प्रमुख व्यापक आर्थिक घटकांकडे वळले आहे. येत्या आठवड्यात मान्सून दक्षिणेकडील भागांमध्ये पुढे सरकेल, अशी अपेक्षा असून त्यामुळे अल्पकालीन बाजारभावनेला आधार मिळू शकतो, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

आयटी क्षेत्रातील समभागांनी दिवसभरातील तेजीचे नेतृत्व केले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसचा समभाग ६.५३ टक्क्यांनी उसळला. इन्फोसिसमध्ये ५.६६ टक्के, एचसीएस टेक ४.०८ टक्के आणि टेक महिंद्र १.७६ टक्क्यांची वधारला याशिवाय अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन, टायटन कंपनी, एचडीएफसी बँक आणि महिंद्र अँड महिंद्र यांच्या समभागांनाही गुंतवणूकदारांकडून मोठी मागणी राहिली. दुसरीकडे एनटीपीसी, अॅक्सिस बँक, पॉवर ग्रिड आणि आयसीआयसीआय बँक यांच्या समभागांमध्ये नफा-वसुली दिसून आली.