Share Market Crash Reasons Marathi : मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा अनिश्चिततेचे ढग जमा होऊ लागले आहेत. मध्य पूर्वेतील संघर्ष आणि त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलरच्या जवळ पोहोचल्याने बाजारात दबाव तयार झाला. परिणामी बुधवारी (१० डिसेंबर) भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सकाळी सत्राच्या सुरुवातीलाच विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा लावलेला दिसला. याचा सर्वाधिक फटका माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना बसला आहे.
बाजाराची स्थिती काय?
सकाळी १० वाजता मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ ५९८.४८ अंशांनी (०.८ टक्के) घसरून ७४,९७९.०९ वर आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ १६०.१५ अंकांनी (०.७ टक्के) घसरून २३,४७४.९५ च्या पातळीवर पोहोचला. मध्यम आणि लहान कंपन्यांच्या समभागांमध्येही विक्रीचा दबाल दिसला. निफ्टी स्मॉलकॅप १०० आणि निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांकांत अनुक्रमे ०.४ टक्के आणि ०.६ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली, तर आयटी निर्देशांक तब्बल ३ टक्के आपटला.
बाजारात घसरण होण्याची ६ प्रमुख कारणे
- अमेरिका आणि इराणमधील संघर्ष तसेच सौदी अरेबियाच्या ऊर्जा प्रकल्पांवर हुथी बंडखोरांनी केलेला हल्ला, यामुळे कच्च्या तेलाची पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड १.४४ टक्क्यांनी वाढून ९९.३३ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. ८० टक्के उर्जेची आयात करणाऱ्या भारतासाठी ही मोठ्या धोक्याची घंटा आहे.
- आशियाई बाजारात जपानचा ‘निकेई २२५’ आणि हाँगकाँगचा ‘हँग सेंग’ निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होते. मंगळवारी अमेरिकन बाजारही तोट्यात बंद झाल्याने जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण आहे.
- विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी ८ सप्टेंबर रोजी १२३.१९ कोटी रुपयांच्या समभागांची निव्वळ विक्री केली. परदेशी गुंतवणूकदारांच्या सततच्या विक्रीमुळे देशांतर्गत बाजारावर दबाव वाढला आहे.
- तेल आयातीचा खर्च वाढण्याच्या भीतीने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया २१ पैशांनी घसरून ९४.९५ वर पोहोचला.
- बाजारातील अनिश्चितता दर्शवणारा ‘इंडिया व्हीआयएक्स’ निर्देशांक ५ टक्क्यांहून अधिक वाढून ११.७२ वर पोहोचला आहे. यामुळे येत्या काळात बाजारात अधिक तीव्र चढ-उतार पाहायला मिळू शकतात.
- निफ्टी आयटी निर्देशांक तब्बल ३ टक्क्यांनी घसरला. मागील सहा सत्रांमध्ये आयटी क्षेत्रातील निर्देशांकात १० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.
आयटी क्षेत्राला कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा फटका
- आयटी क्षेत्रातील घसरणीला कॉफोर्ज मधील अंतर्गत वादाची किनार आहे. कंपनीच्या अंतर्गत ऑडिट अहवालात संचालक मंडळाच्या मूल्यमापन प्रक्रियेवर आणि स्वतःच्या कामगिरीची माहिती लपवल्याचा संशय व्यक्त झाल्यानंतर अध्यक्ष ओमप्रकाश भट यांनी ८ सप्टेंबर रोजी तडकाफडकी राजीनामा दिला.
- या वृत्तानंतर ‘कॉफोर्ज’चा समभाग ६ टक्क्यांपर्यंत कोसळला. भट यांच्या राजीनाम्यामुळे इन्फोसिस (३.६ टक्के), टीसीएस आणि टेक महिंद्रा (३.३% टक्के) सारख्या इतर प्रमुख आयटी कंपन्यांचे समभागही मोठ्या प्रमाणात घसरले. कंपनीने सध्या विवेक शर्मा यांची अंतरीम अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.
ग्रॅफाइट इंडिया १३ टक्क्यांनी वधारला
बाजारात सर्वत्र घसरणीचे संकेत असताना ‘ग्रॅफाइट इंडिया’चा समभाग मात्र तब्बल १३ टक्क्यांनी वाढून गेल्या ८ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला. जागतिक स्तरावरील ग्रॅफाइट इलेक्ट्रोड उत्पादक कंपनी ‘ग्रॅफाइट इंटरनॅशनल’ने किमतीत किमान ३० टक्के वाढ जाहीर केल्याचा फायदा कंपनीला मिळाला.
