Sensex Nifty Fall Today triggers panic selling as Middle East crisis deepens: अमेरिकेने इराणवर नव्याने हल्ले केल्यानंतर, इराणसोबतचा आपला तात्पुरता शस्त्रसंधी करार संपुष्टात आल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. त्यानंतर बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टी यांसारख्या प्रमुख शेअर बाजार निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली.

मध्यपूर्वेत पुन्हा वाढलेला भू-राजकीय तणाव, जागतिक स्तरावरील नकारात्मक संकेतांमुळे आणि ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती प्रति बॅरल ७५ डॉलर्सच्या वर गेल्यामुळे बुधवारी सेन्सेक्समध्ये १६०० अंशांहून अधिक घसरण झाली.

दुपारी ३:३० वाजता सेन्सेक्स १,६७७.१२ अंशांनी घसरून ७६,५०३.६० वर, तर निफ्टी ५१६.६५ अंशांनी घसरून २३,८८२.०५ वर बंद झाला. ३० मार्च २०२६ नंतर पहिल्यांदाच सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये प्रत्येकी २ टक्क्यांची घसरण झाली.

क्षेत्रीय निर्देशांकांचा विचार करता, निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होते. निफ्टी स्मॉलकॅप १०० आणि निफ्टी मिडकॅप १०० या निर्देशांकांमध्ये अनुक्रमे १.९७ टक्के आणि १.५७ टक्क्यांची घसरण झाली.

आज झालेल्या या विक्रमी घसरणीनंतर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ८.५६ लाख कोटी रुपयांची घट होऊन ती ४७१.६४ लाख कोटी रुपयांवर आली आहे.

अमेरिका-इराण यांच्यातील तणावात पुन्हा वाढ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, संघर्ष संपवण्यासाठी इराणसोबत केलेला सामंजस्य करार आता ‘संपला’ आहे आणि त्यांना इराणशी कोणताही करार करायचा नाही. तुर्कीची राजधानी अंकारा येथे होणाऱ्या ‘नाटो’ शिखर परिषदेपूर्वी ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले.

कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

जागतिक स्तरावर तेलाच्या किमतींचे मानक मानल्या जाणाऱ्या ‘ब्रेंट क्रूड’च्या दरात ५.६६ टक्क्यांनी वाढ होऊन तो प्रति बॅरल ७८.३५ अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती भारतासाठी प्रतिकूल आहेत. कारण भारत हा जगातील तेलाचा तिसरा सर्वात मोठा आयातदार आणि ग्राहक देश आहे. या वाढीमुळे भारताचे आयात बिल वाढते, महागाईचा दबाव वाढतो आणि आर्थिक विकासावर विपरीत परिणाम होतो.

“अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढल्याने आणि परिणामी ‘ब्रेंट क्रूड’च्या किमतीत वाढ होऊन त्या प्रति बॅरल ७६ अमेरिकन डॉलर्सवर पोहोचल्याने, बाजार पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या स्थितीत आला आहे. ही स्थिती किती काळ टिकेल आणि त्याचे परिणाम काय असतील, हे आता अनिश्चितत आहे”, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार व्ही. के. विजयकुमार यांनी म्हटले आहे.

कमकुवत जागतिक संकेत

आशियाई बाजारांमध्येही आज घसरण पाहायला मिळाली. यात दक्षिण कोरियाचा ‘कोस्पी’ आणि जपानचा ‘निक्केई २२५’ हे निर्देशांक मोठ्या प्रमाणात घसरले. मंगळवारी अमेरिकेतील बाजारही घसरणीसह बंद झाले होते, ज्यामुळे बाजारातील नकारात्मक वातावरण अधिकच गडद झाले.