Share Market Recovery Today: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल इराणवर हल्ले करत तात्पुरती युद्धबंदी मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचे भांडवल सुमारे ८.५३ लाख कोटी रुपयांनी कोसळले होते. सेन्सेक्स १६०० हून अधिक अंशांनी तर निफ्टी ५०० हून अधिक अंशांनी कोसळला होता. बाजारातील याच घसरणीचा फायदा घेत गुंतवणूकदारांनी आज सुमारे ३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
आज (९ जुलै) शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी ०.८ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होते. काल एका दिवसात झालेली तीन महिन्यांतील सर्वात मोठी घसरण काही प्रमाणात भरून काढली जात असली, तरी मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे बाजारात सावधगिरीचे वातावरण आहे.
सकाळी १०:०० वाजता, सेन्सेक्स ६०४.२० अंशांच्या वाढीसह ७७,१०७.८० अंशांवर, तर निफ्टी १८३.७५ अंशांच्या वाढीसह २४,०६५.८० अंशांवर व्यवहार करत होता. बाजारात सुमारे २,६५४ शेअर्समध्ये वाढ झाली, ६८० शेअर्समध्ये घसरण झाली आणि १४२ शेअर्सचे भाव स्थिर राहिले.
सकाळी १०:४१ वाजता, सेन्सेक्स ७२४.०२ अंशांनी वधारून ७७,२२७.६२ वर, तर निफ्टी २१८.८५ अंशांनी वधारून २४,१००.९० वर व्यवहार करत होता. या काळात २,६४२ शेअर्समध्ये वाढ झाली, ८३८ शेअर्समध्ये घसरण झाली आणि १५३ शेअर्सचे भाव स्थिर राहिले.
कोणतीही भीती निर्माण झालेली नाही
जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार व्ही. के. विजयकुमार म्हणाले, “सप्टेंबरसाठीच्या कच्च्या तेलाचे व्यवहार ७६ डॉलर्सच्या पातळीवर होत आहेत. याचा अर्थ परिस्थिती अधिक गंभीर होईल, असा बाजारपेठेचा अंदाज नाही. जागतिक स्तरावर बाजारात कोणतीही भीती निर्माण झालेली नाही. तरीही, या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा खरेदीदार बनण्याचा कल कायम आहे. गेल्या चार सत्रांमध्ये विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारात खरेदीदार राहिले आहेत. त्यांनी गेल्या चार दिवसांत ३,९५४ कोटी रुपयांचे इक्विटी खरेदी केले आहेत. कच्च्या तेलाचे दर स्थिर राहिल्यास हा कल कायम राहू शकतो. विशेषतः ‘लार्ज-कॅप’ कंपन्या, आणि त्यामध्येही वित्तीय व वाहन क्षेत्रातील कंपन्या, बाजारातील चढ-उतारांचा सामना करण्यास सक्षम राहण्याची शक्यता आहे.”
