Share Market Crash Today analysis: अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आणि त्याचा गुंतवणूकदारांच्या भावनांवर नकारात्मक परिणाम झाला. त्यामुळे सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली. जागतिक बाजारातील कमकुवत कल आणि परदेशी भांडवलाचा ओघ बाहेर जाणे यांमुळे बाजारावरील दबाव आणखी वाढला.

निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत आहेत. तर ‘निफ्टी स्मॉलकॅप १००’ आणि ‘निफ्टी मिडकॅप १००’ हे निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्याने घसरले आहेत.

सकाळी १०:४० वाजता, सेन्सेक्स ४९१.६६ अंशांनी घसरून ७६,७७२.८४ वर व्यवहार होता, तर निफ्टी १७८.२ अंशांनी घसरून २३,९९७.९५ वर व्यवहार करत होता.

सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी, सुरुवातीच्या सत्रात वाढ नोंदवणाऱ्यांमध्ये एटरनल, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल आणि आयसीआयसीआय बँक यांचा समावेश होता. एटरनलच्या मूल्यात १.५७ टक्क्यांची, तर एचडीएफसी बँकेच्या मूल्यात १.२५ टक्क्यांची वाढ झाली.

दुसरीकडे टाटा स्टीलचे मूल्य २.१८ टक्क्यांनी, इन्फोसिस २.१६ टक्क्यांनी, बजाज फायनान्स २.०६ टक्क्यांनी, इंडिगो २.०५ टक्क्यांनी आणि अदानी पोर्ट्स १.५९ टक्क्यांनी घसरले.

आशियाई बाजारपेठा

अमेरिकेतील शेअर बाजर आणि इतर जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर आशिया-पॅसिफिक बाजारपेठांमध्ये घसरण दिसून येत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील लराक बेटावर अमेरिकन सैन्याने इराणच्या दोन रॉकेट लाँचर्सवर केलेल्या हल्ल्यानंतर दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात सर्वाधिक घसरण झाली आहे.

दक्षिण कोरियाचा ‘कोस्पी’ निर्देशांक ३.५ टक्क्यांनी घसरला, तर स्मॉल-कॅप ‘कोस्डॅक’मध्ये ३.८ टक्क्यांची घट झाली. जपानचा ‘निक्केई २२५’ २.१६ टक्क्यांनी आणि ‘टोपिक्स’ ०.९५ टक्क्यांनी खाली आला.

कच्चे तेल

‘वेस्ट टेक्सास इंटरमीजिएट’ (WTI) क्रूड फ्युचर्स १.०८ टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल ८४.३० डॉलरवर व्यवहार करत होते. दुसरीकडे, ‘ब्रेंट’ क्रूड फ्युचर्स २ टक्क्यांच्या वाढीसह ८९.२४ डॉलरच्या आसपास व्यवहार करत होते. ‘कोमेक्स’वर कच्च्या तेलाचे भाव १.१२ टक्क्यांच्या घसरणीसह प्रति बॅरल ८४.३३ डॉलरवर व्यवहार करत होते.

आजचा सोन्याचा दर

कोमेक्सवर, सोन्याचा व्यापार प्रति औंस ४,५१४.८० डॉलर्सवर होत होता, ज्यात ०.३३ टक्क्यांची घट झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५६,५४० रुपये आहे. कालच्या तुलनेत सोन्याच्या दरात १.७४ टक्क्यांची घट झाली आहे. भारतात आज १८-कॅरेट सोन्याची किंमत १,१७,४०५ रुपये आहे. दुबईमध्ये आज २४-कॅरेट सोन्याचा दर १,४९,५९० रुपये आहे.