Vijay Kedia Video On Share Market Crash: अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तात्पुरत्या स्वरूपातील युद्धबंदी मागे घेण्याची घोषणा केली. यामुळे पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आणि भारतासह जगभरातील शेअर बाजारांना याचा मोठा फटका बसला. यामुळे आज भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये १६७७ अंशांची घसरण झाली. तर, निफ्टी ५० निर्देशांक ५१६ अंशांनी कोसळला. यामुळे बीएसईवर सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात सुमारे ९ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.
बाजाराच्या आजच्या या परिस्थितीवर ज्येष्ठ गुंतवणूकदार विजय केडिया यांनी उपरोधिक स्वरूपात गाणे म्हणत सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या भावना मांडल्या आहेत. विजय केडिया यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला त्यांनी, “एका दिवसाच्या घसरणीत माझे इतके नुकसान होते की, ते मी वर्षभरात कमावलेल्या रकमेपेक्षाही जास्त असते”, असे कॅप्शन दिले आहे.
विजय केडिया यांनी या गाण्याला १९७२ मधील परिचय चित्रपटात अभिनेते जितेंद्र यांच्यावर चित्रित झालेल्या मुसाफिर हूँ यारों या गाण्याची चाल देत म्हटले, “मैं एक साल में जितना कमाता हूँ, एक दिन के क्रॅश में ज़्यादा गँवाता हूँ! पड़ी है लत, पूछो मत, मुश्किल है छुड़ाना! मैं ट्रेडर हूँ यारो, बड़ा डिफिकल्ट है कमाना! मैंने बाय-सेल जाना है, बस बाय-सेल जाना है!”
डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदी मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर सेन्सेक्स १६७७ अंशांनी घसरला, तर निफ्टी ५० निर्देशांक ५९१ अंशांनी घसरला. या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची सुमारे ९ लाख कोटी रुपयांहून अधिक संपत्ती नष्ट झाली आणि बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या सर्व कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल घसरून सुमारे ४७२ लाख कोटी रुपयांवर आले.
सेन्सेक्समधील सर्व कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. यात हिंदुस्तान युनिलिव्हर, इंटरग्लोब एव्हिएशन, मारुती सुझुकी, कोटक महिंद्रा बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि भारती एअरटेल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रत्येकी २ ते ४ टक्क्यांची घसरण झाल्याने ते कोसळणाऱ्या शेअर्समध्ये आघाडीवर होते.
निफ्टी मिडकॅप १०० आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० मध्येही मोठी घसरण
गुंतवणूकदारांनी सुरू केलेल्या विक्रिच्या पार्श्वभूमीवर बाजारातील अस्थिरता दर्शवणारा ‘इंडिया VIX’ निर्देशांक २६ टक्क्यांनी वधारून १४.६७ वर पोहोचला, जे गुंतवणूकदारांची वाढलेली चिंता दर्शवते. व्यापक बाजारावरही दबाव दिसून आला आणि निफ्टी मिडकॅप १०० तसेच निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांकांमध्ये २ टक्क्यांपर्यंत घसरण झाली.
