मुंबई : एप्रिलमधील दमदार उसळीनंतर भारतीय शेअर बाजाराने मे २०२६ची सुरुवात सकारात्मक वातावरणात केली होती. मजबूत देशांतर्गत आर्थिक वाढ, नियमित एसआयपी गुंतवणूक आणि स्थिर कंपनी निकालांच्या अपेक्षेमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास उंचावला होता. त्यामुळे वॉल स्ट्रीटवरील प्रसिद्ध ‘सेल इन मे अँड गो अवे’ ही म्हण यंदा फोल ठरेल, अशी अनेकांची धारणा होती. मात्र, पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, कच्च्या तेलाच्या किमतीतील तेजी, परदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि अमेरिकेतील रोखे उत्पन्नदरातील वाढ यामुळे बाजाराला अखेर फटका बसला. मे महिन्यात सेन्सेक्स २.८ टक्क्यांनी, तर निफ्टी १.९ टक्क्यांनी घसरला.
तेलाच्या किमतींनी वाढवली चिंता
अमेरिका-इराण संघर्ष तीव्र झाल्यानंतर ब्रेंट क्रूडचे दर बहुतांश काळ १०० डॉलर प्रति बॅरलच्या वर राहिले. यामुळे आयातीत महागाई, चालू खात्यातील तूट आणि इंधन खर्च वाढण्याच्या चिंतेने डोके वर काढले. याच काळात इंधन दरवाढीच्या निर्णयांनीही बाजारातील वातावरण आणखी अस्थिर केले.
एफवायईआरएसचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तेजस खोडे यांच्या मते, तेलाच्या वाढत्या किमतींमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसे काढण्यास सुरुवात केली आणि त्याचा दबाव रुपयावरही दिसून आला.
एफपीआयंची मोठी विक्री
मे महिन्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफपीआय) तब्बल ५५,९६३ कोटींच्या समभागांची विक्री केली. अमेरिकेच्या १० वर्षांच्या रोख्यांवरील उत्पन्नदर ४.६ टक्क्यांवर पोहोचल्याने डॉलरमधील गुंतवणूक अधिक आकर्षक ठरली. परिणामी रुपया घसरत प्रति डॉलर ९६.९६ रुपयांच्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला.
महिन्याच्या सुरुवातीला सकारात्मकता असली तरी जागतिक पातळीवरील जोखीम घटक पुन्हा समोर आले. रोखे उत्पन्नदर, वस्तूंच्या किमती आणि पश्चिम आशियातील संघर्षामुळे नफा-वसुली वाढली, असे रिलिगेअर ब्रोकिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन) अजित मिश्रा म्हणाले.
कंपनी निकाल अपेक्षेनुसार, पण मोठा सकारात्मक धक्का नाही
मार्च तिमाहीतील बहुतांश कंपन्यांचे निकाल अपेक्षांनुसार आले. मात्र, त्यातून कमाईच्या अंदाजात मोठी सुधारणा किंवा सकारात्मक आश्चर्य मिळाले नाही. त्यामुळे बाजाराला नव्या तेजीचा आधार मिळू शकला नाही.
आता पुढील दिशा कोणती?
विश्लेषकांच्या मते, आगामी काळात कच्च्या तेलाच्या किमती, रुपयाची हालचाल, एफपीआय गुंतवणूक, जूनमधील आरबीआयच्या पतधोरणातील भूमिका, मान्सूनची प्रगती आणि ग्रामीण मागणी हे बाजाराचे प्रमुख चालक ठरतील. इंधन दरवाढीमुळे महागाईवर होणारा दुय्यम परिणामही बाजारासाठी महत्त्वाचा घटक असेल. त्यामुळे समभागांच्या किमतींवर काही काळ दबाव कायम राहू शकतो, असे सॅमको सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख अपूर्व सेठ म्हणाले.
अजित मिश्रा यांच्यामते, नजीकच्या काळात बाजार मर्यादित पट्ट्यात व्यवहार करत राहू शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मजबूत कमाई, सुदृढ ताळेबंद आणि सातत्यपूर्ण रोख प्रवाह असलेल्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
दीर्घकालीन चित्र मात्र सकारात्मक
अल्पकालीन अनिश्चितता कायम असली तरी जागतिक ब्रोकरेज संस्था मॉर्गन स्टॅन्ले भारतीय बाजाराबाबत आशावादी आहे. संस्थेच्या मते, भारतीय बाजाराचे मागील १२ महिन्यांतील सापेक्ष प्रदर्शन ऐतिहासिकदृष्ट्या कमकुवत राहिले असून, मूल्यांकन आकर्षक पातळीवर आले आहे. तसेच परदेशी गुंतवणूकदारांची स्थिती अनेक वर्षांतील नीचांकी स्तरावर आहे.
मॉर्गन स्टॅन्लेच्या मते, बहुध्रुवीय जागतिक अर्थव्यवस्थेत भारत मोठा लाभार्थी ठरू शकतो. उत्पादन क्षेत्राचा जीडीपीतील वाटा पुढील दशकात वाढण्याची शक्यता आहे. ऊर्जा पायाभूत सुविधांमध्ये होणारी मोठी गुंतवणूक डेटा सेंटर उद्योगाला चालना देऊ शकते, तर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील उत्पादकता वाढीचाही भारताला मोठा फायदा मिळू शकतो. याच पार्श्वभूमीवर संस्थेने जून २०२७ पर्यंत सेन्सेक्स ८९,००० अंकांपर्यंत पोहोचू शकतो, असा आधारभूत अंदाज व्यक्त केला आहे. एकूणच, मे महिन्यात ‘सेल इन मे’ ही जुनी म्हण यंदा काही अंशी खरी ठरली असली, तरी दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी भारताची विकासकथा अद्यापही आकर्षक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
