Sensex Nifty Rally delivers massive profits to investors: भारतीय शेअर बाजारात सोमवारी, ३ ऑगस्ट रोजी मोठी वाढ पाहायला मिळाली. अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता कराराच्या आशांमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी घट आणि त्यातून मिळालेला आधार यामुळे प्रमुख सेन्सेक्स आणि निफ्टी ५० या प्रमुख निर्देशांकांनी सलग चौथ्या सत्रात आपली तेजी कायम राखली. दिवसाच्या अखेरीस सेन्सेक्स ५४४ अंशांनी वधारून ७८,६३९ वर बंद झाला, तर निफ्टी ५० निर्देशांक ३९१ अंशांनी वाढून २४,७७४.३० वर बंद झाला.

या तेजीचा फायदा मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप क्षेत्रांनाही झाला. निफ्टी मिड-कॅप १०० निर्देशांकात १.२१% ची वाढ झाली, तर स्मॉल-कॅप १०० निर्देशांक १.२९% नी वधारला.

या तेजीमुळे एकाच सत्रात गुंतवणूकदारांची सुमारे ४ लाख कोटी रुपयांची कमाई झाली. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मागील सत्रातील जवळपास ४८६ लाख कोटी रुपयांवरून वाढून ४९० लाख कोटी रुपयांवर पोहोचले. केवळ सलग चार सत्रांमध्ये सेन्सेक्स १,८५० हून अधिक अंशांनी वधारला आहे, तर निफ्टी ५० मध्ये सुमारे ८०० अंशांची वाढ झाली आहे. यामुळे चार सत्रांमध्ये गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ११ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणबाबतच्या नव्या सोशल मीडिया पोस्टमुळे भू-राजकीय तणाव निवळल्याने कच्च्या तेलाच्या किमती कोसळल्याय परिणामी सोमवारी भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली. जागतिक एआय व्यापारातील सातत्यपूर्ण तेजी आणि देशांतर्गत कंपन्यांच्या मजबूत कमाईनेही बाजारातील सकारात्मक वातावरणाला चालना दिली. अनेक महिन्यांच्या विक्रीनंतर, जुलैमध्ये २०,२०० कोटी रुपयांचा एफपीआय (परदेशी गुंतवणूकदार) ओघ आल्याच्या आकडेवारीने या तेजीला आणखी आधार दिला.

अमेरिकेने इराणच्या पायाभूत सुविधांवर नवे हल्ले करण्याचे नियोजित केले होते. मात्र, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, इराण आणि मध्य पूर्वेतील इतर देशांनी त्यांना हल्ल्यापासून थांबण्याची विनंती केली आहे, कारण “एका कराराच्या मुख्य अटींवर सहमती झाली आहे.”

ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, यामुळे ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’ त्वरित आणि पूर्णपणे खुला होईल तसेच इराणकडून निर्माण होणारा अणुधोकाही संपुष्टात येईल.

“या विनंतीचा विचार करून आणि जगाच्या भविष्यातील हितासाठी तसेच एक यशस्वी व समृद्ध इराण टिकून राहावा यासाठी, मी हा हल्ला रद्द करण्यास सहमती दर्शवली आहे. अर्थातच, ही सहमती ‘त्वरित करार’ करण्याच्या अटीवर आहे. इस्रायलही माझ्या या भूमिकेशी सहमत आहे. सर्वांनी कामाला लागा आणि हे काम पूर्ण करा”, असे ट्रम्प म्हणाले.