Profit Booking Adviced By Experts In Stock Market: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्धची संभाव्य लष्करी कारवाई दोन आठवड्यांसाठी तात्पुरती स्थगित केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, या कालावधीत दोन्ही देशांमध्ये तात्पुरता शस्त्रविराम लागू राहील. याचा अर्थ असा की, ना अमेरिका हल्ला करेल, ना इराण कोणतीही आक्रमक पावले उचलेल. इराणनेही या गोष्टीला दुजोरा दिला आहे.

या वृत्तानंतर कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात कोसळल्या आहेत. परिणामी महागाईचा धोका टळल्यामुळे जगभरतील शेअर बाजारांत उत्साहाचे वातावरण आहे. याचबरोबर आज भारतीय शेअर बाजारातील निर्देशांकही तेजीसह उघडले आहेत.

सकाळी ९: १५ वाजता सेन्सेक्स २,५९६.०३ अंशांनी (किंवा ३.४८ टक्क्यांनी) वधारून ७७,२१२.६१ च्या पातळीवर पोहोचला, तर निफ्टी ७६७.२५ अंशांनी (किंवा ३.३२ टक्क्यांनी) वधारून २३,८९०.९० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. या व्यवहारादरम्यान, सुमारे २५३४ शेअर्समध्ये वाढ झाली, १६६ शेअर्समध्ये घसरण झाली आणि ८२ शेअर्सचे भाव स्थिर राहिले.

या परिस्थितीत, शेअर तज्ज्ञ पराग ठक्कर आणि कुश बोहरा यांनी एनडीटीव्ही प्रॉफिटच्या ‘इंडिया मार्केट ओपन’ कार्यक्रमात गुंतवणूकदारांना आजपासूनच नफा बुक (वसुली) करण्यास सुरुवात करण्याचा सल्ला दिला आहे.

ठक्कर म्हणाले की, जेव्हा बाजारात उत्साहाचे वातावरण असते तेव्हा विक्री सुरू करणे महत्त्वाचे आहे आणि कदाचित आज ते शक्य आहे. “जेव्हा तुम्हाला अल्पकालीन नफा मिळेल तेव्हा तो बुक करा आणि चांगल्या कंपन्यांमध्ये घसरणीच्या वेळी खरेदी करा.” त्यांनी पुढे सांगितले की, सध्याच्या बाजाराच्या परिस्थितीत तुम्ही स्ट्रक्चरल दृष्टिकोन ठेवू शकत नाही.

कुश बोहरा यांनीही याच मताला दुजोरा दिला आणि आजच नफा बुक करण्याच्या आपल्या सल्ल्यावर जोर दिला. त्यांच्या मते, जेव्हा गोंधळ सर्वाधिक असतो, तेव्हाच बाजार परिस्थिती समजून घेतो आणि वळण घेतो. त्यांनी पुढे सांगितले की, जेव्हा बाजार तळ गाठत होता, तेव्हा बाजाराची व्याप्ती प्रचंड कमकुवत होती आणि एफआयआय (FIIs) देखील इंडेक्स आणि स्टॉक फ्युचर्स या दोन्हीमधील आपली गुंतवणूक कमी करत होते.

बोहरा यांनी सुचवले की, जर एखाद्या गुंतवणूकदाराने दीर्घकालीन किंवा मध्यम मुदतीच्या दृष्टिकोनातून खरेदी केली असेल, तर त्याने ती कायम ठेवावी.

(या वृत्तात केवळ तज्ज्ञांची मते प्रकाशित केली आहेत. या वृत्ताचा अर्थ शेअर खरेदी किंवा विक्री करण्याबाबतचा कोणताही ‘सल्ला’ असा लावला जाऊ नये आणि तसा तो मानलाही जाऊ नये. गुंतवणूकदारांनी स्वतःची स्वतंत्र व सखोल तपासणी करावी आणि सेबी-नोंदणीकृत आर्थिक मार्गदर्शकांचे मार्गदर्शन घ्यावे.)