Share market trading strategy Marathi : शेअर बाजाराकडे अजूनही काही गुंतवणूकदार झटपट पैसा कमावण्याचे माध्यम म्हणून पाहत आहेत. प्रत्यक्षात अभ्यासाशिवाय गुंतवणूक म्हणजे आर्थिक आत्महत्या करण्यासारखं आहे. असेच एक उदाहरण आता सोशल मीडियातून समोर आलं आहे. एक्स (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर @AlphaWizarDD या नावाच्या एका ट्रेडरने एक्स पोस्टमधून आपला आर्थिक प्रवास मांडला आहे. सुरुवातीला शेअरच्या टीप्स घेऊन ट्रेडिंग केल्याने स्वतःजवळचे सर्व पैसे गमावले. नंतर मित्राकडून घेतलेले १० लाख रुपयेही बाजारात बुडाले. अशा परिस्थितीत माघार न घेता, ट्रेडरने आपली स्ट्रॅटेजी बदलली आणि ५ लाखातून आता १.३० कोटी रुपयांची संपत्ती घरबसल्या जमा केली आहे.
स्टॉक टिप्समुळे गमावले पैसे पण…
आपल्या पोस्टमध्ये त्यांनी शेअर केलंय की, सुरुवातीला मी स्टॉक टिप्स फोलो करुन शेअर बाजारात ट्रेडिंग करायचो. यातून नफा मिळत असला तरी मोठा हिस्सा ब्रोकरेजमध्येच जात होता. यानंतर त्यांनी फ्युचर्स अँड ऑप्शन्स (F&O) मध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला ‘ऑप्शन बायिंग’मध्ये अपयश आल्यावर एका युट्यूब व्हिडिओने त्यांचा दृष्टिकोन बदलला आणि ते ‘ऑप्शन सेलर’ बनले. ऑप्शन सेलिंगसाठी जास्त भांडवल लागत असल्याने त्यांनी मित्राकडून १० लाख रुपयांचे कर्ज घेतले. पण, रणनीती फसली आणि सर्व पैसे बुडाले.
यशाला शॉर्टकट नाही
स्वतःची आयुष्यभराची जमापुंजी आणि मित्राचे १० लाखांचे कर्ज झाल्यानंतर ट्रेडरला मोठा धडा मिळाला. कोणत्याही यशाला शॉर्टकट नाही, हे लक्षात आलं. ते म्हणतात, “अनेक चुका आणि अपयशानंतर मी ट्रेडिंगकडे एक सिस्टीम म्हणून पाहण्यास सुरुवात केली.” त्यांच्या ट्रेडिंग प्रवासातील खरा युटर्न आला तो StockMock या प्लॅटफॉर्मवर सिस्टिमॅटिक बॅकटेस्टिंग (Backtesting) सुरू केल्यावर. त्यांनी आपल्या स्ट्रॅटेजीची बॅकटेस्टिंग केली, नियम तयार केले आणि मग त्या नियमांनुसार ट्रेडिंग करण्यास सुरुवात केली. कालांतराने त्यांनी आपल्या ट्रेडिंगमधील नफ्याचा वापर स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी केला. आपल्या ७ वर्षांच्या प्रवासात अंदाजे ४८% चा सीएजीआर (CAGR) मिळवल्याचा दावा ट्रेडरने केला आहे. CAGR म्हणजे आपण केलेली गुंतवणूक दरवर्षी किती टक्क्यांनी वाढली.
एफ अँड ओच्या नफ्यातून इक्विटी गुंतवणूक!
ओवरट्रेडिंगचा मोह टाळण्यासाठी त्यांनी जोएल ग्रीनब्लाट यांचे The Little Book That Beats the Market हे पुस्तक वाचले. यातून त्यांना सिस्टिमॅटिक गुंतवणुकीची संकल्पना समजली आणि त्यांनी स्वतःचा ‘स्टॉक-सिलेक्शन फ्रेमवर्क’ तयार केला. आज ते एफ अँड ओ (F&O) मधून मिळणारा सर्व नफा या सिस्टिमॅटिक फ्रेमवर्कद्वारे थेट इक्विटीमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी वापरतात.
इंटरनेटवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
शेअर बाजारात एखाद्यावर १० लाख कर्ज झाले असते तर तो नक्कीच संपला असता. मात्र, यांनी जिथं गमावलं तिथूनच पुन्हा कमावलं, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. तर दुसऱ्याने लिहिलंय, की २०२२ पासून मीसुद्धा याच मार्गावर आहे. हजारो युट्यूब व्हिडिओ आणि कोर्सेस केले, पण शेवटी स्वतःची सिस्टीम आणि शिस्त हीच कामी येते.
