SIP Investment Returns Affected By Market Crash 2026: संपत्ती निर्मितीचा सर्वात सोपा मार्ग म्हणून अनेकदा सादर केल्या जाणाऱ्या ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स’ (SIPs) मुळे गुंतवणूकदारांच्या संयमाची कसोटी लागत आहे.

बाजाराच्या सुमार कामगिरीचे जवळपास १८ महिने आणि त्यानंतर इराणमधील संघर्षामुळे शेअर्सच्या विक्रीचा जोरदार सपाटा लागल्यामुळे, एसआयपीचा अल्प कालावधीतील परतावा आता तोट्यात गेला आहे. २०२०-२१ मध्ये कोविडमुळे बाजारात निर्माण झालेल्या अस्थिरतेनंतर, अशी परिस्थिती उद्भवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

निफ्टीमध्ये झालेली अंदाजे १३ टक्क्यांची घसरण आणि मिड-कॅप व स्मॉल-कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली अधिक तीव्र सुधारणा यामुळे म्युच्युअल फंडांचा परतावा आता नकारात्मक झाला आहे. परिणामी, बहुतांश ‘इक्विटी’ श्रेणींमधील एक आणि दोन वर्षांचा एसआयपी परताव्याचे रुपांतर आता तोट्यात झाले आहे. इतकेच नव्हे, तर तीन वर्षांचा परतावा देखील ५ टक्क्यांचा टप्पा ओलांडण्यासाठी संघर्ष करत आहे.

विविध कालावधीतील एसआयपी परतावे

एसआयपी श्रेणी एका वर्षाचा परतावा (टक्के) दोन वर्षांचा परतावा (टक्के) तीन वर्षांचा परतावा (टक्के)
लार्ज आणि मिड कॅप -१२.३ -४.१ ५.२
लार्ज कॅप -१३.५ -५.२ २.९
मिड कॅप -१०.४ -३.३ ७.३
स्मॉल कॅप -१५.४ -७.८ २.३
फ्लेक्सी कॅप -१३.५-५.२ ३.९
निफ्टी ५० -१४.९ -४.७ २.२

अल्पकालीन पातळीवर काही प्रमाणात नुकसान दिसून येत असली, तरीही सर्व श्रेणींमध्ये १० वर्षांचे एसआयपी परतावे सकारात्मक राहिले आहेत. लार्ज-कॅप आणि मिड-कॅप श्रेणींसाठी, १० वर्षांचे परतावे १५ टक्क्यांइतके उच्च आहेत. अगदी स्मॉल-कॅप श्रेणीमध्येही १० वर्षांच्या कालावधीत एसआयपी परतावे १७ टक्क्यांच्याही पुढे जाऊ शकतात.

अल्पकालीन एसआयपी मध्ये तोटा का दिसत आहे?

  • भू-राजकीय धक्का: इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे बाजारात तीव्र विक्रीचा जोर वाढला.
  • तेजी संपली: सप्टेंबर २०२४ पासून बाजारात सुधारणा (Correction) सुरू आहे.
  • स्मॉल-कॅपमधील सुधारणा: या क्षेत्राला प्रमाणाबाहेर फटका बसला असून, त्यामुळे एसआयपी च्या सरासरी कामगिरीवर नकारात्मक परिणाम होत आहे.

तज्ज्ञ काय म्हणाले?

बाजारातील मंदीवर भाष्य करताना, इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचे प्राध्यापक रामभद्रन तिरुमलई म्हणाले, “सर्वप्रथम, इक्विटी गुंतवणुकीबाबत शिस्तबद्ध दृष्टिकोन ठेवणे म्हणजे गुंतवणूकदारांना प्रत्येक वेळी सकारात्मक परतावाच मिळेल, असे मुळीच नाही. एसआयपी ही मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी असते, किमान तीन ते पाच वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळासाठी.”

ते पुढे म्हणाले, “काही वेळा, अल्प कालावधीत एसआयपी गुंतवणुकीतून नकारात्मक परतावा मिळू शकतो. परंतु गुंतवणूकदारांनी या अल्पकालीन घसरणीबद्दल चिंता करू नये. दीर्घ कालावधीचा विचार करता, या गुंतवणुकीतून साधारणपणे सकारात्मक परतावाच मिळतो. बाजारात घसरण होणारच असते, परंतु अशा वेळी गुंतवणुकीशी ठाम राहणे आणि त्यातून बाहेर न पडणे, हाच शिस्तबद्ध दृष्टिकोनाचा एक अविभाज्य भाग आहे.”

गुंतवणूकदारांनी काय करावे?

१) घाबरून जाऊन एसआयपी बंद करू नका:

सध्याच्या परिस्थितीत एसआयपी थांबवणे कदाचित सुरक्षित वाटू शकते, परंतु असे केल्याने अनेकदा झालेले नुकसान कायमचे निश्चित होते आणि गुंतवणुकीतील शिस्तही बिघडते. “खरी जोखीम ही नकारात्मक परताव्यामध्ये नसते. खरी जोखीम तर त्या गुंतवणूकदाराच्या कृतीत असते, जो नेमक्या अशा वेळी आपली एसआयपी थांबवतो, जेव्हा ती तिचे सर्वात मोलाचे काम करत असते”, असे फाइंडॉकचे व्यवस्थापकीय संचालक हेमंत सूद यांनी म्हटले आहे.

२) बाजारातील चढ-उतारांचा तुमच्या फायद्यासाठी उपयोग करा:

जेव्हा बाजार घसरतो, तेव्हा तुमची एसआपी कमी किमतीत अधिक युनिट्स खरेदी करते. भविष्यातील तेजीमुळे या स्वस्त युनिट्समधून मिळणारा नफा वाढतो.

३) टॉप-अप करण्याचा विचार करा (शक्य असल्यास):

फंड हाऊसेस बाजारात घसरण होत असताना १० टक्क्यांपर्यंत एकरकमी रक्कम गुंतवण्याचा सल्ला देतात.