SpaceX IPO Wall Street Listing: एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील ‘स्पेसएक्स’ (SpaceX) कंपनीचा बहुप्रतिक्षित आयपीओ (IPO) शुक्रवारी (१२ जून) वॉल स्ट्रीटवर सूचीबद्ध होणार आहे. कंपनीची १६७.६० लाख कोटी रुपये इतक्या मूल्यांकनावर ७.१८ लाख कोटी रुपये उभारण्याची योजना आहे. या आयपीओमुळे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मस्क हे कदाचित जगातील पहिले ‘ट्रिलियनअर’ बनू शकतात.
जरी अनेकजण या मूल्यांकनाबाबत साशंकता व्यक्त करत असले, तरी भारतीय गुंतवणूकदार या आयपीओ मध्ये गुंतवणूक करू शकतील का, असा प्रश्नही काहींना पडला आहे.
आयपीओ म्हणजे काय?
जेव्हा एखादी खाजगी कंपनी पहिल्यांदाच आपले शेअर्स सामान्य जनतेला विक्रीसाठी उपलब्ध करून देते, तेव्हा त्याला आयपीओ (इनिशिअल पब्लिक ऑफरिंग) असे म्हणतात. या प्रक्रियेमुळे कंपनीची मालकी खाजगी हातातून सार्वजनिक हातात हस्तांतरित होते. म्हणूनच याला ‘गोइंग पब्लिक’ (सार्वजनिक होणे) असेही म्हटले जाते.
भारतीय नागरिक स्पेसएक्समध्ये गुंतवणूक करू शकतात का?
भारतीय गुंतवणूकदार आयपीओ साठी अर्ज करण्यासाठी ASBA प्रणालीचा वापर करतात. मात्र, अमेरिकेतील प्रणाली विदेशी किरकोळ गुंतवणूकदारांना थेट आयपीओ खरेदी करण्याची परवानगी देत नाही.
“भारतीय गुंतवणूकदार स्पेसएक्सच्या आयपीओ दरम्यान त्यात गुंतवणूक करू शकत नाहीत. मात्र, शेअर बाजारात लिस्टिंग झाल्यानंतर ते थेट किंवा अप्रत्यक्षपणे यात सहभागी होऊ शकतात. स्पेसएक्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी ‘फीडर फंड्स’ हा सर्वात स्वस्त आणि अप्रत्यक्ष मार्ग आहे. तरीही, यात एक आव्हान असू शकते ते म्हणजे, या फंडांचा स्पेसएक्समधील सहभाग अत्यंत मर्यादित किंवा नगण्य असू शकतो”, असे एसबीआय सिक्युरिटीजचे फंडामेंटल रिसर्च प्रमुख सनी अग्रवाल यांनी सांगितल्याचे वृत्त बिझनेस स्टँडर्डने दिले आहे.
द टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, भारतीय गुंतवणूकदार दुय्यम बाजाराद्वारे (Secondary market) स्पेसएक्सचे शेअर्स खरेदी करू शकतील. मात्र, यासाठी त्यांना रिझर्व्ह बँकेच्या लिबरलाईज्ड रेमिटन्स स्कीम (LRS) अंतर्गत आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सची मदत घ्यावी लागेल. लिबरलाईज्ड रेमिटन्स स्कीम अंतर्गत भारतीय नागरिक गुंतवणुकीसाठी एका आर्थिक वर्षात विदेशात २,५०,००० डॉलर्सपर्यंतची (२.३९ लाख कोटी रुपये) रक्कम पाठवू शकतात.
भारताचे परकीय चलन व्यवस्थापन (विदेशातील गुंतवणूक) नियम, २०२२ हे ओव्हरसीज डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि ओव्हरसीज पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट या स्वरूपातील विदेशातील गुंतवणुकीस देखील परवानगी देतात. या नियमांचे पालन करणाऱ्या व्यक्ती मान्यताप्राप्त प्लॅटफॉर्म्स आणि माध्यमांद्वारे परदेशात गुंतवणूक करू शकतात.
