SpaceX share price crash and Elon Musk stock latest market news in Marathi: एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीचे अमेरिकन शेअर बाजारात काही दिवसांपूर्वी दमदार पदार्पण झाले होते. मात्र, स्पेएक्सच्या शेअरमधील गुंतवणूकदारांचे आकर्षण आता कमी होत असल्याचे दिसत आहे. कारण सोमवार, २२ जून रोजी स्पेसएक्सच्या शेअरमध्ये तब्बल १६ टक्क्यांची घसरण झाली आहे. सोमवारी झालेली ही घसरण स्पेसएक्सच्या शेअरमधील सलग तिसऱ्या दिवशीची घसरण ठरली आहे.
ब्लूमबर्गच्या एका वृत्तानुसार, विक्रीच्या या ताज्या लाटेमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ही घसरण सुरू झाल्यापासून कंपनीचे बाजारमूल्य जवळपास सुमारे ५१ लाख कोटी रुपयांनी (६०० अब्ज डॉलर्स) कमी झाले आहे.
अमेरिकन शेअर बाजारातील सर्वात लोकप्रिय कंपन्यांपैकी एक म्हणून उदयास आल्यानंतर काही आठवड्यांतच स्पेसएक्सला हा धक्का बसला आहे. या कंपनीने बाजार भांडवलामध्ये ॲमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांना काही काळासाठी मागे टाकले होते आणि सूचिबद्ध झाल्यानंतर प्रति शेअर २२५ डॉलर्सची उच्चांकी पातळी गाठली होती.
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, या शेअरच्या किमतीत झालेली मोठी घसरण ही मागणी आणि पुरवठ्याच्या समीकरणांमधील बदलाचेही निदर्शक असू शकते. जोन्स ट्रेडिंगचे मुख्य बाजार रणनीतीकार मायकल ओ’रूर्के यांनी नमूद केले की, ज्या गुंतवणूकदारांना या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची तीव्र इच्छा होती, त्यांनी बहुधा शेअर सूचीबद्ध झाल्यानंतर लगेचच खरेदी केली. परिणामी, शेअरच्या किमतीवरील नियंत्रण पुन्हा विक्रेत्यांच्या हाती आले.
स्पेसएक्सच्या शेअरच्या किमतीत घट होत असूनही किरकोळ गुंतवणूकदार खरेदीमध्ये मोठा रस दाखवत आहेत. कंपनीचा पब्लिक फ्लोट मर्यादित राहिला आहे, विद्यमान भागधारकांवरील लॉक-अप निर्बंधांमुळे सध्या केवळ ४.२ टक्के शेअर्सच ट्रेडिंगसाठी उपलब्ध आहेत.
घसरण होत असूनही किरकोळ गुंतवणूकदार उत्साही
सीएनबीसी टीव्ही १८ च्या एका वृत्तानुसार, वांडा रिसर्चच्या आकडेवारीतून असे समोर आले की, सूचीबद्ध कंपनी म्हणून पहिल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये वैयक्तिक गुंतवणूकदारांनी स्पेसएक्सचे निव्वळ ४०५ दशलक्ष डॉलर्स किमतीचे शेअर्स खरेदी केले होते. हा आकडा, याच कालावधीत तथाकथित ‘मॅग्निफिसेंट सेव्हन’ तंत्रज्ञान समूहाच्या सातही कंपन्यांमधील एकूण किरकोळ गुंतवणुकीपेक्षा जास्त होता.
सोमवारच्या घसरणीनंतर, स्पेसएक्सचे शेअर्स १५४.६ डॉलर्सवर व्यवहार करत होते, जे त्यांच्या १३५ डॉलर्सच्या आयपीओ किमतीपेक्षा सुमारे १५% जास्त, परंतु सूचीबद्ध झाल्यानंतरच्या उच्चांकापेक्षा सुमारे ३१% कमी होते.
