SPML Infra Share Price rises following Vijay Kedia Investment announcement in preferential issue: इक्विटी शेअर्स आणि कन्व्हर्टिबल वॉरंट्सच्या ‘प्रिफरेंशियल इश्यू’द्वारे १९० कोटी रुपये उभारण्यास कंपनीने मंजुरी दिल्यानंतर एसपीएमएल इन्फ्रा लिमिटेडचे ​​शेअर्स चर्चेत आहेत. या इश्यूद्वारे दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांच्या कुटुंबीयांनी कंपनीतील आपली गुंतवणूक वाढवल्यामुळेही या घोषणेकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

सेबीला दिलेल्या माहितीमध्ये, एसपीएमएल इन्फ्राने सांगितले की, १८ जुलै २०२६ रोजी मंजूर करण्यात आलेल्या ठरावाद्वारे कंपनीच्या संचालक मंडळाने ‘प्रिफरेंशियल बेसिस’वर ६,९३,९९९ इक्विटी शेअर्स आणि ९५,३९,४४९ कन्व्हर्टिबल वॉरंट्सच्या वाटपास मंजुरी दिली आहे. कंपनीने नमूद केले की, हा निधी उभारण्याचा उद्देश भविष्यातील विकासाला चालना देणे आणि त्याच वेळी कंपनीची आर्थिक स्थिती बळकट करणे हा आहे.

इक्विटी शेअर्स आणि वॉरंट्स प्रति युनिट १८६ रुपये या दराने जारी करण्यात आले आहेत. यामध्ये प्रति शेअर १८४ रुपयांच्या प्रीमियमचा समावेश आहे. सेबीच्या नियमांनुसार, वाटपाच्या तारखेपासून १८ महिन्यांच्या कालावधीत या वॉरंट्सचे इक्विटी शेअर्समध्ये रूपांतर करता येऊ शकते.

विजय केडिया यांची गुंतवणूक

या ‘प्रिफरेंशियल इश्यू’मध्ये प्रसिद्ध गुंतवणूकदार विजय केडिया यांच्या कुटुंबाचाही सहभाग आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, विजय केडिया यांच्या पत्नी मंजू विजय केडिया यांनी १३,४५,००० ‘कन्व्हर्टिबल वॉरंट्स’ खरेदी केले आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीला, विजय केडिया यांची गुंतवणूक संस्था असलेल्या ‘केडिया सिक्युरिटीज लिमिटेड’ने एसपीएमएल इन्फ्राचे १४,९८,१०७ इक्विटी शेअर्स खरेदी केले होते. नव्याने वाटप करण्यात आलेल्या वॉरंट्सचे शेअर्समध्ये रूपांतर झाल्यानंतर, केडिया सिक्युरिटीज लिमिटेड आणि मंजू विजय केडिया यांची एकूण शेअरहोल्डिंग वाढून २८,४३,१०७ इतकी होण्याची अपेक्षा आहे.

‘प्रिफरेंशियल इश्यू’ आणि वॉरंट्सचे रूपांतर झाल्यानंतर वाढलेल्या इक्विटी भांडवलाचा विचार करता, ही एकत्रित शेअरहोल्डिंग कंपनीतील जवळपास ३ टक्के हिश्श्याइतकी असेल.

शेअरची कामगिरी

एसएमपीएल कंपनीच्या शेअर्सनी वेगवेगळ्या कालावधीत संमिश्र परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात या शेअरमध्ये सुमारे ३ टक्के आणि गेल्या सहा महिन्यांत १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. जरी गेल्या वर्षभरात यात २५ टक्क्यांची घसरण झाली असली, तरी गेल्या तीन वर्षांत याने ३८५ टक्क्यांहून अधिक आणि गेल्या पाच वर्षांत जवळपास १,७३४ टक्के परतावा दिला आहे.

ही कंपनी जल आणि ऊर्जा पायाभूत सुविधा क्षेत्रात कार्यरत असून, भविष्यातील वाढीला चालना देण्यासाठी प्रकल्प अंमलबजावणी, ताळेबंदातील सुधारणा आणि भांडवल उभारणी यांवर ती सातत्याने लक्ष केंद्रित करत आहे.