Stock Market Crash FII Selling : गेल्या ४ दिवसात शेअर बाजारात हाहाकार पाहायला मिळाली. सेन्सेक्स तब्बल १८०० अशांहून अधिक कोसळला आहे. आज अवघ्या एका तासात गुंतवणूकदारांच्या १० लाख कोटी रुपयांचा चुराडा झाला. या घसरणीमागे परदेशी गुंतवणूकदारांचे पलायन हे मुख्य कारण आहे. मात्र, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या नवीन धोरणाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. एकीकडे दुय्यम बाजारात (Secondary Market) भारतीय शेअर्सची सलग विक्री करणारे परदेशी गुंतवणूकदार आयपीओच्या प्राथमिक बाजारात पाण्यासारखा पैसा ओतत आहेत.
परदेशी गुंतवणूकदारांनी २०२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत तब्बल ३ लाख कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहे. त्याचवेळी यंदाच्या वर्षात त्यांनी IPO मध्ये ५५,००० कोटी रुपयांहून अधिकची गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे, हा ट्रेन्ड गेल्या तीन वर्षांपासून सलग सुरू आहे.
मागील वर्षांचे आकडे काय सांगतात?
परदेशी गुंतवणूकदारांनी २०२४ या वर्षात प्राथमिक बाजारात १.२ लाख कोटी रुपयांची खरेदी केली, तर दुय्यम बाजारातूनही नेमकी १.२ लाख कोटी रुपयांचीच विक्री केली. गेल्या वर्षी २०२५ मध्ये प्राथमिक बाजारातील गुंतवणुकीचा वेग मंदावून तो ७३,९१० कोटी रुपयांवर आला. परंतु, दुय्यम बाजारातील विक्रीचा वेग वेगाने वाढून तो थेट २.४ लाख कोटी रुपयांवर पोहोचला.
कर्ज बाजारात संमिश्र चित्र (Debt Market)
केवळ इक्विटीच नव्हे, तर परदेशी गुंतवणूकदारांनी भारताच्या प्राथमिक आणि दुय्यम अशा दोन्ही कर्ज बाजारांतही गुंतवणूक केली आहे. २०२५ मध्ये दुय्यम बाजारात त्यांनी सुमारे २४,००० कोटी रुपयांची विक्री केली होती. परंतु, प्राथमिक कर्ज बाजारात ३२,००० कोटी रुपयांची खरेदी केल्याने ही कसर भरुन निघाली.
परदेशी गुंतवणुकीचा ओढा IPO कडेच का?
इक्विटी आयपीओ हे परदेशी गुंतवणूकदारांसाठी नेहमीच पसंतीचे साधन राहिले आहेत. तज्ज्ञांनुसार, “आयपीओमुळे परदेशी गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणावर शेअर्सचे अलॉटमेंट मिळते, किंमतीचा योग्य अंदाज लागतो आणि बऱ्याचदा व्हॅल्युएशनमध्ये एक सुरक्षा कवच मिळते. दुसरीकडे भारतीय दुय्यम बाजार अजूनही महाग वाटत आहे. अशात प्राथमिक बाजारात चांगल्या आणि दर्जेदार कंपन्यांचे पर्याय मिळत आहेत. तज्ज्ञांच्या मते, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, ग्राहक तंत्रज्ञान किंवा रिन्यूएबल एनर्जी यांसारख्या क्षेत्रांत IPO च्या माध्यमातून परदेशी गुंतवणूकदारांना सहज प्रवेश मिळतो, जे बेंचमार्क इंडेक्समध्ये सहसा उपलब्ध नसतात.
‘प्रायमरी मार्केट’ हे केवळ एन्ट्रीचे द्वार!
सेबीच्या गेल्या तीन वर्षांच्या आकडेवारीनुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी लिस्टिंगनंतर पहिल्याच अनलॉकच्या वेळी त्यांच्या अँकर स्टॉकपैकी सुमारे ३ टक्के शेअर्स विकले, तर एका वर्षाच्या आत तब्बल ६० टक्के शेअर्स विकून टाकले. तुलनेत म्युच्युअल फंड्सनी केवळ ३८ टक्के विक्री केल्याचे दिसून आले. म्हणजे परदेशी पैशांसाठी प्राथमिक बाजार हे गुंतवणुकीचे घर नसून केवळ बाजारात प्रवेश करण्याचे एक माध्यम आहे.
