Stock Market Crash October History Nifty Performance: भारतीय शेअर बाजार गेल्या सलग आठ आठवड्यांपासून कोसळत आहे. बाजारातील घसरणीची ही सर्वात मोठी मालिका ठरली आहे. याचबरोबर बाजाराने ऑक्टोंबर महिन्यातही घसरणीसह प्रवेश केला आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आणखी भीती निर्माण झाली आहे. कारण इतिहासात अनेकदा ऑक्टोबर महिना काळ ठरला आहे. शेअर बाजारात ऑक्टोबर महिना १९८७ मधील ‘ब्लॅक मंडे’ आणि १९२९ मधील ‘वॉल स्ट्रीट क्रॅश’ यांसारख्या घटनांसाठी कुप्रसिद्ध आहे.
या पार्श्वभूमीवर आपण ऑक्टोबरमधील शेअर बाजाराच्या काही मोठ्या पडझडींवर आणि गेल्या दहा वर्षांत या महिन्यात निफ्टी व सेन्सेक्सची कामगिरी कशी राहिली आहे, यावर नजर टाकूया.
१९२९ चा ‘वॉल स्ट्रीट क्रॅश’
जवळपास एक शतकापूर्वी म्हणजेच २८ ऑक्टोबर १९२९ रोजी अमेरिकेच्या ‘डाऊ’ निर्देशांकात जवळपास १३ टक्क्यांची घसरण झाली होती. या दिवसाला ‘ब्लॅक मंडे’ म्हणून ओळखले जाते. शेअर बाजारातील या पडझडीनंतर दुसऱ्या दिवशीही जवळपास १२ टक्क्यांची घसरण झाली, ज्या दिवसाला ‘ब्लॅक ट्यूजडे’ असे म्हटले जाते.
१९८७ चा ‘ब्लॅक मंडे’
सोमवार, १९ ऑक्टोबर १९८७ हा शेअर बाजारासाठी काळा दिवस ठरला होता. या दिवशी अमेरिकन शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक ‘डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज’मध्ये एकाच दिवसात जवळपास २२ टक्क्यांची घसरण झाली होती. अमेरिकेच्या शेअर बाजाराच्या इतिहासातील ही एका दिवसातील सर्वात मोठी घसरण ठरली. विविध वृत्तानुसार, यामुळे अमेरिकेतच सुमारे ५०० अब्ज डॉलर्सचे बाजार भांडवल नष्ट झाले होते. या घसरणीच्या घटनेलाही १९८७ चा ‘ब्लॅक मंडे’ म्हणून ओळखले जाते.
ऑक्टोबर २००८ मधील बाजारपेठेतील घसरण
ऑक्टोबर २००८ मध्ये अमेरिकेच्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. हा काळ २००८ च्या जागतिक आर्थिक संकटाचा सर्वोच्च बिंदू होता. अमेरिकेतील गृहनिर्माण क्षेत्रातील बाजारपेठ कोलमडणे आणि कमी पतमानांकन असलेल्या कर्जदारांना दिलेल्या गृहकर्जांच्या परतफेडीत झालेली कसूर, यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीतून या संकटाची सुरुवात झाली होती.
निफ्टीची कामगिरी
गेल्या १० वर्षांच्या आकडेवारीच्या विश्लेषणावरून असे दिसून येते की, ऑक्टोबर महिन्यात निफ्टी आणि सेन्सेक्सने एका विशिष्ट मर्यादेतच हालचाल दर्शवली आहे. निफ्टी ५० ने गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये ४.५१% ची वाढ नोंदवली होती, तर ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यात ६.२% ची घसरण झाली. ऑक्टोबर २०२२ मध्ये या निर्देशांकात जवळपास ५.४% ची मोठी वाढ झाली होती, मात्र ऑक्टोबर २०२१ मध्ये केवळ नाममात्र वाढ दिसून आली. तसेच, २०२० आणि २०१९ मध्ये निफ्टी ५० मध्ये प्रत्येकी सुमारे ३.५% ची वाढ झाली होती.
