Stock market crash Sensex Nifty loss : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (सोमवार २८ सप्टेंबर २०२६) शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला. सेन्सेक्स आणि निफ्टी धडाघड कोसळल्याने सुरुवातीच्या काही मिनिटांत ४ लाख २९ हजार ८८० कोटी रुपयांचे नुकसान झाले. अमेरिका आणि इराणमधील शांतता चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती अचानक भडकल्या, तर दुसरीकडे परदेशी गुंतवणूकदारांनी लावलेला विक्रीचा सपाटा, यामुळे बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली.
सकाळी ९:४० च्या सुमारास, देशाचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ८७७.८५ अंशांनी (१.१९ टक्के) घसरून ७३,०१७.८९ वर ट्रेड करत होता. दुसरीकडे, निफ्टी ५० निर्देशांक २८१.४५ अंशांनी (१.२२ टक्के) घसरून २२,८५९.05 वर आला.
बाजार घसरणीची मुख्य कारणे
कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चा फिसकटल्याने ब्रेंट क्रूडचे फ्युचर्स २ टक्क्यांनी वधारून १०६.५ डॉलर प्रति बॅरल वर पोहोचले आहेत. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा क्रूड आयातदार देश असल्यामुळे, तेलाच्या वाढत्या किंमती देशात महागाई वाढवू शकतात, आयातीचा खर्च वाढवू शकतात आणि कंपन्यांच्या नफ्यावर विपरीत परिणाम करू शकतात.
भू-राजकीय तणाव
होर्मुझचा सागरी मार्ग खुला करणे आणि संघर्ष संपवण्याचा इराणचा प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळला आहे. दुसरीकडे, अमेरिका आणि इस्रायलसोबतचा संघर्ष केवळ राजनैतिक मार्गानेच सुटू शकतो, असा दावा इराणने रविवारी केला आहे. या वाढत्या संघर्षामुळे जागतिक बाजारात भीतीचे वातावरण आहे.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची बिकट विक्री
परदेशी गुंतवणूकदारांनी शुक्रवारच्या सत्रातही आपला विक्री सुरूच ठेवली असून, तब्बल ३,६९६ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे. या सततच्या आक्रमक विक्रीचा मोठा ताण बाजारावर पडत आहे.
गुंतवणूकदारांचे अवघ्या काही मिनिटांत लाखो कोटी पाण्यात
बाजारातील या तीव्र घसरणीचा थेट फटका मुंबई शेअर बाजारातील लिस्टेड असलेल्या कंपन्यांच्या मूल्याला बसला आहे. काही मिनिटांच्या आतच कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप ४,८१,८८,९९८.४५ कोटी रुपयांवरून घसरून ४,७७,५९,११७.४९ कोटी रुपयांवर आले, ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे.
कोणत्या क्षेत्रांमध्ये पडझड?
आजच्या व्यवहारात बँकिंग, एफएमसीजी आणि रियल्टी या शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री पाहायला मिळत आहे. घसरण झालेल्या प्रमुख कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स आणि स्टेट बँक अग्रस्थानी आहेत. केवळ मोठे शेअर्सच नव्हे, तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स देखील ०.२ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. एकूण १६ पैकी १४ सेक्टर्स लाल निशाणात व्यवहार करत आहेत.
