Stock Market Crash : अमेरिकेने केलेल्या हल्याच्या प्रत्युत्तरात इराणने कुवेत, बहारीनवर क्षेपणास्त्र डागल्याने पश्चित आशियातील तणाव वाढला आहे. याचा थेट परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर पाहायला मिळाला. आज बुधवार, ३ जून २०२६ रोजी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात अत्यंत कमकुवत झाली. बाजार उघडताच काही मिनिटांतच मुंबई शेअर बाजाराचा ‘सेन्सेक्स’ ११५० पेक्षा जास्त अंशांनी गडगडला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ २३,३०० च्या खाली आला. या मोठ्या पडझडीमुळे बाजारातील गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला असून, त्यांचे कोट्यवधी रुपये बुडाले आहेत.

बाजार उघडताच २.४६ लाख कोटींचे नुकसान

बाजारात झालेल्या या चौफेर विक्रीमुळे बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल काही मिनिटांतच २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त घसरले. मंगळवारी बीएसईवरील सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप ४,६२,०२,७०४.८३५ कोटी रुपये होते. जे आज ३ जून २०२६ रोजी बाजार उघडताच ते घसरून ४,५९५६,५४२.९१ कोटींवर आले. म्हणजेच, आज बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे २.४६ लाख कोटी रुपयांची प्रचंड मोठी घट झाली आहे.

सध्या बाजाराची स्थिती काय

सकाळी ०९:३० वाजता सेन्सेक्स ७८९.१९ अंश म्हणजेच १.०६% घसरणीसह ७३,८६०.६५ वर व्यवहार करत होता. इंट्रा-डे दरम्यान सेन्सेक्सने ७३,८३३.७५ चा नीचांक गाठला होता. (८१६.०९ अंशाची घसरण). तर निफ्टी ५० २१५.३५ अंश म्हणजेच ०.९२% घसरणीसह २३,२६८.२० वर होता. इंट्रा-डे मध्ये निफ्टी २३,२६५.२५ पर्यंत खाली घसरला होता. व्यापक बाजारातही दबाव दिसून आला. निफ्टी मिडकॅप १५० आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० या दोन्ही निर्देशांकांमध्ये अर्ध्या टक्क्यापेक्षा जास्त घसरण नोंदवली गेली.

आयटी इंडेक्स ३% पेक्षा जास्त तुटला

क्षेत्रीय पातळीवर विचार केल्यास आज बाजारात केवळ निफ्टी मेटल हा एकमेव निर्देशांक हिरव्या निशाणावर होता, मात्र तोही सपाट होता. दुसरीकडे इतर सर्व क्षेत्रांमध्ये मोठी घसरण झाली. निफ्टी आयटी निर्देशांक सर्वाधिक म्हणजे ३% पेक्षा जास्त कोसळला. निफ्टी पीएसयू बँक आणि निफ्टी रियल्टी या दोन्ही क्षेत्रांमध्ये १-१ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली.

सेन्सेक्सच्या ३० पैकी केवळ ३ शेअर्समध्ये तेजी

सेन्सेक्समधील प्रमुख ३० शेअर्सचा आढावा घेतला, तर केवळ ३ शेअर्स हिरव्या निशाणावर व्यापार करत होते. यामध्ये अदाणी पोर्ट्स, भारती एअरटेल आणि टाटा स्टील यांचा समावेश होता. याउलट, आयटी क्षेत्रातील दिग्गज शेअर्स टीसीएस, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा यांच्यात सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली. याचा अर्थ आज चौफेर विक्री पाहायला मिळत आहे.

बाजार घसरणीचे मुख्या कारणे

  • ताज्या घडामोडीत इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष पेटला आहे. इराणने होर्मुझचा सागरी मार्ग पूर्णपणे बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे उर्जा पुरवठा साखळी विस्कळीत होण्याच्या भीतीने बाजारात पॅनिक सेलिंग पाहायला मिळाले.
  • आज सर्वाधिक घसरण आयटी निर्देशंकात पाहायला मिळाली. शेअर बाजार उघडल्यानंतर आयटी इंडेक्समध्ये तीव्र ४.५ टक्के घसरण नोंदवली गेली. विशेषतः टीसीएसचा शेअर सर्वाधिक ७ टक्के कोसळला.
  • पश्चिम आशियात पुन्हा संघर्ष वाढल्याने याचे थेट आंतरराष्ट्रीय तेल बाजारात पाहायला मिळाले. कच्चे तेलाच्या दरात ०.८९ टक्के वाढ झाली. याचे पडसाद आज शेअर बाजारात उमटले. इंधनदरवाढीच्या भीतीने गुंतवणूकदारांनी आपले पैसे काढून घेतले आहेत.
  • सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या वर्षभरापासून परदेशी गुंतवणूकदार सातत्याने विक्री करत आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी २.२२ लाख कोटी शेअर्सची विक्री या वर्षात आतापर्यंत केली आहे.
  • अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण थांबायचं नाव घेताना दिसत नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांचे सेंटीमेन्ट्स बिघडले आहेत. रुपयाचे अवमूल्यन झाल्याने आयात महागली आहे.
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर १५ टक्के आयात शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भारतीय उद्योगांना मोठा फटका बसणार आहे. या सर्वांचा परिणाम असा झाला की शेअर बाजारात मोठी घसरण झाली.