Sensex and Nifty opening today with a massive gap down following Donald Trump’s warning to Iran: गेल्या काही आठवड्यांपासून तोट्यात असलेल्या भारतीय शेअर बाजारांनी काल जोरदार कामगिरी केली होती. पण, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात केलेल्या आक्रमक विधानांमुळे मध्य पूर्वेत सुरू असलेले इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका यांच्यातील युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी आज केलेल्या इराणविरोधातील विधानांमुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर नकारात्मक परिणाम झाला आहे. परिणामी, सकाळी ९: १५ वाजता सेन्सेक्स १,४६६.५२ अशांनी (२.०१%) घसरत ७१,६६७.८० अंशांवर उघडला. तर निफ्टी ५० निर्देशांक ४६१.२० अंशांनी (२.०३%) घसरत २२,२१८.२० अशांवर उघडला.
गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी रुपयांचे नुकसान
आज शेअर बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. कारण बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मागील सत्रातील ४२२ लाख कोटी रुपयांवरून घसरून ४१३ लाख कोटी रुपयांवर आले.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
“अमेरिका इराणविरुद्धची सर्व लष्करी उद्दिष्ट्ये पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. अमेरिका पुढील दोन ते तीन आठवड्यांत इराणवर पुन्हा जोरदार हल्ला करेल. जर कोणताही करार झाला नाही, तर अमेरिका इराणला पुन्हा अश्मयुगात पोहोचवेल. मात्र, मुख्य उद्दिष्ट पूर्णत्वाच्या जवळ येत असल्याने हा संघर्ष काही कालावधीत संपवला जाऊ शकतो”, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
सध्या बाजारांसाठी मोठी चिंता
सध्याच्या बाजारातील परिस्थितीवर बोलताना, जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य गुंतवणूक धोरणतज्ञ, डॉ. व्ही. के. विजयकुमार यांनी निदर्शनास आणून दिले की, “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या ‘आम्ही पुढील दोन ते तीन आठवड्यांत इराणला अत्यंत जोरदार फटका देणार आहोत’ या घोषणेमुळे बाजारातील भावना पुन्हा नकारात्मक झाल्या आहेत. ब्रेंट क्रूड सुमारे ५ टक्क्यांनी वाढून १०५ डॉलरवर पोहोचले आणि अमेरिकेच्या १०-वर्षीय बाँडचे उत्पन्न पुन्हा ४.३६ टक्क्यांपर्यंत वाढले, ज्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतींवर, जरी किंचित असले तरी, नकारात्मक परिणाम झाला.”
“दरम्यान, एफपीआय (FPIs) कडून मोठ्या प्रमाणात विक्री सुरूच आहे, १ एप्रिल रोजी ८३३१ कोटी रुपयांची विक्री झाली. कच्च्या तेलाची वाढलेली किंमत, वाढती व्यापार तूट, परदेशातून येणाऱ्या पैशांत (रेमिटन्स) घट होण्याची भीती आणि एफपीआयकडून होणारी सततची विक्री हे सर्व घटक एकत्रितपणे रुपयावर मोठा दबाव आणत आहेत, जो डॉलर फ्युचर्स सौद्यांवरील निर्बंधांबाबत आरबीआयच्या निर्णयानंतरही घसरत आहे”, असे विजयकुमार यांनी पुढे म्हटले.
काल काही होती बाजारातील परिस्थिती?
काल १ एप्रिल २०२६ रोजी नवीन आर्थिक वर्षाची दमदार सुरुवात करत, सेन्सेक्स १,१८६.७७ अंशांनी म्हणजेच १.६५ टक्क्यांनी वधारून ७३,१३४.३२ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने २,०१७.०३ अंशांची कमाई करत ७३,९६४.५८ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे निफ्टी ३४८ अंशांनी वधारून (१.५६ टक्के) २२,६७९.४० पातळीवर बंद झाला.
बाजारात दिवसभरात काय घडले?
सकाळी १०:०० वाजता सेन्सेक्स १,५२७.४६ अंशांनी (किंवा २.०९ टक्क्यांनी) घसरून ७१,६०६.८६ वर, तर निफ्टी ४८५.८० अंशांनी (किंवा २.१४ टक्क्यांनी) घसरून २२,१९३.६० वर व्यवहार करत होता. यामध्ये सुमारे ७९९ शेअर्समध्ये वाढ झाली, २,५२१ शेअर्समध्ये घसरण झाली आणि १४५ शेअर्स स्थिर राहिले.
सकाळी ११:०० वाजता सेन्सेक्स १,३९७.६६ अंशांनी (किंवा १.९१ टक्क्यांनी) घसरून ७१,७३६.६६ वर, तर निफ्टी ४४०.४० अंशांनी (किंवा १.९४ टक्क्यांनी) घसरून २२,२३९ वर व्यवहार करत होता.
दुपारी १२:०० वाजता सेन्सेक्स १२९१.५१ अंशांच्या घसरणीसह ७१,८४२.८१ तर, निफ्टी ५० निर्देशांक ३९९.४५ अंशांच्या घसरणीसह २२,२७९.९५ अंशांवर व्यवहार करत होता.
दुपारी १:०० वाजता सेन्सेक्स ९४६.६४ अंशांनी (किंवा १.२९ टक्क्यांनी) घसरून ७२,१८७.६८ वर, तर निफ्टी २८३.५५ अंशांनी (किंवा १.२५ टक्क्यांनी) घसरून २२,३९५.८५ वर व्यवहार करत होता. सुमारे १४९९ शेअर्समध्ये वाढ झाली, २२१० शेअर्समध्ये घसरण झाली आणि १५५ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.
दुपारी २:०० सेन्सेक्स ५००.६२ अंशांनी किंवा ०.६८ टक्क्यांनी घसरून ७२६३३.७० वर आला, तर निफ्टी १४७.६५ अंशांनी किंवा ०.६५ टक्क्यांनी घसरून २२५३१.७५ वर आला. सुमारे १९६४ शेअर्समध्ये वाढ झाली, १८२९ शेअर्समध्ये घट झाली आणि १४६ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.
दुपारी ३:०० वाजता सेन्सेक्स ४३.१५ अंशांनी (किंवा ०.०६ टक्क्यांनी) वधारून ७३,१७७.४७ वर पोहोचला, तर निफ्टी १.०५ अंशांनी (किंवा ०.०० टक्क्यांनी) वधारून २२,६८०.४५ वर व्यवहार करत आहे. सुमारे २,२३१ शेअर्समध्ये वाढ झाली, १,६५४ शेअर्समध्ये घसरण झाली आणि १३६ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.
बाजार सावरला
दुपारी ३:३० वाजता सेन्सेक्स १८५.२३ अंशांनी (किंवा ०.२५%) वधारून ७३,३१९.५५ अंशांवर बंद झाला, तर निफ्टी ३३.७० अंशांनी (किंवा ०.१५%) वधारून २२,७१३.१० अंशांवर स्थिरावला. बाजारात सुमारे २,५४८ शेअर्समध्ये वाढ झाली, १,५०५ शेअर्समध्ये घसरण झाली आणि १४७ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.
सेन्सेक्सने दिवसाच्या नीचांकी पातळीवरून १,७५० अंशांची उसळी घेतली, तर निफ्टीने २२,७०० अंकांची मानसिकदृष्ट्या महत्त्वाची पातळी पुन्हा गाठली. सेन्सेक्सची दिवसातील नीचांकी पातळी ७१,५४५.८१ होती, तर निफ्टीची नीचांकी पातळी २२,१८२.५५ होती.
