मुंबई: अमेरिका आणि इराणने दोन आठवड्यांच्या युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर, जागतिक बाजारांतील जोरदार तेजी आणि नरमलेल्या खनिज तेलाच्या किमतीमुळे बुधवारी शेअर बाजाराचा नूरच बदलला. उत्साही खरेदीच्या लाटेने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने तब्बल ४ टक्क्यांपर्यंत तेजी दाखवली.

सलग पाचव्या दिवशी वाढीचा क्रम कायम राखणारा सेन्सेक्स बुधवारी २,९४६.३२ अंशांनी म्हणजेच ३.९५ टक्क्यांनी वधारला. गेल्या पाच आठवड्यात युद्धाच्या धास्तीने प्रचंड गडगडलेल्या बाजारामुळे बेजार गुंतवणूकदारांसाठी हा मोठा दिलासा ठरला. एका सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १७ लाख कोटी रुपयांची भर पडली. दिवसअखेर सेन्सेक्स ७७,५६२.९० पातळीवर स्थिरावला आणि सत्रादरम्यान, त्याने ३,०१८.९६ अंशांची झेप घेत ७७,६३५.५४ या उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे निफ्टी ८७३.७० अंशांनी म्हणजेच ३.७८ टक्क्यांनी उसळला आणि २३,९९७.३५ अंशांवर बंद झाला. सत्रात त्याने ९०१.५ अंशांची कमाई करत २४ हजारांपुढी पातळी गाठली होती.

जागतिक बाजाराला उत्साही वळण

खनिज तेलाच्या किमतीचा जागतिक मापदंड असलेल्या ‘ब्रेंट क्रूड’च्या किमती १३.८९ टक्क्यांनी कोसळल्या आणि पिंपामागे ९४.०९ डॉलरवर उतरल्या. युद्धबंदीच्या घोषणेने साधलेला हा सुखद दिलासा पाहता, पहाटे खुल्या झालेल्या आशियाई बाजारांमध्ये तेजीचा उत्साह दिसून आला. दक्षिण कोरियाचा निर्देशांक ‘कोस्पी’ ६.८७ टक्क्यांनी वधारला, तर जपानचा ‘निक्केई २२५’ निर्देशांक ५.३९ टक्के, शांघायचा ‘एसएसई कम्पोझिट’ आणि हाँगकाँगच्या ‘हँग सेंग’ या निर्देशांकांनीही जोरदार तेजी नोंदवली. युरोपीय बाजारांमध्येही चैतन्याचे वातावरण होते.

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा उघडल्याने पुरवठा धक्का सोसत असलेल्या भारताला तात्काळ दिलासा मिळणार आहे. तेलाच्या किमतीही १०० डॉलरच्या खाली आल्या आहेत आणि कंपन्यांच्या मिळकत वाढीतील घसरणीचा धोका कमी झाला आहे. भांडवली बाजारातील तेजीमुळे रुपयाला देखील बळ मिळाले, तर रिझर्व्ह बँकेच्या ‘जैसे थे’ भूमिकेने वित्तीय क्षेत्राला आधार मिळवून दिला, अशा सर्व अनुकूल घटकांचा जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी तेजीच्या तूफानाची कारणे सांगताना उल्लेख केला.

सेन्सेक्समधील इंटरग्लोब एव्हिएशन – इंडिगोचा समभाग ८.२२ टक्क्यांनी वधारला. लार्सन अँड टुब्रो, बजाज फायनान्स, महिंद्र अँड महिंद्र, ॲक्सिस बँक आणि मारुती यांनीही दमदार वाढ साधली. तर टेक महिंद्र, सन फार्मा आणि पॉवर ग्रिड हे समभाग घसरणीसह बंद झाले.

पाकिस्तानी बाजाराला नवतेज

पाकिस्तानचा प्रमुख शेअर निर्देशांक असलेल्या केएसई-१०० ने बुधवारी एका सत्रात १२,३६२.३८ अंशांची म्हणजेच ८.१५ टक्क्यांची कमाई करत १६४,०३५.८३ अंशांवर झेप घेतली. अमेरिका आणि इराण शस्त्रसंधीत पाकिस्तानने बजावलेली भूमिका ही गुंतवणूकदारांचा उत्साह दुणावणारी ठरली आणि निर्देशांकात १२,००० हून अधिक अशांची वाढ झाली. निर्देशांकात ही प्रचंड वाढ अर्थात वरचे ‘सर्किट’ भेदल्याच्या परिणामी काही कालावधीसाठी तेथील व्यवहार स्थगित करावे लागले होते.

बाजारातील तेजीमागील प्रमुख घटक

१) अमेरिका-इराण युद्धबंदी : दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घडामोडीचे वर्णन जागतिक शांततेसाठी एक मोठा दिवस असे केले.

२) खनिज तेलात तीव्र घसरण : ‘ब्रेंट क्रूड’च्या किमती १३.८९ टक्क्यांनी घसरून ९४.०९ अमेरिकी डॉलर प्रतिपिंपावर आल्या; यामुळे ऊर्जा पुरवठ्यातील व्यत्ययाबाबतच्या चिंता काहीशा कमी झाली आहे.

३) जागतिक बाजारपेठेत तेजी : आशियाई बाजारपेठांमध्ये, दक्षिण कोरियाचा बेंचमार्क कोस्पी ६.८७ टक्क्यांनी आणि जपानचा निक्केई २२५ निर्देशांक ५.३९ टक्क्यांनी वधारला. शांघायचा एसएसई कंपोझिट निर्देशांक आणि हाँगकाँगच्या हँग सेंग निर्देशांकातही मोठी तेजी नोंदवली गेली. युरोपियन बाजारपेठांमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली. वॉल स्ट्रीट फ्युचर्समध्येही ३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली.

४) रुपया सावरला: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील लष्करी हल्ले स्थगित केल्याची घोषणा आणि रिझर्व्ह बँकेने ‘तटस्थ दृष्टिकोन’ कायम ठेवून रेपो दर अपरिवर्तित ठेवल्यानंतर, बुधवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ४७ पैशांनी सावरला आणि ९२.५९ च्या पातळीवर स्थिरावला.

५) रेपोदर जैसे थे : अमेरिका/इस्रायल आणि इराण यांच्यातील सहा आठवडे चाललेल्या संघर्षात युद्धविरामाची घोषणा झाल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल, या आशेने रिझर्व्ह बँकेने रेपोदरामध्ये कोणताही बदल न करता ते स्थिर ठेवले आहेत. किरकोळ महागाईचा दर अंदाज ४ टक्क्यांवर कायम ठेवला आहे.

६) बँक समभागांना मागणी : बँक निफ्टी बँक ३,०६२ अंशांनी वधारला आणि ५५,७७८.२५ या सत्रातील उच्चांकावर पोहोचला. ही गेल्या ५ वर्षांतील एका सत्रात झालेली सर्वात मोठी आहे

७) अस्थिरता निर्देशांकात घट: बाजारातील अस्थिरतेचे निदर्शक असलेला ‘इंडिया व्हीआयएक्स’ निर्देशांक २०.२४ टक्क्यांनी घसरून १९.७० वर पोहोचला. या निर्देशांकातील घसरण बाजारातील अनिश्चितता कमी झाल्याचे संकेत देते आणि तेजीच्या वातावरणाला बळ देते.

युद्धविरामाच्या घोषणेमुळे भीतीची भावना कमी झाली. ज्यामुळे ‘विक्स’ हा अस्थिरता निर्देशांक २० टक्क्यांहून अधिक घसरला आणि जो अनिश्चिततेत वेगाने घटल्याचे दर्शवतो. या सकारात्मकतेने तेजीला बळकटी दिली. – पोनमुडी आर, मुख्याधिकारी, एनरिच मनी