Stock Market Sensex Nifty Opening October 2026 Gold Rate Forecast: गेल्या आठवड्यातील निराशाजनक कामगिरीनंतर आज १० ऑक्टोंबर रोजी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून सलगपणे पैसे गमावणाऱ्या गुंतवणूकदारांना लाखो कोटी रुपयांचा लाभ झाला आहे.
सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये जवळपास ५०० अंशांची वाढ होऊन तो ७२,४०० च्या वर व्यवहार करू लागला, तर निफ्टी ५० मध्ये १४० हून अधिक अंशांची वाढ होऊन तो २२,५६० च्या वर पोहोचला होता. व्यापक बाजारानेही चांगली सुरुवात केली. यात निफ्टी स्मॉलकॅप १०० आणि निफ्टी मिडकॅप १०० या निर्देशांकांमध्ये प्रत्येकी ०.८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली.
बजाज फायनान्सचे शेअर ३ टक्क्यांहून अधिक वाढीसह सेन्सेक्समधील तेजीचे नेतृत्व करत होते, तर बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, एसबीआय, एल अँड टी, ॲक्सिस बँक, पॉवर ग्रिड, एनटीपीसी आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये प्रत्येकी १-२ टक्क्यांची वाढ झाली. बाजाराचा एकूण कल मोठ्या प्रमाणात सकारात्मक असल्याचे पाहायला मिळत आहे. एनएसईवर २,०६५ शेअरमध्ये वाढ झाली, तर ८२१ शेअरमध्ये घसरण दिसून आली आणि १२६ शेअरचे भाव स्थिर राहिले.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये निफ्टी पीएसयू बँक निर्देशांकाने २ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवत आघाडी घेतली, तर निफ्टी मेटल आणि निफ्टी रिअल्टी या निर्देशांकांमध्ये प्रत्येकी १ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. मात्र, निफ्टी फार्मा, निफ्टी हेल्थकेअर आणि इतर काही निर्देशांकांमध्ये घसरण झाली.
बाजारातील सध्याची स्थिती
सकाळी १०:०० वा. सेन्सेक्स ४९६.६९ अंशांनी वधारून ७२,४०६.३९ वर, तर निफ्टी १३८.३५ अंशांनी वधारून २२,५६०.३० वर पोहोचला. यादरम्यान २,२५२ शेअर्समध्ये वाढ झाली, १,३२२ शेअर्समध्ये घसरण झाली आणि २१६ शेअर्सचे भाव स्थिर राहिले.
सकाळी ११:०० वा. सेन्सेक्स २७६.५७ अंशांनी वधारून ७२,१८६.२७ वर, तर निफ्टी ८१.०० अंशांनी वधारून २२,५०२.९५ वर व्यवहार करता होता. यादरम्यान १,९१५ शेअर्समध्ये वाढ झाली, १,८८२ शेअर्समध्ये घसरण झाली आणि २०९ शेअर्सचे भाव स्थिर राहिले.
सोने
मोठ्या घसरणीनंतर सोने नव्या आठवड्यात प्रवेश करत आहे, कारण बाजारपेठ अमेरिकेची आर्थिक आकडेवारी, मजबूत डॉलर आणि वाढलेल्या बॉण्ड यील्ड्समध्ये संतुलन साधत आहे. सोन्याच्या उद्योगाच्या दृष्टिकोनातून, भारतातील प्रत्यक्ष मागणी स्थिर असली तरी ती निवडक आहे. सध्याच्या किमतींवर, ग्राहक आणि सराफ टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याची शक्यता आहे, तर सणासुदीचा आणि लग्नसराईचा हंगाम मागणीला हळूहळू आधार देईल”, असे ॲस्पेक्ट बुलियन अँड रिफायनरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन देसाई यांनी म्हटले.
“पुढील आठवड्यासाठी, अमेरिकेतील व्याजदरांच्या अपेक्षा, डॉलर, बॉण्ड यील्ड्स, भू-राजकीय घडामोडी आणि आरबीआयच्या धोरणात्मक निर्णयांचा किमतींवर प्रभाव पडणार असल्याने, सोन्याचे दर अस्थिर राहतील अशी आमची अपेक्षा आहे”, असे ते शेवटी म्हणाले.
