Stockal Securities Scam: बंगळुरूतील ‘स्टॉकल सिक्युरिटीज’ या फिनटेक प्लॅटफॉर्मने ३० गुंतवणूकदारांच्या संमतीविना त्यांच्या अमेरिकन ‘ब्लू-चिप’ शेअर्सची मोठ्या प्रमाणावर विक्री केली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना १०० कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा आरोप आहे. याबाबत संबंधित गुंतवणूकदारांनी माहिती दिल्याचे वृत्त मनीकंट्रोल या संकेतस्थळाने दिले आहे.
काय आहे स्टॉकल?
स्टॉकल सिक्युरिटीज हा बेंगळुरूस्थित एक भारतीय फिनटेक प्लॅटफॉर्म आहे. जो सेबीकडे नोंदणीकृत आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे भारतातील किरकोळ गुंतवणूकदारांना अमेरिकन शेअर्स, एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ETFs) आणि इतर परदेशी सिक्युरिटीज खरेदी-विक्री करता येते.
या प्लॅटफॉर्मचे एक विशेष ॲप उपलब्ध आहे, ज्याद्वारे गुंतवणूकदार खात्यात निधी जमा करू शकतात, ट्रेडिंग करू शकतात आणि आपल्या पोर्टफोलिओचा आढावा घेऊ शकतात. व्यवहार पूर्ण करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांची गुंतवणूक सुरक्षित राहावी यासाठी या प्लॅटफॉर्मने ‘ड्राइव्हवेल्थ एलएलसी’सारख्या अमेरिकन क्लिअरिंग ब्रोकर्ससोबत भागीदारी केली आहे.
पीडित गुंतवणूकदारांना स्टॉकलशी प्लॅटफॉर्मची माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजच्या माध्यमातून मिळाली होती. एचडीएफसी सिक्युरिटीजने २०१९ मध्ये globalinvesting.in सुरू करण्यासाठी या प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी केली होती. पण, दोन्ही संस्थांमधील जागतिक गुंतवणुकीची भागीदारी जुलै २०२४ मध्ये संपुष्टात आली होती.
प्रसिद्ध कोल्ड ड्रिंक कंपनीच्या अधिकाऱ्यालाही फटका
भारतातील एका आघाडीच्या पेय कंपनीतील एक वरिष्ठ अधिकारी, या ३० पीडित गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. त्यांनी मनीकंट्रोल या संकेतस्थळाला सांगितले की, ॲपल, टेस्ला, ॲमेझॉन, अल्फाबेट, एनव्हिडिया आणि एएमडीसह त्यांच्या १० प्रमुख अमेरिकन स्टॉक होल्डिंग्ज त्यांच्या परवानगीशिवाय ३३५,७६८ डॉलरमध्ये विकण्यात आल्या. त्यानंतर ही रक्कम चिनी कंपनी Zhibao Technology Inc. चे ३ लाख शेअर्स खरेदी करण्यासाठी एकाच ऑर्डरमध्ये वापरण्यात आली.
हे शेअर्स प्रति शेअर १.०५ डॉलर्सच्या सरासरी किमतीत खरेदी करण्यात आले होते. त्यानंतरच्या काही दिवसांत ZBAO च्या शेअरच्या किमतीत जवळपास ६० टक्क्यांची घसरण झाली आणि २३ ऑक्टोबर रोजी तो ०.४२ डॉलर्सवर बंद झाला. या गुंतवणूकदाराने सांगितले की, यामुळे त्याला सुमारे ४.२६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
२९ कोटींचा पोर्टफोलिओ २ मिनिटांत रिकामा
मनीकंट्रोलला आणखी एका पीडित गुंतवणूकदाराने दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर रोजी त्यांच्या स्टॉकल खात्यातील सुमारे २९ कोटी रुपये किमतीचे शेअर्स त्यांच्या परवानगीशिवाय विकून टाकण्यात आले. त्याच्या म्हणण्यानुसार, अवघ्या दोन मिनिटांत त्यांचा संपूर्ण पोर्टफोलिओ विकून अत्यंत कमी उलाढाल असलेल्या कंपनीचे ३०.५ लाख शेअर्स खरेदी करण्यात आले. गुंतवणूकदाराचा असाही आरोप आहे की, कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा पडताळणी न करता, अवघ्या १५ मिनिटांत ही खरेदी पूर्ण करण्यात आली.
