Sun TV Network Share Price Drop : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे सुरुवातीचे कल हाती येताच राजकीय वर्तुळासोबतच शेअर बाजारातही मोठी खळबळ उडाली आहे. चित्रपट अभिनेता आणि राजकीय नेते विजय यांचा तमिळगा वेत्री कळघम पक्षाने राज्यात जोरदार मुसंडी मारत आघाडीवर असून सत्ताधारी डीएमके आघाडी पिछाडीवर पडली आहे. याचा थेट परिणाम मारन कुटुंबाच्या मालकीच्या ‘सन टीव्ही नेटवर्क’ कंपनीच्या शेअर्सवर झाला आहे.
तामिळनाडूमध्ये सत्तापालटाचे संकेत मिळताच शेअर बाजारात सन टीव्हीच्या शेअर्सवर विक्रीचा मोठा दबाव दिसून आला. आज सुरुवातीच्या व्यवहारात सन टीव्हीचे शेअर्स ९ टक्क्यांहून अधिक घसरले. ऑगस्ट २०२४ नंतरची ही एका दिवसातील सर्वात मोठी इंट्रा-डे घसरण ठरली आहे. सद्यस्थितीत बीएसईवर हा शेअर ८.१८% घसरणीसह ५५५.५० रुपयांवर व्यवहार करत आहे. विशेष म्हणजे, मतमोजणीच्या सुरुवातीला या शेअर्समध्ये काहीशी खरेदी झाली होती. परंतु, कल स्पष्ट होऊ लागताच शेअर्स गटांगळ्या खाऊ लागले.
राजकीय कनेक्शन आणि घसरणीचे कारण
सन टीव्ही नेटवर्कमधील ही मोठी घसरण पूर्णपणे तामिळनाडूच्या राजकीय घडामोडींशी संबंधित आहे. सन टीव्हीचे मालकी हक्क मारन कुटुंबाकडे आहेत. कलानिधी मारन हे दिवंगत डीएमके नेते एम. करुणानिधी यांचे नातू आहेत. त्यामुळे डीएमकेची कामगिरी आणि सन टीव्हीचा शेअर यांचा थेट संबंध मानला जातो. सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकी देखील याच कुटुंबाकडे आहे. कलानिधी मारन यांची मुलगी काव्या मारन ही देखील कंपनीच्या मंडाळावर सदस्य आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांनुसार, अभिनेता विजय यांचा पक्ष ‘टीव्हीके’ ९८ जागांवर आघाडीवर आहे, तर एडीएमके ७१ आणि सत्ताधारी डीएमके केवळ ६३ जागांवर आघाडीवर आहे.
कशी राहिली शेअर्सची ऐतिहासिक चाल?
गेल्या काही वर्षांत सन टीव्हीच्या शेअर्सची कामगिरी संमिश्र राहिली आहे. वर्ष २०२३ मध्ये या शेअरने ४६% ची मोठी झेप घेतली होती. मात्र, २०२४ मध्ये ४%, २०२५ मध्ये १४% आणि २०२२ मध्ये ३% अशी घसरण पाहायला मिळाली. २०२१ मध्ये या शेअरमध्ये ४% ची किरकोळ वाढ झाली होती.
गुंतवणूकदारांना ‘शॉक’
गेल्या वर्षभराचा विचार केल्यास सन टीव्हीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठे धक्के दिले आहेत. १२ जून २०२५ रोजी या शेअरने ६६२.०० रुपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र, त्यानंतरच्या ७ महिन्यांत मोठ्या चढ-उतारांनंतर २३ जानेवारी २०२६ रोजी हा शेअर ४८५.१० रुपयांच्या नीचांकी स्तरावर पोहोचला होता.
