Tehran Stock Exchange : इराण-अमेरिका संघर्ष लवकरच संपण्याचा मोठा संकेत आज पाहायला मिळाला. युद्धामुळे गेल्या ८० दिवसांपासून पूर्णपणे ठप्प असलेला इराणचा शेअर बाजार ‘तेहरान स्टॉक एक्स्चेंज’ अखेर मंगळवार, १९ मे रोजी पुन्हा उघडण्यात आला. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस दोन्ही देशांमध्ये संघर्षाची ठिणगी पडल्याने हा बाजार अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला होता. बाजार पुन्हा सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी मुख्य निर्देशांकात तांत्रिक वाढ पाहायला मिळाली. मात्र, बाजाराची चाल अत्यंत कमकुवत होती. पहिल्याच दिवशी तब्बल ७५ टक्के कंपन्यांचे शेअर्स घसरून बंद झाले.
पहिल्या दिवशी मुख्य निर्देशांक वधारला पण…
इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तेहरान स्टॉक एक्स्चेंजचा मुख्य निर्देशांक ‘टेडपिक्स’ पहिल्या सत्रात २,५०० अंकांच्या वाढीसह ३,७१६,००० च्या पातळीवर बंद झाला. मात्र, ‘रोया न्यूज’ने ‘अरब न्यूज’च्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, ही वाढ केवळ निवडक समभागांपुरतीच मर्यादित होती. बाजारात व्यवहार झालेल्या एकूण कंपन्यांपैकी केवळ २८ टक्के कंपन्यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले, तर उर्वरित ७५ टक्के कंपन्यांचे समभाग मोठ्या घसरणी बंद झाले.
४० हून अधिक बड्या कंपन्यांचे व्यवहार ठप्प
युद्धाच्या काळात झालेल्या प्रचंड नुकसानामुळे पहिल्याच दिवशी ४० हून अधिक मोठ्या कंपन्यांचे ट्रेडिंग पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. अमेरिकन हवाई हल्ल्यांमध्ये अनेक कंपन्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, तर अनेकांना कच्च्या मालाच्या पुरवठ्यातील विस्कळीततेमुळे मोठा फटका बसला आहे. याचा थेट परिणाम कंपन्यांच्या महसुलावर झाला असून, बाजार सुरू होण्यापूर्वी या कंपन्या नियमानुसार आवश्यक असलेली आर्थिक माहिती स्टॉक एक्स्चेंजला सादर करू शकल्या नाहीत.
बाजार का बंद करण्यात आला होता?
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर क्षेपणास्त्र हल्ले सुरू केल्यानंतर तेहरान स्टॉक एक्स्चेंज तातडीने बंद करण्यात आले होते. गुंतवणूकदारांचे मोठे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती इराणच्या ‘सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज ऑर्गनायझेशन’चे उपप्रमुख हामिद यारी यांनी दिली. ते म्हणाले, की अशा परिस्थिती शेअर बाजारात पॅनिक सेलिंग होण्याची शक्यता असते.
इराणच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का
अमेरिका आणि इस्रायलसोबतच्या या संघर्षाचा इराणच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. कोणताही शेअर बाजार हा त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा खरा आरसा असतो. मुख्य निर्देशांक २,५०० अंकांनी वधारलेला दिसत असला, तरी ४० कंपन्यांचे ट्रेडिंग बंद असणे आणि ७५% शेअर्स घसरणे हे इराणमधील आर्थिक नुकसानाचे स्पष्ट संकेत आहेत. युद्धामुळे पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान आणि अंतर्गत राजकीय अस्थिरता पाहता, इराणी बाजाराला पूर्वपदावर येण्यासाठी अनेक वर्षांचा काळ लागू शकतो.
