Transformers and Rectifiers Share Price : मागील ४ दिवसात शेअर बाजारात सगळीकडे दाणादाण पाहायला मिळत आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल १८०० अशांनी घसरला आहे. आयटी, फायनान्स, फार्मा आणि ऑटोसह अनेक क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांचे समभाग धडाधड कोसळत आहेत. अशात एका शेअरने आज १० टक्क्यांची उसळी घेतली. केंद्र सरकारच्या एका मोठ्या निर्णयामुळे पॉवर आणि रिन्युएबल एनर्जी क्षेत्रातील शेअर्समध्यो मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. ट्रान्सफॉर्मर्स निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स (इंडिया) लिमिटेड’च्या शेअर्समध्ये गुरुवारी जोरदार तेजी नोंदवली गेली.

शेअर बाजारातील आजची स्थिती

भारतीय शेअर बाजारात या कंपनीचा शेअर कालच्या २७०.१० रुपयांच्या बंद पातळीवरून वाढीसह २७१.१० रुपयांवर उघडला. काही वेळातच हा समभाग १०.५ टक्क्यांनी झेपावत २९८.६० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. वृत्त लिहिपर्यंत हा शेअर ८.२२ टक्क्यांच्या मजबुतीसह २९२.३० रुपयांवर व्यवहार करत होता.

कशामुळे आली तेजी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (३० सप्टेंबर) पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘ग्रीन एनर्जी कॉरिडोर फेज-३’ योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेवर सरकार १.८६ लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. या योजनेंतर्गत देशातील विविध राज्यांमध्ये अंतर्गत पॉवर ट्रान्समिशन सिस्टम मजबूत केली जाईल. याद्वारे तब्बल १३५ गिगावॉट रिन्युएबल एनर्जी मुख्य पॉवर ग्रिडपर्यंत पोहोचवता येईल. भारत सरकारने २०३० पर्यंत ५०० गिगावॉट रिन्युएबल एनर्जी क्षमता गाठण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवलं असून, त्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. या निर्णयामुळे या क्षेत्रातील शेअर्स तेजीत आले आहेत.

‘बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम’चाही समावेश

या नव्या योजनेमध्ये केवळ ट्रान्समिशनच नव्हे, तर ५० गिगावॉट तास क्षमतेची बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम बसवण्याची तरतूद देखील आहे. ही बॅटरी यंत्रणा ऊर्जा निर्मिती केंद्रांच्या आसपास किंवा महत्त्वाच्या ग्रिड पॉइंट्सवर उभारली जाईल. यामुळे पॉवर ग्रिडमधील लिक्विडिटी वाढेल, तसेच वीज पुरवठा खंडित होणे, ओव्हरलोडिंग आणि पीक आवर्समधील वीजकपातीची समस्या दूर होण्यास मोठी मदत मिळणार आहे.

शेअरची भूतकाळातील कामगिरी

गेल्या एका आठवड्यात या शेअरने गुंतवणूकदारांना जवळपास ४ टक्क्यांचा परतावा दिला आहे. मात्र, गेल्या एका महिन्यात या स्टॉकमध्ये ५.५ टक्क्यांहून अधिकची घसरण पाहायला मिळाली होती. या वर्षी आतापर्यंतचा परतावा नकारात्मक ५ टक्के राहिला आहे, तर गेल्या एका वर्षात हा स्टॉक ४० टक्क्यांहून अधिक घसरला होता. अलीकडच्या काळात सुस्ती राहिली असली, तरी दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा स्टॉक मल्टिबॅगर ठरला आहे. गेल्या ५ वर्षांत या शेअरने तब्बल २०६१ टक्क्यांचा परतावा आपल्या गुंतवणूकदारांना मिळवून दिला आहे.